कोरोनाचा कहर भारतात ओसरत असल्याचे आशादायक वातावरण जवळजवळ नऊ महिन्यांनंतर आता कुठे निर्माण झालेले असतानाच ब्रिटनमध्ये आढळलेल्या या विषाणूच्या नव्या व अधिक घातक रूपामुळे जगावर आणि भारतावर पुन्हा एकदा आणखी एका नव्या संकटाचे सावट आले आहे. शनिवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी आपल्या देशामध्ये पूर्वीपेक्षा अधिक घातक स्वरूपाचा कोरोनाचा नवा विषाणू रुग्णांमध्ये आढळून आलेला असून त्याचा संसर्गही आधीच्या विषाणूच्या कितीतरी पटींनी अधिक झपाट्याने होत असल्याची कबुली दिली तेव्हाच हे नवे संकट जगावर घोंगावत असल्याची चाहुल मिळाली होती. आजच्या जागतिकीकरणाच्या काळामध्ये कोणताही देश एक – दुसर्यापासून अलिप्त नसतो. त्यातच प्रवासाच्या सुलभ सुविधांमुळे माणसांचे एका देशातून दुसर्या देशात प्रवास करणेही सर्रास सुरू असते. त्यामुळेच एखाद्या देशामध्ये जेव्हा एखादा संसर्गजन्य विषाणू अवतरतो, तेव्हा इतर जग त्यापासून सुरक्षित राहू शकत नाही. चीनमधील वूहानमधील विषाणूने बघता बघता कशा प्रकारे सगळे जग पादाक्रांत केले आणि लाखो लोकांचा बळी कसा घेतला हे उदाहरण तर आपल्यासमोर आहेच.
पूर्वीच्या विषाणूपेक्षा कोरोनाचे हे नवे रूप जवळजवळ चाळीस ते सत्तर टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांना आढळून आले आहे. खरे तर गेल्या सप्टेंबरमध्येच हे विषाणूचे नवे रूप ब्रिटनच्या काही भागांत आढळले होते. परंतु तेव्हा त्याचे गांभीर्य तेवढे लक्षात आलेले नव्हते, कारण स्वतःमध्ये रुपांतर घडविण्याची प्रक्रिया ही बहुतेक विषाणूंमध्ये होतच असते आणि औषधांद्वारे ती नियंत्रितही केली जाते. आधीच्या विषाणूपेक्षा हे नवे रूप किती प्रकारे वेगळे आहे हे कळण्यासाठी त्याचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या माहितीचे विश्लेषण करून नंतरच निष्कर्ष काढावे लागतात. मात्र, अशा प्रकारची वैद्यकीय माहिती गोळा होईपर्यंत हा नवा विषाणू ब्रिटनमध्ये अत्यंत झपाट्याने पसरत गेल्याचे आता दिसते आहे.
कोरोना विषाणूच्या बाबतीत खरे तर ब्रिटनने लस शोधण्यात आघाडी घेतली आहे आणि प्रत्यक्ष लशीकरणही सुरू झालेले आहे. मात्र आता या लशीलाही निष्प्रभ करू शकेल अशा प्रकारच्या या नव्या विषाणूमुळे हे प्रयत्न केराच्या टोपलीत फेकावे लागतील की काय अशी भीती निर्माण झाली आहे.
जगाच्या अनेक भागांमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूची थोडी वेगळी रूपे आढळून आली. मलेशियामध्ये, दक्षिण आफ्रिकेमध्येही अशा प्रकारची वेगळी रूपे यापूर्वी आढळून आली, परंतु तेथे आढळलेल्या त्याच्या बदललेल्या रूपांपेक्षा ब्रिटनमध्ये आढळलेले हे नवे रूप वेगळे आहे आणि अधिक संसर्गजन्य आहे हा त्यातील खरा धोका आहे. तो कितपत घातक आहे याची माहिती तर अद्याप यायची आहे.
ब्रिटनमधून अर्थातच जगभरामध्ये या विषाणूचा प्रवास एव्हाना सुरू झालेला आहे, कारण सप्टेंबरमध्ये मोजक्याच रुग्णांमध्ये हा नवा विषाणू आढळून यायचा, तो डिसेंबरपावेतो मोठ्या प्रमाणात दिसू लागला आणि आता तर त्या देशातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथे आता ऐन ख्रिसमसच्या उत्सवी काळामध्ये कडक लॉकडाऊनची चौथी फेरी लागू करण्यात आली आहे. अत्यंत निरुपायाने ती लागू करणे भाग पडले असल्याची हताश प्रतिक्रिया त्यांच्या पंतप्रधानांनी दिली आहे. ख्रिसमस आणि वर्षअखेरच्या सार्या उत्साहावर विरजण टाकणारा हा विषाणू केवळ ब्रिटनपुरताच निराशेचे नवे सावट घेऊन आलेला नाही. जगभरामध्ये त्यापासून धोका आहे आणि भारतासारख्या विशाल लोकसंख्येच्या देशामध्ये तर त्याच्या संसर्गजन्यतेमुळे अधिक धोका संभवतो.
शनिवारी ब्रिटनने सदर विषाणू नियंत्रणाबाहेर गेल्याचे जाहीर करताच ताबडतोब बहुतेक युरोपीय राष्ट्रांनी ब्रिटनची विमानसेवा स्थगित केली. आपल्याकडे दोन दिवस उशीर झाला असला तरी काल सरकारने तातडीने तज्ज्ञ समितीची बैठक घेऊन काल मध्यरात्रीपासून येत्या ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत त्या देशाची हवाई सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. परिस्थिती पाहून ही बंदी वाढविलीही जाऊ शकते. अनेक प्रवासी थेट न येता दुबईमार्गे वगैरे येत असतात. अशा विमान प्रवाशांवरही नजर ठेवणे आवश्यक बनले आहे.
खरे तर भारतातील परिस्थिती आता हळूहळू निवळू लागली होती. आता पुन्हा भारतात दुसरी लाट संभवत नसल्याचा दावा तज्ज्ञांनी या घसरत्या आकडेवारीवरून केलेला होता, परंतु आता हे नवे संकट वेशीवर उभे असल्याने कोरोनाचे आव्हान किती मोठे आहे हे पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. यावर मात करण्यासाठी भारताला पुन्हा एकदा नव्या निर्धाराने सज्ज होण्यावाचून आता तरणोपाय नाही.