नवे रुग्ण ११२, सक्रिय रुग्णसंख्या ५०० पार

0
18

>> विदेशातून आलेले ५ प्रवासी कोरोनाबाधित

>> राज्यात एकूण बळींची संख्या ३५२०

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन ११२ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, एका कोरोना बळीची नोंद झाली आहे. राज्यातील बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ४.०३ टक्के एवढे आहे. राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असून सक्रिय रुग्णांची संख्या ५३५ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ३५२० एवढी आहे.

गेल्या चोवीस तासांत नवीन २७७६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील ११२ नमुने बाधित आढळून आले.
राज्यात गेल्या चोवीस तासांत आणखी ४१ जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७५ टक्के एवढे आहे.

विदेशातून आलेले ५ प्रवासी कोरोनाबाधित
दाबोळी विमानतळावर काल इंग्लंडमधून आलेले ४ प्रवासी आणि शारजा येथून आलेला १ असे एकूण पाच प्रवासी काल कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. ओमिक्रॉनच्या तपासणीसाठी त्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. इंग्लंड येथून आलेल्या विमानात १८१ प्रवासी होते. सर्व प्रवाशांची कोविड तपासणी करण्यात आली. त्यात ४ प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले. तर, शारजा येथून आलेल्या विमानातून ४९ प्रवासी आले. त्या सर्वांची कोविड तपासणी केली असता १ प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.

फालेरो, ओब्रायन डेरीक
यांना कोरोनाची बाधा

राज्यसभा खासदार, तृणमूल कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझिन फालेरो कोरोनाबाधित झाले आहेत. फालेरो विलगीकरणात असून संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन खासदार फालेरो यांनी केले आहे. तसेच, तृणमूल कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि खासदार ओब्रायन डेरीक हेही कोरोनाबाधित झाले आहेत.

निर्बंधांबाबत ३ तारीखनंतर निर्णय

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

गोवा हे पर्यटन राज्य असल्याने रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू करण्याबाबत घाईघाईत निर्णय घेतला जाऊ शकत नाही. राज्य कृती दलाच्या येत्या ३ जानेवारी होणार्‍या बैठकीनंतर निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल. राज्यात बाधितांच्या संख्येत वाढ झाल्यास कडक निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.
कोविड लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नसल्यास लसीकरण सक्तीचे करण्यावर विचारविनिमय केला जात आहे. ९४ टक्के नागरिकांनी लशीचा दुसरा डोस घेतला आहे. केवळ ६ टक्के नागरिकांनी लशीचा दुसरा डोस घेतलेला नाही. ज्या नागरिकांनी लशीचा दुसरा डोस घेतला नाही, त्यांनी त्वरित घ्यावा, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

१५-१८ मुलांच्या लसीकरणाच्या
नोंदणीस १ पासून सुरुवात

राज्यात १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाच्या नोंदणीला १ जानेवारीपासून ऑनलाइन पद्धतीने प्रारंभ केला जाणार आहे. तसेच, ३ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी यांना बुस्टर डोस १० जानेवारीपासून देण्यास सुरुवात केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यात विवाह समारंभामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. विदेशातून लग्नासाठी आलेले नागरिक कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करावा, गर्दी टाळावी. राज्यात येणार्‍या पर्यटकांनी कोविड नियमांचे पालन करावे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

आरोग्य, पोलीस, जिल्हा प्रशासनाकडून कोरोना महामारीचा आढावा घेतला जात आहे. कोविड चाचण्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कॉल सेंटर सेवा पुन्हा सुरू केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.