नवे मैत्रिपर्व

0
120

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतार्थ विदेशस्थ भारतीयांनी अमेरिकेत ह्यूस्टनमध्ये आयोजित केलेल्या ‘हाऊडी मोदी’ मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणांनी भारत आणि अमेरिका अतिशय जवळ आले असल्याचे अत्यंत आश्वासक चित्र निर्माण केलेले आहे. विशेषतः ‘इस्लामी दहशतवादा’ चा ट्रम्प यांनी केलेला स्पष्ट उल्लेख, उभय देशांनी आपापल्या सीमांचे रक्षण करण्याची व्यक्त केलेली आवश्यकता आणि ट्रम्प यांच्या उपस्थितीतच मोदींनी कलम ३७० संबंधी मांडलेली रोखठोक भूमिका, ९/११ आणि २६/११ चे धागेदोरे कोणत्या देशापर्यंत पोहोचले होते त्याची करून दिलेली आठवण या सार्‍यातून दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत आणि अमेरिका एकमेकांची सक्रिय साथ देतील अशी अपेक्षा सध्या तरी जागलेली आहे. अमेरिकेच्या आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसंदर्भात मोदींनी ट्रम्प यांना ‘अबकी बार ट्रम्प सरकार’ म्हणत व्यक्त केलेला उघडउघड पाठिंबा धक्का देणारा ठरला असला, तरी ट्रम्प यांना अमेरिकस्थ भारतीयांच्या पाठिंब्याच्या येणार्‍या निवडणुकीत असलेल्या गरजेचा फायदा भारत करून घेऊ पाहात आहे असाही त्याचा अर्थ आहे. पाकिस्तानच्या सध्याच्या अकांडतांडवाच्या पार्श्वभूमीवरील हे एक चाणाक्ष राजकीय पाऊल म्हणावे लागेल. अर्थात, ट्रम्प यांचा लहरीपणा लक्षात घेता, काश्मीरच्या किंवा दहशतवादाच्या विषयात भारताच्या पाठीशी अजून किती ठामपणे राहतात याची खात्री मुळीच देता येत नाही. आज रात्री त्यांची इम्रान खान यांच्याशी भेट होणार आहे, तेव्हा ट्रम्प काय बोलतात किंवा येत्या संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये ते भारताला किती खुलेपणाने पाठबळ देतात तेही दिसेलच, परंतु ऊर्जा, संरक्षण सहकार्य, व्यापारउदिम आदी क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका परस्पर सहकार्याच्या दिशेने दमदार पावले टाकत आहेत यात मात्र काही शंका उरलेली नाही. त्या दिशेने करारमदार मोदींच्या अमेरिकावारीत होणारच आहेत. ट्रम्प यांचे धोरण नेहमीच ‘अमेरिका फर्स्ट’ राहिलेले आहे. त्यामुळे या सार्‍या मैत्रिपर्वामध्ये भारतासारख्या विशालकाय बाजारपेठेशी हातमिळवणी व्यावहारिकदृष्ट्या किती फायदेशीर ठरणारी आहे हे त्यांना पुरेपूर ठाऊक आहे. त्यामुळे स्वार्थ आणि परमार्थ अशा दोन्ही भूमिकांतून अमेरिकेने सध्या भारताशी जवळीक वाढवलेली आहे. व्हाईट हाऊसमध्ये आपणच कसे भारताचे सर्वांत जवळचे मित्र आहोत आणि आपले प्रशासन तुमच्यासाठी रोज कसे लढते आहे, हे ट्रम्प यांनी आपल्या भाषणात ठासून अधोरेखित केले. भारताविषयी त्यांना एकाएकी हे जे काही प्रेम उफाळून आलेले आहे, त्यामागे व्यापारी उद्दिष्टे तर आहेतच, शिवाय आगामी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आणि त्यामध्ये सक्रिय सहभागी होणार असलेले अमेरिकेतील तीस लाख भारतीय यांच्या मतपेढीवरही त्यांचा डोळा निश्‍चितपणे आहे. ‘अमेरिकेचा सर्वांत निष्ठावान व समर्पित मित्र’ असा भारताचा उल्लेख ट्रम्प यांनी केला. पं. नेहरूंपासून चालत आलेल्या अलिप्ततावादाच्या धोरणाशी भारताची ही अमेरिकाधार्जिणी भूमिका विसंगत असल्याची टीका यावर जरूर होईल, परंतु पं. नेहरूंच्या अलिप्ततावादाचा वारसा सांगणार्‍या इंदिरा गांधी देखील तत्कालीन परिस्थितीत रशियाच्या किती जवळ गेलेल्या होत्या हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे विद्यमान परिस्थितीत चीन आणि पाकिस्तानची चुंबाचुंबी लक्षात घेता, भारताने महासत्ता अमेरिकेचा हात आपल्या हाती घट्ट धरला तर त्याला वावगे म्हणता येणार नाही. भारतासाठी या मैत्रीचे दर्शन जगाला घडवणे सध्याच्या परिस्थितीत आवश्यक आहे. विशेषतः पाकिस्तानच्या संदर्भात अमेरिकेचे सक्रिय पाठबळ ही भारताची सध्याच्या स्थितीत फार मोठी ताकद ठरणार आहे. भारताच्या सीमेवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या पाचशेच्या वर दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याच्या वार्ता येत आहेत. त्यांच्या निःपातासाठी धडक कारवाई करावी लागली तर अशा वेळी अमेरिकेचे पाठबळ मोलाचे ठरणार आहे. काश्मीरमधील परिस्थितीबाबत ‘सगळे काही चांगले चालले आहे’ असेही मोदींनी यावेळी विविध भाषांतून आवर्जून सांगितले. त्यातून भारत हा या विविध भाषा व भाषक गुण्यागोविंदाने नांदणारा वैविध्यपूर्ण देश आहे हेही अर्थातच जगाला सूचित केले गेले. ट्रम्प यांच्या उपस्थितीत कलम ३७० सारखा नाजूक विषय ठामपणे उपस्थित करण्याची पंतप्रधानांची कृती निश्‍चितपणे प्रशंसनीय होती. उपस्थितांचा त्याला प्रतिसादही जोरदार मिळाला. काश्मीरच्या विषयामध्ये भारतात जनमत कोणत्या बाजूने आहे ते ट्रम्प यांना यानिमित्ताने प्रत्यक्षच पाहायला मिळाले. कलम ३७० चा निर्णय आपला पक्ष अल्पमतात असलेल्या राज्यसभेमध्येही दोन तृतियांश बहुमताने मंजूर झाला हे मोदींनी आवर्जून अधोरेखित केले. दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढाईची वेळ आल्याचेही ते म्हणाले. दहशतवादाविरुद्धच्या या निर्णायक लढाईमध्ये अमेरिका खरोखरच मैत्रीला जागून भारताच्या हातात हात घालून उतरणार असेल तरच ही मैत्री खरी आहे, नुसती बोलघेवडी नाही हे सिद्ध होऊ शकेल!