नवे नेतृत्व उभारण्याची राहुल गांधींची सूचना : जॉन

0
96

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपणाला गोव्यात पक्षाची पुनर्बांधणी करण्याची तसेच नवे नेतृत्व उभारण्यासाठी पावले उचलण्याची सूचना केली असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आठवडाभरापूर्वी आपण खासगी कामानिमित्त नवी दिल्लीला गेलो असता तेथे राहुल गांधी व पक्षाचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. राज्यात पक्षाची स्थिती काय आहे याची इत्यंभूत माहिती यावेळी आपण वरील दोन्ही नेत्यांना दिली. आपणाविषयीची चुकीची व गैरसमज पसरविणारी बातमी कुणी तरी दिग्विजय सिंह यांच्यापर्यंत पोचवल्याचे त्यांच्याशी चर्चा करताना आपणाला कळून चुकले. पण त्यांचा गैरसमज दूर करण्यात आपणाला यश आलेले असल्याने त्यांनी पक्षात साफसफाई करण्याचे काम चालू ठेवण्याची सूचना आपणाला केल्याचे ते म्हणाले.
दर एका मतदारसंघातील गट समित्या यापूर्वीच बरखास्त करण्यात आलेल्या असून आता त्या नव्याने स्थापन करताना त्यात ७५ टक्के प्रतिनिधीत्व हे पक्ष कार्यकर्त्यांना देण्यात येईल. तर आमदारांना केवळ २५ टक्के प्रतिनिधीत्व देण्यात येणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले.
दरम्यान, पक्षांतर्गत निवडणुकीसाठीची प्रक्रिया एप्रिल २०१५ पासून सुरू करण्यात येईल. तर पक्ष सदस्यत्व मोहीम डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच ऑगस्ट २०१५ पर्यंत नवी प्रदेश कॉंग्रेस समिती निवडण्यात येणार असल्याचे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या विरोधात काम करणार्‍यांवर कारवाई करण्याचे काम यापुढेही चालूच राहणार आहे. मागच्या ३० वर्षांच्या काळात राज्यातील विविध नेत्यांनी पक्षाला वेठीस धरले. परिणामी पक्षाची स्थिती राज्यात बिकट बनली. त्या नेत्यांवर वेळीच कारवाई झाली असती तर पक्षाची आज अशी बिकट स्थिती झाली नसती असे ते म्हणाले.