नवी नीती

0
3

ऑपरेशन सिंदूर’ ने नवी रेषा आखली आहे, नवे मानक प्रस्थापित केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारताची नवी नीती असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करताना आपल्या ऐतिहासिक भाषणात म्हणाले. निश्चितपणे भारताच्या पाकिस्तानविषयक भूमिकेतील हे फार मोठे आणि अत्यंत महत्त्वाचे वळण आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील नव्या भारताची ही नवी नीती निश्चितच अत्यंत धाडसी आहे, आजवरच्या सोशिकतेला फाटा देणारी आहे आणि संयमी असली तरी गरज भासेल तेव्हा आक्रमकतेतही आपली सैन्यदले कमी पडणार नाहीत हा विश्वास जागविणारी आहे. एकीकडे पाकिस्तान उघडपणे आपले लष्कर हे ‘जिहादी लष्कर’ असल्याचे सांगत असताना भारताने ही आक्रमक रणनीती आखली असेल तर त्यात काहीही गैर नाही. किंबहुना ती आज काळाची गरज बनली होती. ‘ब्लीड इंडिया विथ थाऊजंड कटस्‌‍’ ही पाकिस्तानची आजवरची भारतविषयक नीती राहिली आहे. हजारो प्रकारे भारतामध्ये सतत रक्तपात घडवायचा हेच पाकिस्तानचे भारतविषयक धोरण राहिले आहे. आजवरच्या एकाही युद्धामध्ये त्याला भारतावर विजय मिळवता आला नाही. प्रत्येकवेळी केवळ नामुष्कीच पत्करावी लागली. परंतु त्यामुळे प्रत्यक्ष युद्धाऐवजी आपण पोसलेल्या दहशतवाद्यांकरवी सदैव ‘प्रॉक्सी वॉर’ करण्यात पाकिस्तानने धन्यता मानली. काश्मीर हा वादाचा मुद्दा बनवून, ते निमित्त करून पाकिस्तान आपल्या पदराखालील दहशतवाद्यांच्या माध्यमातून भारताच्या विकासपथामध्ये सतत अडथळे निर्माण करीत आला. परंतु त्याच्या पापाचा घडा शेवटी पहलगाम हल्ल्याने भरला. तीन दिवसांत आपल्या सैन्यदलांनी पाकिस्तानच्या नाकात असा दम आणला की शरणागतीसाठी देशोदेशी साकडे घालण्याची पाळी त्याच्यावर आली. शेवटी भारताचे दार ठोठवावे लागले. पंतप्रधानांच्या भाषणामध्ये आपल्या सैन्यदलांवरील ह्याच दुर्दम्य विश्वासाचे प्रतिबिंब उमटले आहे. त्याच बळावर त्यांनी पाकिस्तानसंदर्भात ही नवी नीती स्वीकारण्याची घोषणा केलेली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे असे जेव्हा ते म्हणतात, तेव्हा यापुढील काळामध्ये हीच आक्रमकता पाकिस्तानच्या प्रत्ययास येईल हा गर्भीत इशाराही त्यामध्ये आहे. पंतप्रधानांनी तीन ठळक बाबी आपल्या भाषणात अधोरेखित केल्या आहेत. ते म्हणाले की ह्यापुढील दहशतवादी हल्ल्यांचे आमच्या पद्धतीने, आमच्या शर्तींवर आणि त्याच्या मुळाशी जाऊन उत्तर दिले जाईल. दुसरी गोष्ट त्यांनी अधोरेखित केली की यापुढे पाकिस्तानचे आण्विक ब्लॅकमेलिंग भारत सहन करणार नाही. प्रत्येक कुरापतीवर सटीक आणि निर्णायक प्रहार केला जाईल. आणि तिसरी गोष्ट त्यांनी स्पष्ट केली ही ह्यापुढे दहशतवादी आणि त्याची पाठराखण करणारे सरकार ह्यांना वेगळे मानले जाणार नाही. म्हणजेच त्यासाठी पाकिस्तान सरकारलाही जबाबदार धरले जाईल. बहावलपूर आणि मुरिदकेच्या कारवाईनंतर खात्मा झालेल्या दहशतवाद्यांच्या दफनविधीसाठी पाकिस्तानी सैन्यप्रमुखांनी कसे पुष्पगुच्छ पाठवले आणि बडे बडे अधिकारी कसे जातीने उपस्थित राहिले त्याकडेही पंतप्रधानांनी जगाचे लक्ष वेधले आहे. जगभरामध्ये – मग ती अमेरिका असो वा ब्रिटन, जेव्हा जेव्हा दहशतवादी हल्ले होतात, त्याचे धागेदोरे ह्याच मूळ स्त्रोतांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत ह्याकडेही त्यांनी अंगुलीनिर्देश केला आहे. पाकिस्तानची आयएसआय काय उचापती करते हे जगाला माहीत नाही असे नव्हे, परंतु भारताला वेसण घालण्यासाठी पाकिस्तानच्या ह्या उचापतींकडे दुर्लक्ष करायचे हीच आजवर अमेरिका आणि मित्रदेशांची भूमिका राहिली आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसीफ यांनी एका ताज्या मुलाखतीत ही स्पष्ट कबुली दिली आहे की पाकिस्तान अमेरिका आणि ब्रिटनच्या सांगण्यावरून पूर्वीपासून दहशतवादी कृत्यांची पाठराखण करीत आलेले आहे. फक्त आज पाकिस्तानात कोणी दहशतवादी असल्याचे ते नाकारतात. मौलाना मसूद अजहरपासून हाफीज सईदपर्यंत सगळे दहशतवादी ‘आका’ पाकिस्तानाच सुखाने राहत आहेत हे दिसत असताना आजही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष युद्धबंदीचे श्रेय उपटताना भारत आणि पाकिस्तानला एकाच मापात तोलतात त्याचे खरोखर आश्चर्य वाटते. ह्या सगळ्याचा अर्थ स्पष्ट आहे. भारताला स्वतःचे रक्षण स्वतःच्या हिंमतीवर करावे लागणार आहे. पाकिस्तानसंदर्भातील ह्या नवनीतीतून येणारी अस्थिरता आणि अनिश्चितता आपल्या विकासरथाला रोखणार नाही ह्याचीही खातरजमा आपल्याला करावी लागेल. परंतु ‘ऑपरेशन सिंदूर’ ने खरोखरच प्रतिशोधाची एक नवी श्रेणी गाठली आहे आणि येणाऱ्या सरकारांनाही यापुढे पाकिस्तानबाबत शेळपट धोरणे आखता येणार नाहीत.