>> आणखी एकाच्या मृत्यूमुळे राज्यात ३५ बळी
राज्यात कोरोना विषाणूने शनिवारी एकाच दिवशी पाच कोरोना रुग्णांचा बळी घेतल्यानंतर रविवारी आणखी एका रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळात निधन झाले. त्यामुळे कोरोना बळींची संख्या आता ३५ झाली आहे. दरम्यान, नवीन १७५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या १५४९ झाली आहे.
नवेवाडा वास्को येथील ६३ वर्षीय रुग्णाचे निधन झाले आहे. आरोग्य खात्याने २३० कोरोना रुग्ण बरे झाल्याचे जाहीर केले असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४८६१ एवढी झाली आहे. त्यातील ३२७७ रुग्ण बरे झाले आहेत. बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड प्रयोगशाळेत ६६३३ स्वॅबचे नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रयोगशाळेतील ८२१९ नमुन्यांपैकी १५८६ नमुन्यांची तपासणी केली आहे.
फोंड्यात नवीन २९ रुग्ण
फोंड्यात नवीन २९ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ७१ झाली आहे. शिरोडा व धारबांदोड्यात प्रत्येकी १ नवीन रुग्ण आढळला असून रुग्णसंख्या ४६ झाली आहे.
मडगावात नवे ८ रुग्ण
मडगाव येथे नवे ८ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १०३ झाली आहे. कासावलीत ३, चिंचिणी १, लोटली येथे नवीन १ रुग्ण आढळला असून रुग्णसंख्या २७ झाली आहे. काणकोणात नवीन २ रुग्ण आढळले आहेत. वास्को येथील सक्रिय रुग्णांची संख्या ३३९ आणि कुठ्ठाळी येथील सक्रिय रुग्णांची संख्या ३८३ एवढी आहे.
हळदोणा, खोर्लीत नवीन रुग्ण
हळदोणा येथे नवीन ५ रुग्ण आढळले आहेत. खोर्लीत नवीन ३ रुग्णांमुळे रुग्णसंख्या २० झाली आहे. शिवोली १, कासारवर्णे १, डिचोलीत ५ तर वाळपईत २ रुग्ण तर पणजी भागात ३ रुग्ण सापडले.
गोमेकॉत कोरोनाबाधित
गोमेकॉच्या काही वॉर्डात कोरोनाबाधित आढळून येत असल्याचे तर्कवितर्क केला जात आहे. गोमेकॉमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून खास प्रॉटोकोल तयार करण्यात आलेला आहे. तरीही, गोमेकॉच्या न्यूरोलॉजी, प्रसूती विभाग, डर्मेटॉलॉजी, मेडिसीन, जनरल सर्जरी, सीसीयू या वॉर्डात १५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.