नवीन सावर्डे पुलाची पायाभरणी जुलै महिन्यापर्यंत करणार

0
8

>> आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचे आश्वासन

>> सावर्डे येथे भाजपच्या जाहीर सभेला कार्यकर्त्यांची गर्दी

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या कार्यकाळात सावर्डे येथे अरुंद पूल बांधण्यात आला होता. त्यावेळी ती गरज होती. आज गावाचा विकास झाला असल्याने वाहतुकीत वाढ झाली आहे. नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सुविधा अपेक्षित आहेत. जनतेच्या मागणीनुसार जुलैपर्यंत सावर्डे येथे नूतन पुलाची पायाभरणी करण्यात येणार आहे असे आश्वासन आरोग्यमंत्री तथा स्थानिक आमदार विश्वजीत राणे यांनी दिले.

सावर्डे येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या जाहीर सभेत ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे उत्तर गोव्याचे अधिकृत उमेदवार श्रीपाद नाईक, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, वाळपई भाजप मंडळाचे अध्यक्ष रामदास डांगी, भाजपाचे प्रभारी विनोद शिंदे, सावर्डे पंचायतीच्या सरपंच उज्ज्वला गावकर, पंच नितेंद्र राणे, शिवा कुडसेकर, शिवाजी देसाई, बुधाजी म्हाळशेकर, अक्षता गावकर व यशोदा गावडे उपस्थित होत्या.

आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले की, सावर्डे येथे अनेक वर्षापासून नवीन पूल उभारण्याची प्रक्रिया सुरू आहेत. पुलाच्या प्रस्तावाला अंतिम स्वरूप मिळाले आहे. पुढील दोन महिन्यांमध्ये पुलाची पायाभरणी करून प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येईल. नवीन पूल पूर्ण झाल्यानंतर सावर्डे पंचायत क्षेत्राच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपाचे उमेदवार श्रीपाद नाईक म्हणाले की, गेल्या 25 वर्षांमध्ये उत्तर गोव्याच्या वेगवेगळ्या भागांत बाराशे प्रकल्प पूर्ण करून विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तरी तालुक्यातील जनतेने आपल्याला सातत्याने सहकार्य केलेले आहे. या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात मतदान करा व नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा असे आवाहन त्यांनी केले. मंत्री विश्वजीत राणे यांच्या सहकार्याने सत्तरी तालुक्यात पुढील काळात निधीचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प उभारण्यावर भर देणार असे आश्वासन त्यांनी दिले.
सुरूवातीला पंचायतीच्या सरपंच उज्ज्वला गावकर यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. त्यांनी सावर्डे पंचायत क्षेत्रांमध्ये मंत्री राणे यांनी केलेल्या आतापर्यंत अनेक विकास प्रकल्पांचा उल्लेख केला. येणाऱ्या काळात चांगला विकास साधण्यास भाजपला पाठिंबा द्या, असे त्यांनी सांगितले.