नवीन लष्करप्रमुख म्हणून जनरल उपेंद्र द्विवेदींनी पदभार स्वीकारला

0
4

जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी काल रविवारी 30 जूनपासून नवीन लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. जनरल द्विवेदी हे 30वे लष्करप्रमुख आहेत. या वर्षी 19 फेब्रुवारी रोजी ते लष्कराचे उपप्रमुख झाले होते. लष्करप्रमुख झाल्यावर द्विवेदी यांना लेफ्टनंट जनरलवरून जनरल पदावर बढती देण्यात आली.
भारत सरकारने 11 जूनच्या रात्री त्यांना लष्करप्रमुख बनवण्याची घोषणा केली होती. यापूर्वी त्यांनी लष्कराचे उपप्रमुख, नॉर्दर्न आर्मी कमांडर, डीजी इन्फंट्री आणि लष्करातील इतर अनेक कमांडचे प्रमुख म्हणून काम केले आहे. जनरल द्विवेदी यांची जनरल मनोज पांडे यांच्या जागी लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. जनरल पांडे हे कालच निवृत्त झाले आहेत. शेवटच्या कामकाजाच्या दिवशी त्यांना लष्कराकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. ते 26 महिने लष्करप्रमुख राहिले.गेल्या महिन्यात सरकारने जनरल पांडे यांचा कार्यकाळ एक महिन्याने वाढवला होता. जनरल पांडे हे 31 मे रोजी निवृत्त होणार होते. याच्या अवघ्या सहा दिवसांपूर्वी म्हणजे 25 मे रोजी त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.