>> स्थानिक शेतकरी जमल्याने तूर्त स्थगित
बोरी येथे नवीन पुलाच्या कामासाठी भूसंपादन प्रक्रिया काल करण्याचे प्रशासनाने निश्चित केले होते. त्यामुळे येणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यासाठी स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी जमले होते. यामुळे अधिकाऱ्यांनी भूसंपादनाचे काम पुढे ढकलले.
लोटली पंचायतीने पत्र पाठवून पुलाच्या कामाचा आराखडा, आवश्यक परवानगी, सीआरझेड भाग व सीमांकत याबाबत माहिती पंचायतीला मिळाल्यानंतरच पुढील प्रक्रिया करावी अशी मागणी केली होती. नवीन बोरी पुलाच्या बांधकामाला लोटली आणि परिसरातील नागरिकांनी व तेथील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. हा पूल केवळ कोळसा वाहतुकीसाठी केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला होता.
काल सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे टेक्नोजेम कन्सल्टंट भू सर्वेक्षण विभाग तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार होते. पण ते फिरकलेच नाहीत. उपस्थित राहणार असल्याचे बांधकाम खात्याने 9 रोजी पत्र पाठविले होते. लोटली पंचायतीने पत्र पाठविल्याने तसेच लोक मोठ्या संख्येने जमून स्थानिक अडथळा करतील या कारणामुळे संपादन प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.