नवीन पोलीस महासंचालक आलोककुमार यांचे आगमन

0
6

गोव्याचे नूतन पोलीस महासंचालक जसपाल आलोककुमार यांचे काल रविवारी गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांचे दाबोळी विमानतळावर मुख्य सचिव पुनीत गोयल, दक्षिण जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी स्वागत केले.
आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांच्या घराच्या मोडतोड प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे पोलीस महासंचालक डॉ. जसपाल सिंग यांची शनिवारी अखेर नवी दिल्लीला बदली करण्यात आली. तसेच राज्याचे नवे पोलीस महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी आलोककुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधीचा आदेश शुक्रवारी जारी केला होता. बदलीची शिफारस केल्यानंतर तब्बल 14 दिवसांनी जसपाल सिंग यांच्या बदलीचा आदेश निघाला.

गेल्या जून महिन्यात आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्याची घटना घडली होती. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश मुख्य सचिवांना दिला होता. प्रदीप आगरवाडेकर यांचे घर पाडण्यासाठी मदत करावी म्हणून जसपाल सिंग यांनी आपणावर दबाव आणल्याचा अहवाल हणजूणचे पोलीस निरीक्षक प्रशल देसाई यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना सादर केल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. प्रशल देसाई यांनी 28 जूनला हा अहवाल सादर केला होता. यानंतर राज्य सरकारने 29 जूनला केंद्रीय गृहमंत्रालयाकडे त्यांची बदलीची शिफारस केली होती. त्याआधी प्रशल देसाई व अन्य दोन पोलिसांना या प्रकरणी निलंबित केले होते.

विरोधी पक्षांनी जसपाल सिंग यांच्या तातडीच्या बदलीची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी नवी दिल्लीला तातडीने भेट दिली होती. दरम्यान, जसपाल सिंग यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागेवर गोव्याचे नूतन पोलीस महासंचालक म्हणून जसपाल आलोककुमार यांचे काल गोव्यात आगमन झाले. दुपारी त्यांचे दाबोळी विमानतळावर आगमन होताच मुख्य सचिव पुनीत गोयल, दक्षिण जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी आलोककुमार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुरगाव पोलीस उपअधीक्षक सलीम शेख, वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक उपस्थित होते.