>> केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
>> जुवारी पुलाच्या एकेरी मार्गाचे १५ डिसेंबरपर्यंत उद्घाटन
गोव्यात सुमारे १२५० कोटी रुपयांच्या चार नवीन रस्त्यांच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. अनेक रस्त्यांच्या बांधकामांत येणारे अडथळे दूर करण्यात आले असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. काल आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान यावेळी मंत्री गडकरी यांनी, केंद्र सरकारच्या रस्ता वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गोवा राज्याच्या वार्षिक खर्चाच्या योजनेत २ हजार कोटी रुपयांवरून ५ हजार कोटी रूपयांपर्यत वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची घोषणाही केली.
नावेली मडगाव ते कुंकळ्ळी (२७० कोटी), काणकोण ते पोळे (२०० कोटी), संजीवनी धारबांदोडा ते खांडेपार (२०० कोटी), फोंडा भोम (५७५ कोटी) या नवीन रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रालयाने २५ हजार कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांना मान्यता दिली आहे. त्यातील काही विकासकामे पूर्ण झाली. तर, काही विकासकामे सुरू आहेत, असेही मंत्री गडकरी यांनी सांगितले.
जुवारी पुलाच्या एकेरी मार्गाचे
१५ डिसेंबरपर्यंत उद्घाटन
जुवारी पुलाचे काम जोरात सुरू आहे. या पुलाच्या एकेरी मार्गाचे येत्या १५ डिसेंबरपर्यत उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. हा पूल पर्यटकांना जास्त आकर्षित करणारा असेल. मोपा विमानतळाच्या जोडरस्त्याच्या कामाला गती देण्याची सूचनाही करण्यात आल्याचे गडकरी यांनी सांगितले.
गोव्यात रस्ता नवीन बांधला जात आहे. त्यामुळे प्रथम टप्प्यात वाहन चालकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मात्र कुठल्याच कामाबाबत तडजोड केली जात नाही, असेही गडकरी म्हणाले. गोव्यातील खाण प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची मदत घेतली जात आहे. न्यायालयाकडून सकारात्मक निर्णय मिळेल, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री गडकरी यांनी व्यक्त केली.
गडकरी घेणार ढवळीकर यांची भेट
माजी उपमुख्यमंत्री तथा मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांच्याशी व्यक्तिगत संबंध आहेत. त्यामुळे या भेटीला राजकीय रंग लावू नये. राजकारण वेगळे आणि वैयक्तिक संबंध वेगळे असतात. मात्र भाजप-मगो आघाडीबाबत उलटसुलट चर्चा असली तरी सुदिन ढवळीकर यांची भेट घेणार आहे, असे
येत्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात भाजप मगो यांच्यात युती होणार का याबाबत बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समविचारी पक्षांना युतीसाठी भाजपची दारे खुली असल्याचे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर गोवा दौर्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री गडकरी यांचे वरील विधान महत्त्वाचे मानले जात आहे.
भाजपचे निवडणूक प्रभारी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काल गोव्यात आगमन झाले. मंत्री गडकरी आणि फडणवीस हे दोघेही मगोचे नेते आमदार सुदिन ढवळीकर यांची भेट घेण्याचीही शक्यता आहे.