- सुधाकर नाईक
सवार्र्ंगसुंदर सांघिक कामगिरीवर टीम इंडियाची यशस्वी घोडदौड सुरू असून ज्येष्ठ-श्रेष्ठ प्रस्थापितांबरोबरच नव्या दमाच्या खेळाडूंनीही महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. आणि यात माजी कर्णधार राहुल द्रविडला ‘आराध्य’ मानणार्या कर्नाटकी हरहुन्नरी क्रिकेटर के. एल. राहुलचे योगदान लक्षणीय ठरले.
भारतीय क्रिकेट संघाने स्वगृहीच्या ‘वीराट’ भरारीनंतर आता न्यूझिलंडमध्ये प्रथमच टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. पहिल्या दोन सामन्यांत दमदार विजय नोंदविलेल्या भारताला यजमानांनी हॅमिल्टन येथील तिसर्या सामन्यात कडवी झुंज दिली, पण विसाव्या षटकात मोहम्मद शामीने नाट्यमय कलाटणीत कर्णधार केन विल्यमसनचा महत्त्वपूर्ण बळी आणि अंतिम चेंडूवर अनुभवी रॉस टेलरची यष्टी उधळीत सामना ‘सुपर ओव्हर’मध्ये नेला. ‘हिटमॅन’ रोहितने अखेरच्या दोन चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकीत भारताचा विजय झळकाविला. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी विजय आघाडी घेत न्यूझिलंडमध्ये प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकली. भारताने न्यूझिलंडमध्ये प्रथम कसोटी मालिका १९६८ मध्ये आणि एकदिवसीय मालिका २००९ मध्ये जिंकली होती.
सवार्र्ंगसुंदर सांघिक कामगिरीवर टीम इंडियाची यशस्वी घोडदौड सुरू असून ज्येष्ठ-श्रेष्ठ प्रस्थापितांबरोबरच नव्या दमाच्या खेळाडूंनीही महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. आणि यात माजी कर्णधार राहुल द्रविडला ‘आराध्य’ मानणार्या कर्नाटकी हरहुन्नरी क्रिकेटर के. एल. राहुलचे योगदान लक्षणीय ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या स्वगृहीच्या मालिकात जायबंदी पंतच्या जागी यष्टिरक्षणाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेललेल्या राहुलने विद्यमान मालिकेत ऑकलंड येथील पहिल्या दोन सामन्यांतील विजयांत शानदार अर्धशतके झळकवण्याचा विक्रम नोंदला. तसेच तिसर्या सामन्यातही उपकर्णधार रोहित शर्माला सलामीवीर म्हणून सुरेख साथ दिली.
उच्चतम शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेल्या राहुलचा जन्म १८ एप्रिल १९९२ रोजी मंगळुरू, कर्नाटक येथे झाला. राहुलचे वडील कर्नाटकमधील प्रतिष्ठित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात प्रोफेसर तथा कार्यकारी निर्देशक तर आई राजेश्वरी मंगळुरू विद्यापीठात इतिहासाच्या अध्यापक आहेत. राहुलचे वडीलही क्रिकेटप्रेमी तथा महाविद्यालयीन क्रिकेट खेळलेले असल्यामुळे त्यांनी मुलाच्या अंगचे क्रिकेटगुण हेरून त्याला प्रोत्साहन, प्रेरणा दिली. दहाव्या वर्षी राहुलने मंगलोर झोन अंडर- १३ (मंगळुरू येथील कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन अकादमी) क्रिकेट निवड चाचणीत भाग घेतला. राहुलची निवड झाली नाही, पण प्रशिक्षकांच्या परवानगीने सरावात भाग घेतला. काही वर्षांनंतर त्याला मंगलोरच्या अंडर-१३ संघात स्थान मिळाले आणि त्याने आपली गुणवत्ता प्रगटविताना सलग दोन द्विशतके झळकाविली. चिन्नास्वामी स्टेडियमवरील त्याच्या एका खेळीस भारताचा ‘दी वॉल’ राहुल द्रविड उपस्थित होता. द्रविडने १२ वर्षीय राहुलला शाबासकी तथा प्रोत्साहन दिले आणि ही घटना युवा क्रिकेटपटूसाठी मोठी प्रेरणादायी ठरली.
२०१०-११ मध्ये के. एल. राहुलने कर्नाटकतर्फे स्थानिक क्रिकेट खेळण्यास प्रारंभ केला. याच वर्षी त्याला आयसीसी क्रिकेट वल्डकप अंडर- १९ संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभली. २०१२ मध्ये रणजी पदार्पण केले. २०१३-१४ मधील रणजी मोसमात राहुलने प्रभावी कामगिरीत १०३३ धावा नोंदल्या. २०१४-१५ मधील दुलिप करंडक स्पर्धेत दक्षिण विभागातर्फे खेळताना मध्य विभागाविरुद्ध दोन्ही डावांत शतके (१८५ व १३०) झळकवीत राष्ट्रीय निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आणि ऑस्ट्रेलिया दौर्यात राष्ट्रीय संघात निवड झाली. २६ डिसेंबर २०१४ रोजी मेलबर्न येथील ‘क्रॉसिंग डे’ कसोटीत ‘नर्व्हस’ राहुल असफल ठरला. पण ‘दी वॉल’ द्रविडला प्रेरणास्थान मानणार्या राहुलला सिडनी कसोटीत सलामीवीर म्हणून उतरविले आणि त्याने नाट्यमय भरारीत शानदार शतक झळकवीत (११०) आपली गुणवत्ता सिद्ध केली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शतकाने मनोबल, आत्मविश्वास दुणावलेल्या राहुलने श्रीलंका आणि वेस्ट इंडिज दौर्यातही शतके झळकावीत संघात सकस स्पर्धा निर्माण केली.
२०१६ मधील झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज दौर्यात राहुलने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले. मर्यादित षट्कांच्या झटपट क्रिकेटमध्ये आपले कौशल्य प्रगटविताना हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध ‘वन-डे’ पदार्पणात शतक झळकविण्याचा पराक्रम केला. तसेच याच दौर्यात झिम्बाब्वेविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पणही केले. कसोटी, वन-डे आणि टी-२० या तिन्ही प्रकारांत आपला हातखंडा अजमावताना राहुलने शतकवीर बनण्याचा पराक्रमही गाजविला. भारताचा माजी कर्णधार ‘दी वॉल’ राहुल द्रविडला आपले आराध्य मानणार्या के.एल.ने आतापर्यंत ३६ कसोटीत ५ शतके ११ अर्धशतकांसह (सर्वोच्च १९९) २००६, ‘वन-डे’ २९ सामन्यांत ३ शतके आणि ६ अर्धशतकांसह १०३५ (सर्वोच्च १११), तर ३८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत २ शतके आणि ११ अर्धशतकांसह १३५० (सर्वोच्च ११०) धावा नोंदल्या आहेत.
भरपूर क्रिकेटमुळे राहुलला दुखापतींच्या सत्रातूनही गुजरावे लागले. पण २०१७ मध्ये दमदार पुनरागमनात चैन्नई येथे इंग्लंडविरुद्ध कसोटीतील सर्वोच्च १९९ धावा तडकावल्या. २०१९ च्या प्रारंभास करण जोहरच्या ‘कॉफी वुईथ करण’ या टीव्ही मालिकेत संघसाथी हार्दिक पांड्यासह महिलांविषयी केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे बीसीसीआयकडून उभयतांना दंड आणि निलंबनाची शिक्षा फर्मावण्यात आली आणि ऑस्ट्रेलिया दौर्यावरून माघारी बोलावण्यात आले. उभयतांनी आपल्या बेताल भाष्यासंबंधी माफी मागितली आणि प्रकरण मिटले.
विश्व चषक स्पर्धेनंतर वेस्ट इंडिज दौर्यातील कमकुवत कामगिरीमुळे राहुलला कसोटी स्थान गमवावे लागले आणि त्याच्या जागी संधी मिळालेल्या कर्नाटकच्या मयंक अगरवालने शानदार शतकी, द्विशतकी कामगिरी नोंदली. सप्टेंबरमधील द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शिखर धवन तंदुरुस्त बनल्याने राहुलला संघाबाहेर राहावे लागले, पण त्याने कर्नाटकतर्फे विजय हजारे चषक तसेच मुश्ताक स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावीत पुनरागमन केले. वेस्ट इंडिजविरुद्ध स्वगृहीच्या मालिकेत शिखर धवन जायबंदी असल्याने राहुलला सलामीवीर म्हणून बढती मिळाली आणि त्याचा योग्य लाभ उठवीत रोहित शर्माच्या साथीत त्याने शानदार योगदान दिले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘वन-डे’ मालिकेत राहुलने ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत राजकोटमध्ये यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळतानाच ‘मॅच विनिंग’ कामगिरीत ८० धावा ठोकल्या आणि कर्णधार वीराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीकडून प्रशंसा मिळविली. तसेच बंगळुरूमधील निर्णायक सामन्यातही यष्टिरक्षणाची जबाबदारी यशस्वीरीत्या निभावली.
विद्यमान न्यूझिलंड दौर्यातही के. एल. राहुलने यष्टिरक्षक-फलंदाजाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडतानाच पहिल्या दोन्ही सामन्यांत अर्धशतकी खेळी नोंदविण्याचा पराक्रम केला आहे.
भारतातील लोकप्रिय इंडियन प्रिमियर लीगमध्ये २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्सतर्फे फलंदाजी- यष्टिरक्षक म्हणून योगदान दिलेल्या राहुलने २०१४ मध्ये सनराझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व केले. २०१८ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला ११ करोडच्या बोलीवर घेतले. पंजाबचा कर्णधार तथा सलामीवीर म्हणून प्रभावी योगदान देताना त्याने सहा अर्धशतकांसह ६५९ धावा चोपल्या. तसेच १४ चेंडूत अर्धशतकाचा विक्रमही प्रस्थापिला.
मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज, भरवशाचा सलामीवीर, उपयुक्त यष्टिरक्षक अशी विविधांगी कर्तृत्व गाजविलेल्या के. एल. राहुलला भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा!