जुना मांडवी पूल दुरुस्तीनंतर वाहतुकीसाठी कालपासून सुरू करण्यात आला आहे. यानंतर आता नव्या मांडवी पुलाची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने हा पूल रविवार दि. 2 ते सोमवार दि. 10 मार्चपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दुरुस्तीनंतर कालपासून वाहतुकीसाठी खुला केलेल्या जुन्या मांडवी पुलावरून ही वाहतूक वळवण्यात येणार आहे. त्याचबरोबर अटल सेतूवरूनही वाहतूक वळवली जाईल. ज्या वाहनाचे वजन (जीव्हीडब्ल्यू) 12 टनपर्यंत असेल, ती वाहने जुन्या मांडवी पुलावरून सोडण्यात येतील. त्यापेक्षा जास्त वजन असलेली वाहने ही अटल सेतूवरून सोडण्यात येणार आहेत. नव्या मांडवी पुलाचे काम वेगाने व कोणत्याही अडथळ्याशिवाय करता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे सरकारतर्फे कळवण्यात आले आहे.
टुरिस्ट टॅक्सींना पणजीत पार्किंग बंदी
उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यानी एका आदेशाद्वारे टुरिस्ट टॅक्सीचालकांना पणजी शहरातील सार्वजनिक पार्किंगमध्ये त्यांच्या गाड्या पार्क करण्यावर तात्पुरती बंदी घातली आहे. पणजीत स्मार्ट सिटीचे काम चालू असल्याने पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने हा बंदी घालण्यात आली आहे. त्यांना ठरवून दिलेल्या जागेत त्यांना केवळ तीन मिनिटांसाठी गाड्या थांबवून प्रवाशांची ने-आण करता येईल, असे कळवण्यात आले आहे.