अल कायदाने भारतीय उपखंडामध्ये आपली नवी शाखा निर्माण केल्याची अल जवाहिरीची घोषणा देशात दहशत निर्माण करण्यास पुरेशी असली, तरी प्रत्यक्षात या घोषणेमागे अल कायदाची अगतिकताच असल्याचे दिसून येत आहे. इराक व सिरियामध्ये आयएसआयएसने आगेकूच करून स्वतःची ‘खिलाफत’ जाहीर केल्यापासून अल कायदाचा जगभरातील इस्लामी दहशतवादी गटांवरील प्रभाव ओसरू लागला आहे. ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने खातमा केल्यानंतर सातत्याने द्रोण विमानांच्या हल्ल्यांद्वारे अमेरिकेने अल कायदाचे बडे बडे नेते नेस्तनाबूत केले. पाकिस्तान – अफगाणिस्तान सीमेवरील दुर्गम पहाडांपुरते अल कायदाचे अस्तित्व आज राहिले आहे. त्यांची लष्करी आणि आर्थिक ताकद यांनाही ओहोटी लागली आहे. दुसरीकडे आयएसआयएसने मात्र स्वतःचा प्रदेश हस्तगत केला आहे, तेथे स्वतःचे कायदेकानून लागू केले आहेत, प्रचंड पैसा आणि शस्त्रास्त्रांचा साठा केला आहे. त्यामुळे जगभरातील इस्लामी दहशतवादी गट अल जवाहिरीच्या अल कायदाऐवजी अबुबकर अल बगदादीच्या आयएसआयएसकडे आकृष्ट होत चालले आहेत. अल कायदाला हा सरळसरळ हादरा आहे, कारण आयएसआयएस आणि अल कायदामधील बेबनाव जगजाहीर आहे. सिरियामध्ये अल कायदाच्या प्रभावाखालील अल नुसरा फ्रंट आयएसआयएसशीच लढत आलेला आहे. त्यामुळे अल बगदादी आणि त्याच्या आयएसआयएसचा वाढत चाललेला प्रभाव लक्षात घेता, अल कायदाला आपले अस्तित्व दाखवून देण्याची गरज निर्माण झाली होती. त्यामुळे त्यातल्या त्यात आपला प्रभाव दाखवून देता येईल अशा भारतीय उपखंडाची निवड अल कायदाने आपल्या कारवाया विस्तारण्यासाठी केलेली आहे. खरे तर भारतामध्ये आजवर दहशतवादी कारवाया करीत आलेल्या गटांशी हातमिळवणी करण्याचा अल कायदाचा आजवरचा प्रयत्न असफलच ठरत आलेला आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे भारतात होणार्या दहशतवादी कारवाया ह्या पाकिस्तानच्या आयएसआयच्या इशार्यावर चालतात. अल कायदाच्या हाती या दहशतवादी कारवायांची सूत्रे जाणे आयएसआयला नको आहे. त्यामुळे इंडियन मुजाहिद्दीनपासून हुजीपर्यंत जे जे गट भारतामध्ये आजवर घातपात घडवीत आले, त्यांच्यावर आयएसआयनेच आपला प्रभाव आजवर राखला. अल कायदाच्या हाती ही सूत्रे गेली, तर त्यांना आपल्या इशार्यावर नाचवता येणार नाही हे आयएसआय जाणून आहे. अल कायदाने ‘कैदत अल जिहाद’ ची जी घोषणा केली आहे, तिचा अर्थ भारतातील काही दहशतवाद्यांशी त्यांनी संधान जुळवले आहे असा होतो. अल जवाहिरीने आपल्या धमकीच्या व्हिडिओत काश्मीरबरोबर गुजरात, उत्तर प्रदेश आणि आसामचा उल्लेख केला. गेल्या काही वर्षांत तेथे घडलेल्या घटनांचा संदर्भ त्याला आहे. म्यानमार आणि बांगलादेशचाही त्याच्या भाषणात उल्लेख झाला. म्यानमारमध्ये तेथील बौद्ध बहुसंख्यक आणि रोहिंग्या मुसलमान यांच्यातील अलीकडच्या चकमकींचा आणि बांगलादेशातील वाढत्या कट्टरतावादाचा त्याला संदर्भ आहे. म्हणजेच अलीकडच्या काळात घडलेल्या या घटनांचे भांडवल करून आपल्या ‘जिहाद’च्या लढ्यात भारतातील वाट चुकलेल्या अल्पसंख्यकांना सामील करून घेण्याची चिथावणी अल जवाहिरी देऊ पाहात आहे. तसल्या प्रवृत्ती आयएसआयएसकडे आकृष्ट होत चालल्याचे अलीकडे आढळून आले आहे. मुंबईचे काही तरूण आयएसआयएसला जाऊन सामील झाल्याचे अलीकडेच स्पष्ट झाले होते. या सार्या पार्श्वभूमीवर अल कायदाला आपला प्रभाव पुन्हा प्रस्थापित करणे भाग पडले आहे. अल जवाहिरीचा चिथावणीखोर संदेश हा त्यासाठीच आहे. गुजरातपासून मुजफ्फरनगरपर्यंतच्या घटनांना निमित्त करून आपले जिहादी जाळे विस्तारण्याचा हा डाव आहे. यात आतापर्यंत त्यांना किती यश मिळालेले आहे, भारतातील कोणकोणत्या गटांशी हातमिळवणी करण्यात अल कायदा सफल झालेली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दहशतवादी कारवाया जसजशा चालीस लावल्या जातील तसतसे ते स्पष्ट होत जाईल. देशात येणार्या काळात त्यामुळे घातपाती कारवाया संभवतात. या जिहादी शक्तींना डोके वर काढण्याची संधी कशामुळे मिळाली हाही विचार करण्यासारखा विषय आहे!