नवा दहशतवाद

0
16

अभिनेता सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 48 तासांच्या आत दोन्ही हल्लेखोरांच्या गुजरातमधून मुसक्या आवळल्या. जी बिश्नोई टोळी सलमानला ठार मारण्याची धमकी वारंवार देत आली आहे, तिच्याशीच हे दोघे संबंधित असल्याचे उघड झाल्याने ह्या घटनेचे गांभीर्य अधिकच वाढते. सलमान खानने बिश्नोई समाजाला वंदनीय असलेल्या काळविटाची शिकार केल्याचे कारण जरी ही टोळी पुढे करीत आली असली, तरी प्रत्यक्षात सलमानसारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्याला धाक दाखवून त्याद्वारे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीवर आणि इतर व्यावसायिकांवर आपली जरब बसवण्याचे आणि खंडणी वसुलीचे हे षड्यंत्र दिसते. यापूर्वी पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची हत्याही ह्या टोळीने ह्याच कारणाने केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे काळवीट हे निमित्त आहे आणि खरा उद्देश आपली दहशत पसरवणे हाच असावा. सर्वांत विशेष बाब म्हणजे ह्या टोळीचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई हा सध्या तिहार तुरुंगात कैदेत आहे. असे असूनही त्याच्या टोळीच्या नावाने एवढा मोठा गुन्हा घडतो व त्याचे धागेदोरे थेट अमेरिका आणि कॅनडापर्यंत पोहोचतात ही अतिशय गंभीर आणि दखलपात्र बाब आहे. एकेकाळी दाऊद टोळीने मुंबईत थैमान मांडले होते. दाऊदचे प्रस्थ पुढे कमी झाले, परंतु सध्याच्या परिस्थितीत हे जे लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार, रोहित गोडारा वगैरे नवे टोळीबाज निर्माण झालेले आहेत, त्यांच्याविरुद्ध सरकारने व्यापक मोहीम राबवण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. ह्या टोळीच्या पदरी भारतातील विविध राज्यांमधील गुन्हेगार आहेत आणि त्यांना भरपूर पैशाचे आणि गुन्ह्यानंतर विदेशात स्थायिक करण्याचे आश्वासन देऊन आपल्याला हवे ते गुन्हे करण्यास प्रवृत्त केले जाते असे दिसते. सलमानवरील हल्ल्यासाठी ज्या दोघा गुन्हेगारांचा वापर झाला, त्यांनी अवलंबिलेली कार्यपद्धती पाहिली, तर किती बारकाईने ह्या हल्ल्याचे नियोजन केले गेले होते ते दिसते. हे दोघेही गुन्हेगार पनवेलमध्ये भाड्याची खोली घेऊन राहिले. पनवेलमध्ये सलमानचे फार्महाऊस आहे त्यामुळे तेथे त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही झालेला असू शकतो. यापूर्वी पनवेलच्या फार्महाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या अन्य दोघांना अटकही झाली आहे. सलमानचे चाहते असल्याचे भासवून त्याच्या कर्मचाऱ्यांशी सलगी करण्याचा आणि त्याद्वारे सलमानचा दिनक्रम जाणून घेण्याचा ह्या टोळीचा प्रयत्नही यापूर्वी उघडकीस आला होता. पनवेलमधूनच एक जुनी मोटारसायकल या दोघा हल्लेखोरांनी विकत घेतली होती. त्या मोटारसायकलवरून येऊन त्यांनी सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटमधील सदनिकेच्या दिशेने गोळ्या झाडल्या. हा केवळ ट्रेलर आहे असे सूचित करण्याचा ह्या टोळीचा इरादा त्यातून स्पष्ट होतो. ह्या हल्ल्यापूर्वी त्यांनी चार वेळा तेथे रेकी केली होती. गोळीबार केल्यानंतर हे दोघे वांद्य्राच्या माऊंट मेरी चर्चजवळ गेले. तेथे त्यांनी मोटारसायकल टाकून दिली व काही अंतर चालल्यावर रिक्षाने वांद्रे रेल्वे स्थानकावर गेले. रेल्वेतून सांताक्रुजला उतरले व रिक्षाने वाकोल्याला गेले. तेथून गुजरातमध्ये पळाले. हे सगळे एवढे नियोजनबद्ध पलायन करण्यात त्यांना निश्चितच इतर कोणाचे साह्य मिळाले असेल. सीसीटीव्हीवर चेहरे दिसल्याने हे गुन्हेगार पकडले गेले, परंतु त्यांना आपल्याला अटक झाल्याची फिकीर दिसत नाही. सीसीटीव्हीवर चेहरा दिसू नये असा प्रयत्नही त्यांनी केलेला दिसत नाही. म्हणजेच जी टोळी ह्या हल्ल्यामागे आहे, तिने त्यातून आपला मतलब साध्य केलेला आहे. आजवरच्या विविध हत्यांतून ह्या टोळीने जो दरारा आणि दहशत निर्माण केलेली आहे, ती मोडून काढण्याची आता वेळ आलेली आहे. सलमानवरील गोळीबाराच्या घटनेनंतर लॉरेन्सचा भाऊ फेसबुकवरून हल्ल्याची जबाबदारी घेतो, हल्ल्यामागे नेमके कोण आहे हेही सांगतो हे सारेच धक्कादायक आहे. एवढ्या खुलेआम अशा धमक्या देणे, प्राणघातक हल्ले चढवणे अशा गोष्टी घडू लागल्या तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत असेच समजावे लागेल. ह्या टोळीचा वावर बहुराज्यीय तर आहेच, परंतु विदेशांतही आहे. सलमानवरील हल्ल्याचे नियोजन तर विदेशातून झालेले होते असे दिसते. त्यामुळे भारत सरकारने ह्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन वेळीच ह्या टोळ्या मोडून काढण्याची आवश्यकता आहे. काट्याचा नायटा होण्यापूर्वीच तो काढणे आवश्यक असते. म्होरके तुरुंगात असतानाही टोळी सक्रिय राहते, आपल्याला हव्या त्या व्यक्तीला लक्ष्य बनवू शकते, त्यासाठी वारंवार धमक्या देते, हल्ले चढवते ही बाबच ह्या विषयाच्या गांभीर्याकडे अंगुलीनिर्देश करते. त्यामुळे केवळ हत्येच्या प्रयत्नाची कलमे नव्हे, हा दहशतवाद मानून पुढील कारवाई व्हावी, तरच त्याचा निःपात होईल.