दक्षिण गोवा व उत्तर गोवा यांना जोडणारा दुवा असलेला अत्यंत महत्त्वाच्या अशा जुवारीनदीवरील समांतर पुलाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल अद्याप केंद्राला पाठवून दिलेला नाही. त्यासंबंधीची प्रक्रिया चालू असली तरी या पुलाचे बांधकाम कधी सुरू होईल, हे बांधकाम खात्यालाही सांगणे शक्य होत नाही.दरम्यान, डीपीआर लवकरच केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाला पाठविणार असल्याचे खात्याच्या संबंधित अभियंत्यांनी सांगितले. डीपीआर तयार करण्याची प्रक्रिया बर्याच काळापासून चालू आहे. सरकार अधिकृतपणे जुवारी पूल भक्कम असल्याचे सांगत असले तरी कॅटीलीव्हर पद्धतीचा हा पूल दिवसेंन दिवस कमकुवत होत आहे. या पुलावरून प्रवास करताना प्रवासी जीव मुठीत घेऊनच प्रवास करीत असतात. त्यामुळे पुलाचे प्राधान्यक्रमाने बांधकाम करावे, अशी वाहनचालक तसेच प्रवाशांचीही मागणी आहे.
पुलाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर ते पूर्ण करण्यासाठी किमान ३ वर्षांची गरज असल्याचे साबांखामंत्री सुदिन ढवळीकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते. डीपीआर अद्याप केंद्राला न पाठविल्याने या पुलासंबंधीच्या प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाची सुरुवात होण्यास वर्षापेक्षा अधिक काळ लागण्याची शक्यता आहे.
सरकारने सध्या खांडेपार पुलाचे काम लवकर हाती घेण्याचे ठरविले आहे. त्यामुळे १७० कोटी रुपये खर्चाच्या या पुलाची आर्थिक बोली गुरुवार दि. ३० रोजी उघडणार असल्याचे या विभागाचे मुख्य अभियंते पार्सेकर यांनी सांगितले. तसेच ढवळी बगल रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी मंत्री ढवळीकर यांनी लक्ष केंद्रित केले असून त्याची आर्थिक बोली आज उघडणार असल्याचे सांगण्यात आले.