गोवा शालान्त मंडळाकडून मान्यता
गोवा शालान्त मंडळाच्या संचालक मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत नवनी इयत्तेसाठी एक कौशल्य विषय चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याच्या प्रस्तावाला संमती देण्यात आल्याचे शालान्त मंडळाचे अध्यक्ष जे. एफ. रिबेलो यांनी सांगितले. चालू वर्षी राज्यातील ३८ सरकारी विद्यालयातून कौशल्य विषय शिकवण्यात येईल व चालू वर्षी नववी इयत्तेत तर पुढील वर्षी दहावी इयत्तेतही तो शिकवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
हा अतिरिक्त विषय असून तो ऐच्छिक असेल. मात्र, हा विषय घेणारा विद्यार्थी गणित, विज्ञान, इंग्रजी, भूगोल, हिंदी, मराठी आदी विषयांपैकी जर एका विषयात अनुत्तीर्ण झाला तर त्याला उत्तीर्ण ठरवून दहावी इयत्तेत प्रवेश देण्यात येणार असल्याचे रिबेलो यांनी स्पष्ट केले. कौशल्य विषय घेणार्या विद्यार्थ्यांच्या एकूण विषयांची संख्या सात होईल. मात्र, या सात विषयांपैकी सहा विषयात तो विद्यार्थी उत्तीर्ण झाला की दहावी इयत्तेत प्रवेशाचा त्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यंदा नववी इयत्तेत तर पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावी इयत्तेतही कौशल्य विषय लागू करण्यात येणार आहे.
कौशल्य विषयात ऑटोमोबाईल (तांत्रिक), आरोग्य काळजी (वैद्यकीय), किरकोळ विक्री (वाणिज्य) व आयटीईएस म्हणजेच माहिती तंत्रज्ञान सेवेसंबंधीचा अभ्यासक्रम (तांत्रिक) या विषयांचा समावेश असेल व या चार विषयांपैकी कुठलाही एक विषय विद्यार्थ्याला घ्यावा लागेल. हा विषय घेणार्या विद्यार्थ्याला ६० टक्के हे गुण प्रात्यक्षिकासाठी (प्रॅक्टिकल्स) असतील, असे रिबेलो यांनी स्पष्ट केले. कौशल्य विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळी वर्ग भरवण्यात येतील. तसेच वाया गेलेले चार महिने भरून काढण्यासाठी सुट्टीतही वर्ग भरवण्यात येणार आहेत.
दरम्यान, सोमवारच्या बैठकीत यंदाच्या दहावीच्या एका किंवा दोन विषयात अनुत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांना एटीकेटीची सुविधा न देण्याचा व त्याऐवजी जून महिन्यात पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही रिबेलो यांनी स्पष्ट केले.