नववर्ष शुभेच्छा!

0
61

कोविड महामारीच्या सावटाखालील आणखी एक वर्ष सरले. नववर्षाचा नव्या उमेदीचा सूर्य आज उगवला आहे. गेल्या वेळीही आपण अशाच आशेने आणि मोठ्या अपेक्षांनिशी नववर्षाला सामोरे गेलो होतो, परंतु कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने दिलेला तडाखा, प्राणवायूअभावी तडफडून झालेले मानवी मृत्यू याचे व्रण आणि ओरखडे सर्वांना निराशेच्या खाईत ढकलून गेले. गेल्या वर्षभरामध्ये लसीकरणाच्या आघाडीवर आपण मोठा पल्ला गाठला ही आशादायक बाब, परंतु परिस्थिती निवळत आहे असे वाटत असतानाच अवतरलेल्या ओमिक्रॉनने सध्या वाढू लागलेला संसर्ग नववर्षात तिसर्‍या लाटेला तर घेऊन येणार नाही ना ही चिंता ह्या नववर्षाच्या प्रारंभी दूर सारता येत नाही. गेल्या वर्षी भारतात २०२० मधील कोरोना रुग्णांच्या जवळजवळ दुप्पट म्हणजे दोन कोटी चाळीस लाख रुग्ण आढळले. एक लाख ऐंशी हजार लोकांचा मृत्यू झाला. जगात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या दर दहा व्यक्तींमध्ये एक भारतीय असे हे प्रमाण होते. जगातील एकूण कोरोना रुग्णांपैकी १२.४ टक्के रुग्ण गतवर्षी भारतामध्ये आढळून आले. या परिस्थितीत आज आपण नववर्षात कोरोनाच्या नव्या रूपाला सामोरे जात आहोत हे भान ठेवावे लागेल.
एकीकडे महामारी झेलत असताना दुसरीकडे आपले जनजीवन सामान्य स्थितीत आणण्याचेही प्रयत्न झाले. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक लक्षणीय घटना गेल्या वर्षभरामध्ये घडल्या. शेतकरी आंदोलनासारखी सरकारला नमवणारी व्यापक आंदोलने आपण पाहिली. अफगाणिस्तानमधून महाशक्ती अमेरिकेचे पलायन पाहिले, पश्‍चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जींनी निकराने दिलेली झुंज पाहिली, सव्वाशे वर्षांत प्रथमच विनाप्रेक्षक झालेल्या ऑलिंपिक सामन्यांतील भारतीय खेळाडूंची देदीप्यमान कामगिरी आपल्याला स्तिमित करून गेली. पँडोरा पेपर्समध्ये तीनशे भारतीयांची नावे आलेली आपण पाहिली. अवकाशवेध घेणार्‍या एलन मस्कपासून कोट्यवधींचे घबाड घरात दडवणार्‍या पियूश जैनपर्यंत नाना वृत्तीप्रवृत्तीच्या माणसांनी आपला भलाबुरा ठसा गतवर्षावर उमटवला. एकीकडे ह्या लोकांची अवैध संपत्तीची ही लालसा, तर दुसरीकडे सर्रास दिसून आलेली जीवनातील अनिश्‍चितता यांच्या हिंदोळ्यांवर आपण हिंदकळत राहिलो. कोरोनाने कोट्यवधी लोकांचे रोजगार गेले, त्यांचा रोजचा संघर्ष अधिक गडद केला. महापूर, तौक्तेसारख्या नैसर्गिक आपत्तींनीही तडाखे दिले. वर्षभरात खूप काही घडले आणि बिघडलेही!
गतवर्ष हे गोव्याच्या मुक्तीचे हीरकमहोत्सवी वर्ष होते. एकीकडे त्याचे सोहळे साजरे होत असताना दुसरीकडे या सहा दशकांत घडलेले राजकीय अधःपतनही आपण अनुभवले. लालसेने जीभ बाहेर काढलेल्या मंत्र्याचे व्हायरल झालेले छायाचित्र हा गतवर्षाचा ‘फोटो ऑफ द इयर’ ठरावा!
स्वार्थी, निर्लज्ज पक्षांतरे, नोकरभरतीतील लाचखोरी, मंत्र्यांचे सेक्स स्कँडल हे सगळे एकीकडे तर दुसरीकडे जनतेच्या वाट्याला खड्डेमय रस्ते, बंद पडलेले व्यवसाय आणि निसर्ग, पर्यावरण, रोजगार यांच्या रक्षणासाठी द्यावी लागलेली झुंज अशा संमिश्र अनुभवाचे गतवर्ष मागे सारून आपण नववर्षाला आज सामोरे जात आहोत. मोलेपासून मेळावलीच्या आंदोलनापर्यंत, ओल्ड गोवाच्या लढ्यापासून अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनापर्यंत अनेक संघर्ष या महामारीच्या वर्षातही रस्त्यावर उतरून लढले गेले.
हे निवडणुकांचे वर्ष आहे. राजकीय अधःपतनाचे नवनवे अध्याय येणार्‍या काळात लिहिले जाणार आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोना महामारीचा सामना निर्धाराने करताना दुसरीकडे ह्या राजकीय महामारीलाही आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यासाठी हवा आहे असीम निर्धार. हे नववर्षही आव्हानात्मक असेल. आपल्या धैर्याची, निर्धाराची आणि सहनशीलतेचीही कसोटी पाहणारे असेल. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन, त्यापासून धडा घेऊन या नववर्षामध्ये मार्ग आक्रमावा लागेल. कोरोनाला घरच्या उंबरठ्याबाहेर थोपवायचे सर्वांत मोठे आव्हान या वर्षात आपल्या सगळ्यांपुढे आहे. अधिक दक्षता, अधिक जागरूकता याद्वारेच आपण हे संकट थोपवून धरू शकू. महामारीचा हा वैश्विक वणवा लवकर विझेल, पुन्हा एकदा सारे सामान्य होईल अशी आशा पुन्हा एकदा बाळगायला काय हरकत आहे? महामारीच्या कहरातही फुले फुलताहेत ना? सूर्य – चंद्र उगवत आहेत ना? रोज सकाळी कोवळे प्रकाशकिरण पसरत आहेत ना? मग आपल्याच मनामध्ये अंधार कशासाठी ठेवायचा? तिमिरातून तेजाकडचा प्रवास या नववर्षातही सुरू ठेवूया. सर्वांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!