राज्यात नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्र किनारी भाग व इतर ठिकाणी संगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी राज्यात अतिमहनीय नेते, सेलिब्रिटी, देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत.
या काळात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलीस यंत्रणेकडून गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून श्वानपथक आणि ड्रोनचा वापर केला जात आहे. किनारी व इतर भागात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रमुख बाजारपेठ, रेल्वे, बसस्थानकावर पोलीस गस्त सुरुवात करण्यात आली आहे. उत्तर गोव्यातील कळंगुट व इतर किनारी भागात वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहे.
जुने गोवे येथेही पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने पोलिसांची संख्या वाढविण्यात आली आहे. जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियरच्या अवषेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आणि पर्यटकांची संख्या वाढली आहे.