नववर्षाचा संकल्प म्हणून देशी उत्पादने वापरा

0
255

>> ‘मनकी बात’ मधून पंतप्रधानांचे आवाहन

विदेशी उत्पादनांच्या जागी जनतेने भारतीय स्वदेशी उत्पादने वापरावीत असे आवाहन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षीच्या आपल्या शेवटच्या ‘मनकी बात’ कार्यक्रमात केले. नववर्षात जनतेचा हा संकल्प असावा असे ते म्हणाले. आपल्या सरकारने ‘व्होकल फॉर लोकल’ मोहीम चालवली असून ‘आत्मनिर्भर भारता’चे स्वप्न साकारायचे असेल तर भारतामध्ये उत्पादित होणार्‍या वस्तूंचा वापर जनतेने केला पाहिजे असे ते म्हणाले. आपल्या देशामध्ये जागतिक दर्जाच्या उत्पादनांची निर्मिती केली जावी असे आवाहन त्यांनी देशातील उद्योजकांना केले.

देशात कोणकोणती विदेशी उत्पादने वापरली जातात त्याची यादी बनवून जनतेने त्यांना भारतीय पर्याय शोधावेत असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. यापुढे भारतीय जनतेच्या घामातून निर्माण झालेल्या वस्तूंचाच वापर करायचा संकल्प करूया असेही पंतप्रधान म्हणाले.
अनेक उत्पादकांनी खेळण्यांसारख्या वस्तूंमध्ये भारतीय उत्पादनांना प्राधान्य देण्यास सुरूवात केली असून ग्राहकही त्यांची मागणी करीत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
देशातील नागरिकांच्या मानसिकतेमध्ये हा मोठा बदल होत असताना दिसत असून त्यातून देश आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करील असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. काश्मिरी केशर जागतिक ब्रँड बनविण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जीआय टॅगने त्याला अनोखी ओळख मिळवून दिलेली असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधानांच्या भाषणावेळी
शेतकर्‍यांनी वाजवल्या थाळ्या
मनकी बातमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करीत असताना त्यावेळी नव्या कृषिकायद्यांच्या विरोधात आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी थाळ्या वाजवत आपला निषेध नोंदवला. दिल्लीबाहेरची सिंघू सीमा, पंजाबातील फरिदकोट आणि हरियाणातील रोहतक येथे हे आंदोलन झाले. ‘‘आम्ही तुमची मनकी बात ऐकून ऐकून कंटाळलो आहोत, तुम्ही आमची मनकी बात कधी ऐकणार आहात?’’ असा सवाल योगेंद्र यादव यांनी यावेळी केला.