नवरात्रोत्सव ः आदिशक्तीचा गजर

0
22
  • लक्ष्मण पित्रे

नवरात्रोत्सव हा आदिशक्तीच्या उपासनेचा उत्सव आहे. दुर्गेच्या प्रतिमेत आम्ही स्त्रीशक्तीची विविध रूपं पाहतो. तामसरूपात महाकाली, राजसरूपात महालक्ष्मी आणि सात्त्विक रूपात महासरस्वती अशी ती आदिशक्ती आपल्यासमोर प्रकट होते. तिच्याकडून सामर्थ्य, संपत्ती आणि विद्या या गोष्टी आपणास प्राप्त करून घ्यायच्या असतात. या उत्सवातून स्त्रीरूपाच्या एका समर्थ प्रतिमेचा आपणास साक्षात्कार होतो.

आमच्या हिंदुसंस्कृतीत आदिशक्तीला खूप महत्त्व आहे. शारदीय नवरात्र हा आदिशक्तीचा उत्सव आहे. आश्विन महिन्यापासून शरद ऋतूला प्रारंभ होतो. शारदातील पहिला उत्सव म्हणून शारदीय म्हणतात. ही एक उपपत्ती आहे. तसेच या उत्सवात शारदेलाही महत्त्व असल्याने शारदीय म्हटले जाते. हे मुख्य नवरात्र असते. तशी पांडुरंग, दत्त, राम, कृष्ण, शाकंभरी, खंडोबा या इतर देवांचीही नवरात्रे वेगवेगळ्या महिन्यात साजरी होतात.
दुर्गा हे देवीचे रूप आहे. ती शिवपत्नीच्या रूपात आपल्यासमोर येते. उमा, गौरी, पार्वती, चंडी, चामुंडा, काली कपालिनी, विजया, भवानी अशी तिला अनेक नावे आहेत. गौरी, पार्वती, उमा या सौम्य रूपांत ती आमच्या कल्याणासाठी येते, तर चंडी, चामुंडा, काली इत्यादी रौद्र रूपांत ती आमच्यावर संकटे आणणाऱ्या असुरांच्या नाशार्थ अवतीर्ण होते.

तशी आदिम काळापासून मातृदेवतेची पूजा प्रचलित होती. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या नावांनी तिची पूजा केली जात असे. पण पुराणकारांनी या सगळ्या देवींना एकत्र आणून दुर्गादेवतेची कल्पना केली. वेदांत महालक्ष्मी आहे, महासरस्वती आहे पण दुर्गा आढळत नाही. ‘रामायण’ आणि ‘महाभारता’त दुर्गेचे महत्त्वपूर्ण उल्लेख आहेत. त्यावरून, तोपर्यंत दुर्गेचे प्रचलित रूप प्रस्थापित झाले होते असे म्हणता येते. रावणाने सीताहरण केले तेव्हा नारदाने रामाला हे नवरात्र व्रत करण्याचा उपदेश केला. रामाने व्रत केले तेव्हा अष्टमीच्या मध्यरात्री देवीने त्याला दर्शन देऊन सांगितले की, रावणाचा वध तुझ्याच हातून होईल. त्यानंतर लगेचच रामाने हल्ला करून रावणाचा वध केला. तो दिवस होता नवरात्रानंतर दसऱ्याचा! ‘महाभारता’त कृष्ण अर्जुनाला दुर्गास्तोत्राचे पठन करायला सांगतो. तेव्हा अर्जुन रथातून उतरून ते स्तोत्र म्हणतो. दुर्गा तेथे प्रकट होते आणि त्याला अजिंक्य होण्याचा वर देते, असे वर्णन आहे.

पुढे पुराणांनी दुर्गेचे रूप अधिक स्पष्ट केले आणि तिला शिवपत्नी बनविले. दुर्गा शब्दातील प्रत्येक अक्षराला अर्थ आहे. दैत्यनाश केला म्हणून ‘द’ उकार हा विघ्ननाश करणारा, ‘रेक’ हा रोगनाशक आहे, ‘ग’ हा पापनाशक, तर आकार शत्रू व भय यांचा नाश करणारा आहे असे वेद म्हणतात.
दैत्यनाशार्थंवचनो दकारः परिकीर्तितः।
उकारो विघ्ननाशस्य वाचको वेदसंमतः॥
रेको रोगघ्नवचनो गच पापघ्नवाचकः।
भय शत्रुघ्नवचनः आकारः परिकीर्तितः॥
‘दुर्ग’ नामक दैत्याचा देवीने वध केला म्हणून ‘दुर्गा’ हे नाव पडले अशीही कथा आहे. दुर्गा ही सर्व देवांचे तेज घेऊन जन्माला आली असे ‘मार्कंडेय पुराणा’त म्हटले आहे. शिवतेज मुखात, यमतेज केसांत, विष्णुतेज भुजांमध्ये, इंद्रतेज कटीमध्ये, भूमितेज नितंबामध्ये, वसुतेज बोटांमध्ये, कुबेरतेज नाकामध्ये, प्राजापत्यतेज दातात, अग्नितेज त्रिनेत्रात, सांध्यतेज भुवयात, वायुतेज कानात घेऊन ती तेजोमूर्ती जन्मली असे वर्णन आहे. अशा या देवीची आराधना आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून सुरू होते. हे एक काम्य व्रतही आहे, पण कित्येक घरांत ते कुळाचार म्हणून पाळले जाते. आश्विन प्रतिपदेला सोळा हात चौरस मंडप उभारतात. तिथे एक वेदी तयार करतात. त्या वेदीवर सिंहारूढ अष्टभुजा देवीची स्थापना करतात. मूर्ती नसली तर नवार्ण मंत्राची स्थापना करतात. मंत्राशेजारी घट स्थापून त्याची व देवीची यथाविधी पूजा केली जाते. व्रतधारी व्यक्तीने नऊ दिवस उपवास करून व्रतस्थ राहायचे असते. या नऊ दिवसांत सप्तशतीचा पाठ केला जातो. अखंड दीप लावले जातात. रोज एक किंवा चढत्या क्रमाने (म्हणजे आज एक, उद्या दोन अशा क्रमाने) माळा बांधतात. वेदीवर नऊ धान्यांचे रुजवण घातले जाते. नऊ दिवस कुमारीपूजन केले जाते. काही ठिकाणी होमहवन आणि बलिदानही क्वचित केले जाते. शेवटी स्थापित दीप आणि देवी यांचे नऊ दिवसांनी उत्थापन केले जाते.

देवीची मूर्ती नसेल तर नवार्ण मंत्र स्थापन करावा असे जे सांगितले आहे तो नवार्ण मंत्र ‘ऐं ऱ्हीं क्लीं चामुण्डायै विच्चे’ असा आहे. तो खूपच प्रभावशाली मंत्र आहे. हा मंत्र नवाक्षरी असून त्रैलोक्यपावक आहे. या मंत्राचा जो श्रद्धेने जप करतो त्यावर कामिनी वश होतात, राजे प्रसन्न होतात, हत्ती, सर्प, दावाग्नी, चोर, शत्रू यांचे भय राहत नाही आणि चंडिकेची पूर्ण कृपा होऊन समृद्धी प्राप्त होते असे सांगितले आहे.
त्या उत्सवात मी पूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे सप्तशती आणि देवी भागवत यांचा पाठ केला जातो. ‘देवी भागवत’ हे एक उपपुराण असून त्यात 12 स्कंध आणि 18000 श्लोक आहेत. आदिशक्ती दुर्गेचे माहात्म्य वर्णन करणे आणि तिच्या उपासनेच्या विधिविधानाचे सांगोपांग निरूपण करणे हा या पुराणाचा विषय आहे. दुर्गा हेच परमतत्त्व, आणि ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिच्याच प्रभावाखाली आहेत असे हे पुराण सांगते. याच्या सातव्या स्कंधात देवीगीता आहे. त्यात देवी कृष्णाप्रमाणेच ‘यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति’ असे म्हणते आणि ‘तदा वेषान्‌‍ बिभर्म्यहम्‌‍।’ असे आश्वासन देते.

दुसरा सप्तशती हा ग्रंथ म्हणजे मार्कंडेय पुराणाचा भाग आहे. त्याच्या 81 ते 92 अध्यायातले सातशे श्लोक म्हणजे सप्तशती होय. सप्तशतीत तमोगुणी महाकाली, रजोगुणी महालक्ष्मी आणि सत्त्वगुणी महासरस्वती ही दुर्गेचीच रूपं आहेत असे सांगितले आहे. चंड, मुंड, शुंभ, निशुंभ, रक्तबीज आणि महिषासुर या उन्मत्त दैत्यांचा मी पराक्रमपूर्वक वध करते असे तिने म्हटले आहे.
देव्युपनिषद या ग्रंथात तर देवीला ब्रह्मरूपच मानले आहे- ‘साऽब्रवीदहं ब्रह्मरुपिणी।’
देवीचे सिंह वाहन म्हणजे साक्षात धर्म असे म्हटले आहे. अष्टभुजा सिंहवाहिनी ही देवी नऊ दिवस मोठा पराक्रम करून शुभं, निशुंभ, चंड, मुंड, रक्तबीज आणि महिषासुर अशा उन्मत्त बलाढ्य असुरांचा वध करते असे देवीपुराणात आणि सप्तशतीत सांगितले आहे.

नऊ दिवसांच्या या उत्सवात अखंड दीप पेटता ठेवण्याला महत्त्व आहे. तसे दिव्यालाच आपल्या संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘तमसो मा ज्योतिर्गमय।’ ही आपली प्रार्थना आहे. अग्नी हे एक महाभूत वणव्याच्या संहारक रूपात आणि दिव्याच्या सौम्य, कल्याणकारक रूपात आपल्यासमोर येते. आमच्या प्रत्येक धर्मकृत्यात स्थापितदीप असतो. दिव्यांनी मंगलप्रसंगी ओवाळणे असते, दीपदान असते, दीपपूजनही असते. येथे नऊ दिवस अखंड दीप तेवत ठेवण्याचे कारण उपासनेची अखंडता, प्रयत्नांचे सातत्य आणि मांगल्याचा निवास अधोरेखित करणे, हेच असते.

नवरात्राच्या पाचव्या दिवशी ललितापंचमी साजरी करतात. ललिता हे दुर्गेचेच एक रूप आहे. पाचव्या दिवशी दुर्गेची ललितारूपात पूजा करतात. उपांगललिताव्रत असे एक काम्य व्रतही आहे. एका करंड्याचे झाकण तिचे प्रतीक म्हणून वापरतात. तिचे ध्यान असे आहे-
नील कौशेयवसनां हेमाभं कमलासनाम्‌‍।
भक्तांना वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम्‌‍॥
ललितेला दूर्वा अर्पण करून घारग्यांचे वायन देतात. या व्रताची एक कथा आहे. भृगुक्षेत्रात गौतम या ब्राह्मणाचे श्रीपती आणि गोपती असे दोन पुत्र असतात. तो मरण पावल्यावर त्याची पत्नी सती जाते आणि ते दोघे अनाथ बनतात. त्यांची संपत्ती लुबाडून त्यांचा चुलता त्यांना हाकलून देतो. विशालनगरातील दुसरा एक ब्राह्मण त्यांना आश्रय देतो. त्याच्याकडे होणारे उपांगललिताव्रत पाहून तेही ते करतात. त्यांना फळही मिळते. तो ब्राह्मण श्रीपतीला आपली मुलगी गुणवती देऊन जावई करतो. त्यांच्या काकालाही पश्चात्ताप होतो. ते घरी जातात. गोपती जरा व्रात्यच असतो. तो काही पूजा करीत नाही. श्रीपती मात्र पूजा करून श्रीमंत होतो. गोपतीला त्याची बायको टोमणे मारते. तो उपांगनगरात जातो. तिथे ललितेची देवळात पूजा करतो. देवी राजाकडे करंड्याचे झाकण माग म्हणून सांगते. तो करंडकाचे झाकण घेऊन घरी येतो आणि त्या झाकणाची पूजा करतो अन्‌‍ श्रीमंत होतो अशी ती कथा आहे.

नवरात्राच्या आठव्या दिवशी सरस्वतीपूजन करतात. तसेच महालक्ष्मीची पूजा करून घागरी फुंकण्याचा कार्यक्रम विशेषतः कोकणात होतो. नवव्या दिवशी कुमारीपूजन केले जाते. खरे म्हणजे ते दररोजच करावे असे सांगितले आहे किंवा चढत्या क्रमाने आज एक, उद्या दोन… अशा प्रकारे ते करावे असे विधान आहे. कुमारी म्हणजे दोन वर्षांपासून दहा वर्षांपर्यंतची कन्या (ऋतुमती न होणारी) असावी. देवीच्या पूजेनंतर तिची पूजा पुढील मंत्राने करतात-
मन्त्राक्षरमयीं लक्ष्मीं मातृणां रुपधारिणीम्‌‍।
नवदुर्गात्मिकां साक्षात्‌‍ कन्यामावाह्याम्यहम्‌‍॥
मग तिचे पाय धुवून, चौरंगावर बसवून, गंध-फुले देऊन, गळ्यात फुलमाळा घालून, पंचामृत आणि मिष्टान्न देऊन तिची पूजा केली जाते. नवव्या दिवसाला ‘खंडेनवमी’ असेही म्हणतात. त्या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते आणि त्या दिवशी नवरात्र संपते.

इतर सर्व उत्सवांप्रमाणे या उत्सवालाही धार्मिक स्वरूपाबरोबरच एक सामाजिक स्वरूपही असते. पूजा, आरत्यांबरोबरच प्रवचने, कीर्तने यांचेही कार्यक्रम नऊही दिवस चालतात. देवीची महती आणि इतर धार्मिक विषयांवर या दिवसांत निरुपण केले जाते. अशा प्रसंगी सात्त्विक असे मनोरंजनाचे कार्यक्रम संपन्न होतात. गुजराती समाजात गर्बा आणि दांडियानृत्याचा मोठाच कार्यक्रम होतो. आता तो भारतभर पसरलेला दिसून येतो. यानिमित्ताने समाजातल्या विविध स्तरातले लोक एकत्र येतात. त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो, ओळखीदेखील वाढतात आणि परस्पर बंधुभावही वाढीस लागतो.

भारतात सर्वत्र हा उत्सव साजरा होतो. बंगाल, बिहार, ओरिसा, आसाम, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा या साऱ्या प्रदेशांत हा उत्सव साजरा होत असला तरी बंगालात दुर्गापूजेचे विशेष प्रस्थ आहे. तिथे दुर्गेची मातीपासून दशभूजा मूर्ती तयार करतात. तिचे रूप सिंहारूढ महिषासुर मर्दिनीचे असते. तिच्या दोन्ही बाजूनी कार्तिकेय, गणेश, लक्ष्मी आणि सरस्वती यांच्या मूर्ती असतात. बंगालात वैयक्तिक आणि सार्वजनिक अशा दोन्ही प्रकारे दुर्गापूजा साजरी होते.

उत्सवाची सुरुवात आश्विन शुद्ध पंचमीला होते. त्या संध्याकाळी बोधनविधी असतो. म्हणजे बेलाच्या वृक्षावर दुर्गेचे आवाहन करतात. षष्ठीच्या दिवशी अधिवासविधी असतो. त्या दिवशी देवीच्या वेगवेगळ्या अंगांना विभिन्न वस्तूंचा स्पर्श करून त्यांचे पावित्र्य वाढवतात. सप्तमीला पूजेला सुरुवात होते. बेल, डाळिंब, हळद आणि नऊ तऱ्हेच्या पानांची एक पेंडी करतात. तिला स्नान घालून साडी नेसवतात. ती असते कदलीबहू. ही गणपतीची पत्नी. तिला त्याच्याजवळ स्थापन करतात. मग महास्नानविधी होतो. एका कलशावर आरसा ठेवून त्यातून पडलेल्या प्रतिबिंबावर सर्व विधी होतात. त्यानंतर देवीच्या परिवारदेवतांची पूजा होते. अशीच पूजा अष्टमी आणि नवमीलाही होते. शिवाय या दोन दिवशी संध्याकाळी संधिपूजा होते. चौथ्या दिवशी मिरवणुकीने देवतांचे विसर्जन होते. हजार वर्षांपेक्षा अधिक काळ बंगालात ही प्रथा चालू आहे.

गुजरातेत गर्बा आणि दांडिया नृत्य केले जाते. गर्बा यातील मूळ शब्द ‘गर्भ’ असा आहे. सच्छिद्र अशा एका घटात दीप ठेवतात आणि त्याच्याभोवती नृत्य करतात. गर्भ शब्दाचा सर्जनाशी संबंध आहे. यावरून हा सृजनोत्सवाचा प्रकार आहे. आणि नृत्यातून उत्साहाला वाट मिळते व आनंदाचे, स्नेहाचे आदानप्रदान होते, बंधुभाव वाढतो. आजकाल नवरात्रोत्सवातील धार्मिक रूप कमी होऊन दिखावूपणा वाढल्याचे दिसते. गर्बा-दांडिया नृत्य यांच्या स्पर्धा, गडबड, कर्णकर्कश संगीत यांत मूळ उद्देशच बाजूला पडतो आहे असे वाटते. नवरात्राच्या शेवटी दसरोत्सव येतो. हा विजयोत्सव असतो. शस्त्रपूजा आणि सीमोल्लंघन हे या दिवसाचे मुख्य विधी असतात.
वस्तुतः नवरात्रोत्सव हा आदिशक्तीच्या उपासनेचा उत्सव आहे. दुर्गेच्या प्रतिमेत आम्ही स्त्रीशक्तीची विविध रूपं पाहतो. तिच्या ओजस्वी चरित्रातून अन्यायाविरुद्ध लढणारे उग्र रूप, हवं ते मिळविण्यासाठी प्रयत्न करणारे निश्चयी रूप, विविध प्रकारचे सामर्थ्य मिळवून त्याचा उपयोग करणारे योजक रूप, जीवमात्रांच्या कल्याणाची इच्छा करणारे वत्सल रूप अशी विविध रूपं आपणास दिसतात. सप्तशतीत सांगितल्याप्रमाणे तामसरूपात महाकाली, राजसरूपात महालक्ष्मी आणि सात्त्विक रूपात महासरस्वती अशी ती आदिशक्ती आपल्यासमोर प्रकट होते. तिच्याकडून सामर्थ्य, संपत्ती आणि विद्या या गोष्टी आपणास प्राप्त करून घ्यायच्या असतात. या उत्सवातून स्त्रीरूपाच्या एका समर्थ प्रतिमेचा आपणास साक्षात्कार होतो आणि स्त्री ही फक्त आनंद देणारी वस्तू नसून एक अखंड ऊर्जास्रोत आहे, तिचा योग्य मान ठेवला पाहिजे असा संदेश आम्हाला मिळतो.