राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी मंगळवार दि. १५ मार्च रोजी गोवा विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले असून, सकाळी ११.३० वाजता होणार्या या अधिवेशनात नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाणार आहे.
सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ १५ मार्चला संपणार असून, त्यापूर्वी हे अधिवेशन घेणे बंधनकारक आहे. या अधिवेशनासाठी सावर्डे मतदारसंघाचे आमदार गणेश गावकर यांची हंगामी सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती राज्यपालांचे सचिव मिहीर वर्धन यांनी काल दिली.
हंगामी सभापती म्हणून गणेश गावकर यांना सोमवार दि. १४ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता राजभवनात शपथ दिली जाणार आहे. त्यानंतर मंगळवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन पार पडणार असून, नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तीन दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन विधानसभा बरखास्तीचा ठराव संमत केला होता. त्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्याकडे हा ठराव सुपूर्द केला होता.
या ठरावानुसार शनिवारी राज्यपालांनी विधानसभा बरखास्तीचा आदेश जारी केला. तसेच नव्या मुख्यमंत्र्यांची निवड व नियुक्ती होईपर्यंत डॉ. प्रमोद सावंत यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नेमणूक केली होती.