- शंभू भाऊ बांदेकर
पाकिस्तानशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत असे वाटणार्या भारतीयांची व भारताशीही मैत्रिपूर्ण वातावरण निर्माण व्हावे असे वाटणार्या पाकिस्तानी नागरिकांची संख्याही बरीच मोठी आहे. पण ते संबंध लष्करप्रमुखांशी गळाभेट घेऊन कसे दूर होतील, हे मात्र न सुटणारे कोडे आहे
क्रिकेटमधून निवृत्त होऊन राजकारणात प्रवेश केलेल्या इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदावर आरूढ होऊन आता आपली सक्रिय राजकीय इनिंग सुरू केली आहे. आपण तसे सरकारी प्रशासनात नवखे आहोत, याची त्यांना जाणीव असल्यामुळे व पाक जनतेला सुशासन देता यावे म्हणून त्यांनी आपल्या २१ सदस्यांच्या मंत्रिमंडळात १६ सदस्य मंत्रिपदे सांभाळणार आहेत, तर पाच मंत्रिमंडळ सदस्य हे प्रत्यक्षात पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून काम पाहणार असल्याचे जाहीर केले आहे. प्रशासन चालवणे सोपे जावे आणि नव्या-जुन्यांचा समतोल सांभाळता यावा, म्हणून त्यांनी तब्बल १२ मंत्री हे पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख असलेले माजी पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य घेतले आहेत. एकूण पाकिस्तान देशाला लोकशाहीची गोड फळे चाखू देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे व तो स्तुत्य आहे असे माझे मत आहे; पण किमान सहा महिने उलटल्याशिवाय त्यांच्या बर्या वाईट कारकिर्दीवर भाष्य करणे संयुक्तिक होणार नाही.
पाकिस्तान हे आपले शेजारी राष्ट्र. या शेजारी राष्ट्राशी सलोख्याचे व सौहार्दाचे संबंध असावेत म्हणून भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत नेत्यांनी सातत्याने मित्रत्वाचा हात पुढे केला, पण टाळी जशी एका हाताने वाजत नाही, तशी मैत्री संपादन होण्यासाठी दोन्ही बाजूंनी शांततामय बोलणी होणे आवश्यक असते; पण पाकच्या नापाक कृत्यांमुळे अजून या बोलण्यांना म्हणावे तसे यश आलेले नाही. नाही म्हणायला अधूनमधून बस सफर, दळणवळण, व्यापार अशा चांगल्या घडामोडी घडल्या, पण पाकच्या भारतात आगळीक करण्याच्या प्रयत्नांमुळे काही दिवसांनंतर, काही महिन्यांनंतर त्यात खो पडत चालला आहे व हा खोखोचा खेळ अजूनही तसाच चालू आहे.
नाही म्हणायला इम्रान खान यांनी नव्याने सूत्रे हाती घेतल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा देताना दोन्ही देशांमधील सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा प्रकट केली आहे. भारतीय उपखंडात दहशतवाद संपून शांतता नांदावी, यामुळेच विकास व समृद्धी शक्य होईल असा आशावाद मोदींनी जागवला आहे. अर्थात याला कितपत यश येते हे नजीकच्या भविष्यकाळात दिसून येईल. तूर्त पाकच्या आगळिकी चालूच असल्यामुळे व त्या पार्श्वभूमीवरील नवज्योतसिंग सिद्धूच्या गळाभेटीमुळे भारतीयांमध्ये तरी नाराजीची व संतापाची भावना निर्माण झाल्याचे दृश्य दिसत आहे.
माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारमधील एक मंत्री असलेल्या सिद्धू यांनी इम्रान खान यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळ्यास हजर राहून पाकच्या लष्करप्रमुखांची जी गळाभेट घेतली, त्यामुळे देशामध्ये संतापाची ज्योत पेटल्याचे निदर्शनास येत आहे. याच्या तपशिलात जाण्यापूर्वी यापूर्वी भारत-पाकमध्ये असे प्रकार घडले होते व त्याबद्दलही त्या त्यावेळी राष्ट्राभिमानी भारतीयांनी संताप व्यक्त केला होता याचे स्मरण करून द्यावेसे वाटते.
उदाहरणार्थ, आपल्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी लाहोर बसयात्रा काढली तेव्हा तिचे कौतुकही झालेच, पण त्यांच्याच परिवारातील कट्टरतावाद्यांनी वाजपेयींची निर्भत्सना करायला कमी केले नव्हते. माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या लाहोर भेटीत बॅ. जिना यांची भलावण केली तेव्हाही त्यांना त्यांच्याच संघ परिवाराने त्यांना सुनावले होते. नरेंद्र मोदी जेव्हा गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते, तेव्हा पाकच्या गळ्यात गळा घातल्याबद्दल तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर त्यांनी टीका केली होती, पण तेच मोदी स्वतः पंतप्रधान झाल्यावर २०१५ साली आकस्मिकरित्या लाहोरला जाऊन तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची त्यांनी गळाभेट घेतली, तसेच शरीफ यांच्या नातीच्या विवाह सोहळ्यात त्यांनी हजेरी लावली. शरीफ यांचा वाढदिवस आणि त्यांच्या नातीचा विवाहसोहळा असा डबल धमाका पाहायला मिळाल्याचा आनंद मोदींनी व्यक्त केला होता. भाजपाने याबाबत उघडउघड बोलणे टाळले तरी संघ परिवाराने मोदींच्या या पूर्वघोषित नसलेल्या कार्यक्रमाबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि आता नवज्योतसिंग सिद्धूची गळाभेट ऐरणीवर आहे.
अटलजींच्या निधनानंतर जशी अटलजी – मोदींची तुलना करण्याचा प्रयत्न झाला व दोन्ही पंतप्रधानांच्या कार्यकाळातील परिस्थितीत प्रचंड अंतर आहे, त्यामुळे अशी तुलना करणे रास्त नव्हे, असे मतप्रदर्शन जसे मातब्बरांनी केले, त्याचप्रमाणे राहुल गांधी – नरेंद्र मोदी गळाभेट म्हणजे सिद्धू आणि पाकचे लष्करप्रमुख यांची गळाभेट नव्हे. तशी तुलनाच होऊ शकत नाही. भाजपवाल्यांनी तर नवज्योतसिंग सिद्धूची कडवट शब्दांत निर्भत्सना केलीच, पण ज्यांच्या सरकारात सिद्धू मंत्री आहेत, त्या पंजाब राज्याचे कॉंग्रेसचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि अन्य कॉंग्रेस पक्षनेत्यांनीही केलेल्या जाहीर टीकेला सिद्धू यांना सामोरे जावे लागत आहे.
भारताला जसे पाकिस्तानशी शांततापूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत, दोघांमध्ये दळणवळण, मालाची आयात-निर्यात चालू रहावी, असे सुरुवातीपासून वाटत आलेले आहे, त्याचप्रमाणे पाकिस्तानशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावेत असे वाटणार्या भारतीयांची व भारताशीही मैत्रिपूर्ण वातावरण निर्माण व्हावे असे वाटणार्या पाकिस्तानी नागरिकांची संख्याही बरीच मोठी आहे. पण ते संबंध लष्करप्रमुखांशी गळाभेट घेऊन कसे दूर होतील, हे मात्र न सुटणारे कोडे आहे, कारण काश्मीरवर ताबा मिळवण्यापासून ते दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पाकिस्तानचा झेंडा फडकवण्याचे स्वप्न त्या देशातील लष्कर गेली ७० वर्षे पाहत आहे व हे त्यांचे मनसुबे वेळोवेळी धुळीस मिळवण्याचे काम आपल्या लष्कराने केले आहे.
अशा वेळी पाकिस्तानी लष्करप्रमुखांशी सिद्धूने घेतलेली गळाभेट ही भारतीय मानसिकतेला न रुचणारी गोष्ट आहे. सीमेवर पाकिस्तानकडून सातत्याने हल्ले होत आहेत. त्याचबरोबर पंजाबमधील खलिस्तानी फुटीरतावाद्यांंना पाकिस्तानकडून अनेकदा मदत दिली गेली आहे. दहशतवाद्यांची पाठराखणही पाकिस्तान करीत आला आहे. या सार्या पार्श्वभूमीवरील या गळाभेटीने संतापाची ज्योत पेटवण्याचे काम नवज्योतने केले आहे.