डिचोलीचे माजी आमदार नरेश सावळ यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक (मगोप) पक्षाच्या कार्यकारी समितीचे अध्यक्षपद आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याकडे काल सुपूर्द केला. आगामी लोकसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार सावळ यांनी मगोपतून बाहेर पडले आहे. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छुक आहेत.
मगो पक्षाची संघटना तळागाळापर्यंत लोकांची कामे करण्यात अपयशी ठरल्याने लोकांचा पक्षाच्या नेत्यांवरील विश्वास उडाला आहे. मगो नेतृत्वाने पक्ष कार्यकर्त्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केले आहे, असे नरेश सावळ यांनी राजीनाम्यानंतर म्हटले आहे. माजी आमदार नरेश सावळ यांनी आगामी लोकसभा निवडणूक उत्तर गोव्यातून लढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. काही महिन्यांपूर्वी उत्तर गोव्यातील पेडणे व इतर भागात नागरिकांना गणेशोत्सव व इतर उत्सवांच्या शुभेच्छा देणारे फलक झळकले होते. दरम्यान, मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी सावळ यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे.