>> जे. पी. नड्डा, शिवराजसिंह चौहान यांनाही मंत्रिपद
>> श्रीपाद नाईक केवळ राज्यमंत्री
नरेंद्र मोदी यांनी काल रविवारी संध्याकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. असे करणारे ते नेहरूंनंतरचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील मोदींसह 72 मंत्र्यांनी काल शपथ घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या या सरकारमध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि 36 राज्यमंत्री शपथबद्ध झाले. या सर्वांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली.
एनडीएच्या या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांच्या प्रमुखांनी उपस्थिती लावली होती. शिवाय, एनडीएतील घटक पक्षांसह देशभरातील खासदार आणि बॉलिवडू कलाकार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. नवीन सरकारमध्ये एनडीएच्या विविध घटकांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षांमध्ये चर्चा झाली होती.
पंतप्रधान पदाची नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, शिवराजसिंह चौहान यांनी शपथ घेतली. आधी 2014, नंतर 2019 आणि त्यानंतर आता सलग तिसऱ्यांदा मोदी 3.0 च्या पर्वाला सुरुवात झाली आहे.
मोदींनी रविवारी सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यानंतर ते अटलजींच्या समाधी आणि राष्ट्रीय युद्धस्मारकावर गेले. सकाळी मोदींनी त्यांच्या निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक घेतली.
यावेळी शपथ घेण्याचा निश्चित क्रम ठरलेला होता. त्यानुसार, सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. त्यांच्यानंतर राजनाथ सिंह यांनी शपथ घेतली. तिसऱ्या क्रमांकावर अमित शाह यांनी शपथ घेतली. चौथ्या क्रमांकावर नितीन गडकरी तर पाचव्या क्रमांकावर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शपथ घेतली. नड्डांच्यानंतर शिवराज सिंह चौहान यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
सात देशांचे नेते उपस्थित
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यात शेजारील देश आणि इतर देशांतील अनेक नेते सामील झाले. यात श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, सेशेल्सचे उपराष्ट्रपती अहमद अफिफ, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे, नेपाळचे पंतप्रधान पुष्पाजी, कमल दहल प्रचंड, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार जुगनाथ यांनी उपस्थिती लावली होती.
कलाकारांची उपस्थिती
या शपथविधी सोहळ्याला भारतातील अनेक दिग्गजांनीही उपस्थिती लावली होती. यामध्ये अक्षय कुमार, शाहरुख खान, विक्रांत मेस्सी, रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, सुपरस्टार रजनीकांत, गौतम अदानी, कंगना राणावत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.