>> कुमारमंगलम बिर्ला यांची प्रतिक्रिया
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना बिर्ला उद्योग समूहाकडून लाच म्हणून कोट्यवधी रुपये देण्यात आल्याचा आरोप केला असला तरी या संदर्भात आपल्याला काहीच माहिती नाही अशी प्रतिक्रिया बिर्ला उद्योग समूहाचे चेअरमन कुमारमंगलम बिर्ला यांनी काल येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच मेहसाणा येथील एका जाहीर सभेत बोलताना वरीलप्रमाणे आरोप केला होता. काल येथे इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट संस्थेत कुमारमंगलम बिर्ला आले असता पत्रकारांनी त्यांना या अनुषंगाने विचारले असता ते म्हणाले, ‘याविषयी मला काहीच माहिती नाही आणि त्यावर काही बोलायची माझी इच्छाही नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.’ इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट या संस्थेच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी दोन महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने बिर्ला यांची नेमणूक केल्यानंतर ते प्रथमच या संस्थेत आले होते.
राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर वरील आरोप केल्यानंतर त्या आरोपांचे खंडन करण्यासाठी भाजपने नेत्यांची फळीच उभी केली होती. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांचे आरोप तथ्यहीन, खोटे, लज्जास्पद व गैरहेतूचे असल्याचे म्हटले होते.