– सु. ह. जोशी, पुणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे एक अद्वितीय, अद्भुत, असामान्य व्यक्तित्व, असेच म्हटले पाहिजे. या चमचमणार्या हिर्याला पैलू पाडण्याचे काम अनेकांनी केलेले आहे, त्यातील मा. मधुकरराव भागवत, मा. लक्ष्मणराव इमानदार, मा. केशवराव देशमुख, सर्वश्री गजेंद्रगडकर, चिपळूणकर, भगत आदींची थोडी फार माहिती वृत्तपत्रे, साप्ताहिके, दूरचित्रवाणी आदींवर येऊन गेली. नरेंद्र मोदी ह्या सर्वांप्रती अत्यंत कृतज्ञ आहेत. पण या सूचित काही नावे राहिलेली आहेत. त्यांचाही अवश्य परिचय करून घेतला पाहिजे. त्यातील एक महत्त्वाचे व्यक्तित्व म्हणजे अनंत रामचंद्र तथा अनंतराव काळे. त्यांचा परिचय येथे करून घेऊया.
अनंतराव काळे हे महाराष्ट्रातील थोडे विस्मृत झालेले व्यक्तिमत्व आहे. एकदा वाहिनीवर त्यांचा ओझरता उल्लेख, त्यांचे कोकणातील घर असे काही दाखवले होते, एका वृत्तपत्रातही अगदी थोडीशी माहिती आली होती. दोन्ही ठिकाणी म्हटले होते की पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी कृतज्ञता म्हणून अनंतरावांच्या उंडील (देवगड) येथील नि मा. लक्ष्मणरावांच्या खटाव (सातारा) येथील घरांचे दर्शन घेणार आहेत. या वार्तेतच दोहोंचे महात्म्य दडलेले आहे. दोन्ही ठिकाणी त्यांचे अभूतपूर्व स्वागत होईल यात काहीच संशय नाही. त्या दिवसांची चातकवत् वाट पाहूया. मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो की मी अनंतरावांना पाहिले होते नि त्यांच्याशी दोन मिनिटे बोललो होतो.
नरेंद्र मोदी आपल्या या नेत्याच्या आठवणी सांगतात, गांधीजींचा कोकण दौरा होता. भव्य शामियाना, नेत्यांची वर्दळ नि गडबड सुरू होती. या वेळी (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील) देवगड तालुक्यातील ‘उंडील’ गावच्या एका छोट्याशा ११ वर्षांच्या एका चुणचुणीत, हुशार, तेजस्वी मुलाला मुद्दामहून बोलावलेले होते. सभेनंतर त्याने इतक्या सुरेल आवाजात ‘वन्दे मातरम्’ म्हटले की गांधीजीही प्रभावित झाले. त्यांनी त्या मुलाला जवळ बोलाविले, नाव, गाव विचारले. गांधीजींचे लक्ष त्या मुलाच्या हातातल्या सोन्याच्या कड्याकडे गेले नि त्याचवेळी गांधीजींच्या शेजारची एक व्यक्ती त्या मुलाला म्हणाली, ‘बाळ, देऊन टाक ते कडे बापूजींना!’ आणि खरोखरच त्या मुलाने ते कडे बापूजींना देऊन टाकले आणि सर्व मंडळी चकीत होऊन हे दृश्य पाहत असतानाच तो मुलगा गर्दीत दिसेनासा झाला. हा मुलगा म्हणजेच संघ संस्थापक डॉ. हेडगेवारांचा लाडका ‘अनंता’ आणि गुजरातमधील सर्वांचे आवडते अनंतराव काळे.
अनंतरावांचे वडील रामभाऊ, त्यांची अतीव इच्छा होती की आपल्या उंडील गावात प्राथमिक शाळा हवी, पण शिक्षणाधिकारी अनुमती देईनात. शेवची त्यांनी रामभाऊंना अट घातली की उंडील गावातील मुले पहिल्या इयत्तेत उत्तीर्ण झाली तर शाळेचा विचार करू. वडीलांनी आव्हान स्वीकारले. त्यावेळी अनंता खारेपाटणच्या शाळेत ७ वीत शिकत होता. वडिलांनी त्याला कळवले. छोट्या अनंताने आपल्या शिक्षणाचा त्याग केला आणि संपूर्ण वर्षभर उंडील गावातल्या लहान मुलांना शिकविले आणि काय आश्चर्य! सर्व मुले उत्तीर्ण झाली. उंडील गावाला शाळा मिळाली. पण अनंताला एका शैक्षणिक वर्षाचा त्याग करावा लागला होता. भरघोस कणीस येण्यासाठी एका बीजाला भूमीत गाडून घ्यावे लागते. पुढे शिक्षणासाठी अनंतराव पुण्याला आले. इथेच त्यांचा संघशाखेशी परिचय झाला. प. पू. डॉ. हेगडेवारांच्या ते निकट सहवासात आले. डॉक्टरांनी अनंतरावांच्या हृदयात संघदीप प्रज्वलित केला.
जीवनाच्या पायातली सर्वांत महत्त्वाची पायरी म्हणजे शालान्त परीक्षा. पण शालान्त परीक्षा आणि संघशाखेचा कार्यक्रम या गोष्टी एकाच दिवशी आल्या. एखाद्याने करियर, उज्ज्वल भवितव्य यासाठी संघ कार्यक्रमाचा त्याग केला असता. पण ते संघनिष्ठ संघैकरूप अनंतरावांना रूचेना. त्यांनी नि मित्रांनी ठरविले की प्रश्नपत्रिका एक तास अगोदरच द्यायची नि शाखेत वेळेवर उपस्थित रहावयाचे. त्यानुसार सर्वांनी वेग लावला- दोनच तासांत पेपर सोडवून झाला. सर्व विद्यार्थी बाहेर पडले. शाखा कार्यक्रमाला वेळेवर पोचले आणि इकडे त्या प्रश्नपक्षिकेतही त्यांना प्रथम श्रेणीचे गुण मिळाले. विलक्षण धारणाशक्ती हा त्यांचा महान विशेष. १९४०! अनंतराव पुण्याच्या संघशिक्षा वर्गात शिक्षक म्हणून आले होते. त्याच वर्षी नमस्ते सदा वत्सले मातृभूमे’ ही प्रार्थना नव्याने प्रचारित झाली. वर्गाधिकार्यांनी अनंतरावांना प्रार्थना पाठ करून संघस्थानावर सांगण्याविषयी सूचना केली. दिवसभर अनेक कार्यक्रम होते. पण त्याही परिस्थितीत अनंतरावांनी प्रार्थना पाठ केली आणि सर्वांना सांगितली.
एकदा एका वक्तृत्व स्पर्धेत स्वा. सावरकर स्वतः परीक्षक होते. अनंतरावांचे वक्तृत्व ऐकून ते अतिशय प्रभावित झाले. वीर सावरकरांनी स्वतःहून अनंतरावांचा परिचय करून घेतला नि तो शेवटपर्यंत टिकला. स्वातंत्र्यवीरांची भेट मिळणे किती कठीण! पण अनंतराव प्रत्येकवर्षी एकदा स्वातंत्र्यवीरांच्या भेटीला येत असत.
प.पू. डॉक्टरांचा शेवटचा बौद्धिक वर्ग अनंतरावांनी ऐकला नि ते त्यांनी संघ हेच आपले ध्येय ठरविले. कुटुंब, भवितव्य, सौख्य, सगळ्याचा त्याग करून ते प्रचारक झाले. एका कन्स्ट्रक्शन या कंपनीत ते नोकरीसाठी रुजू झाले. गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील पुलाचे काम सुरू होते. त्यांची नोकरी चालू होती, पण लक्ष मात्र व्यक्तिनिर्माणाकडे होते. हळूहळू ते उत्तमपैकी गुजराती शिकले. पुलाचे काम संपले नि त्यांनी नोकरीचे त्यागपत्र दिले. महाराष्ट्र सोडून ते गुजरातशी एकरूप झाले. नाडियाड हे त्यांचे कार्यक्षेत्र ठरते. अन्न, राहण्याची जागा, आदी कसल्याही सोयी नसतानाही अनेक कष्ट करून त्यांनी स्वतःला संघकार्यात झोकून दिले. पाहता पाहता कार्यकर्त्यांचा एक संघ उभा राहिला.
एके दिवशी एका स्वयंसेवकाने त्यांना कोबी दिली. अनंतरावांना आनंद झाला, कारण त्या दिवशी पोळीची कणिक वाचली. नुसती कोबी उकडून त्यांनी ती खाल्ली आणि जे मिळाले त्यासाठी देवाचे आभार मानले. त्या स्वयंसेवकाला अनंतराव आपली भाजी स्वीकारतात याचा आनंद होत असे. तो प्रतिदिन त्यांना वेगवेगळी भाजी देऊ लागला. त्यामुळे अनंतरावांचे कणकेचे पैसे वाचू लागले. त्या पैशांचा विनियोग बसच्या वा सायकलच्या भाड्यासाठी होऊ लागला नि आसपासच्या गावात त्या आधारे स्वयंसेवक जाऊ लागले. संघकार्य खूप वाढले. संघकार्याचा पैसा स्वतःच्या जिभेच्या चैनीसाठी वापरायचा नाही असा त्यांचा कटाक्ष असे.
प्रतिवर्षी गुजरातच्या संघशिक्षावर्गात आंब्याच्या पेट्या येत. स्वयंसेवक तृप्त होत. एकही वर्ष खंड पावला नाही. पण हा आंबा कोण पाठवतो हे मात्र कुणालाच माहीत नव्हते. रत्नागिरीचा हा प्रसिद्ध आंबा अनंतरावांच्या घरून वर्गात येत असे. १९४६ मध्ये मातोश्री वारल्या म्हणून अनंतराव आपल्या घरी आले. स्वयंसेवक त्यांना सांत्वनपर पत्र पाठवू इच्छित होते. पण अनंतरावांच्या गावचे नाव कुणालाच माहीत नव्हते. ही त्यांची विलक्षण प्रसिद्धी पराङ्मुखता. अनंतरावांची मातृभाषा मराठी, पण गुजरातीत त्यांनी अतिशय सुंदर पद्यरचना केली. मात्र सहस्त्रावधी स्वयंसेवकांच्या जिभेवर त्यांची पद्ये आहेत. पण त्यांना हे माहीत नाही की ही पद्ये अनंतरावांनी लिहिलेली आहेत.
एकदा नरेंद्रभाई नि काही मित्र गप्पा मारीत बसले होते. कोणीतरी म्हणाले, परिस्थितीनिरपेक्ष म्हणजे काय? तर एक मित्र म्हणाला, अरे परिस्थिती – निरपेक्ष म्हणजे आपले अनंतराव. कोणतीही परिस्थिती असो, ते सदैव आनंदी नि कार्यक्षम असतात.
शिक्षणाची आवड असणार्या अनंतरावांनी अनेक संस्था चालू केल्या. धोळका (अहमदाबाद, कर्णावती) येथील सरस्वती विद्यालय, दुर्गम वनवासी (आदिवासी क्षेत्रातील पालचे (सुरत) सरस्वती विद्यालय, सिद्धपूर (पाटण) कडी (मेहसाणा), विसा (साबरकांठा) येथील विद्यालये अनंतरावांची कमाल आहे. त्यांनी पाया घातला. पण ते विश्वस्त, सल्लागार काहीच नव्हते.
१९९१ मध्ये अनंतराव निवर्तले. असू आम्ही सुखाने पायातील| मंदिर उभारणे हेच अमुचे शील| अशा वृत्तीच्या कै. अनंतरावांना लाख लाख प्रणाम!