नरकासुरांची रात्र

0
2

दिवाळीच्या पूर्वरात्री नरकासुर प्रतिमांचे दहन करण्याची जी परंपरा गोव्यात पडून गेलेली आहे, ती सर्व दृष्टींनी अयोग्य आहे हे उमजत असूनही दरवर्षी दिवाळीत गावोगावी, शहराशहरांतून मोठमोठ्या नरकासुर प्रतिमा उभारण्याची अहमहमिकाच लागलेली दिसते. जनतेकडून वर्गणी गोळा करून लोखंडी सांगाडे आणि कागदी लगद्यांच्या मदतीने ज्या मोठमोठ्या प्रतिमा नरकासुराच्या नावे निर्मिल्या जातात, त्यामागे ना सौंदर्यदृष्टी असते, ना काही पौराणिक कथाभाग. केवळ चित्रविचित्र आणि पाश्चात्त्य चित्रपट आणि व्हिडिओ गेम्समधील अक्राळविक्राळ पात्रांच्या हिडीस प्रतिकृती बनवून त्यांना नरकासुर संबोधण्याचे जे फॅड निर्माण झाले आहे, त्याला मुख्यत्वे अशा नरकासुर निर्मितीस आर्थिक पाठबळ देणारे राजकारणीच जबाबदार आहेत. आपापल्या भागात तरुणाई आपल्यासोबत असावी असे राजकारण्यांना वाटणे स्वाभाविक आहे. परंतु त्यासाठी त्यांच्या क्रीडागुणांना, कलागुणांना वाव देण्याऐवजी नरकासुर प्रतिमांसारख्या अनाठाई खर्चावर लाखो रुपये उधळले जातात. परिणामी ह्या अक्राळविक्राळ प्रतिमा बनवणे, त्यानिमित्ताने कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात डीजे लावणे, दारू पिऊन रात्रभर नाचणे, दंगामस्ती करणे आणि भल्या पहाटे त्या प्रतिमा भररस्त्यात जाळून अग्निशामक दलाच्या जवानांपुढे ऐन दिवाळीच्या दिवशी कामाचा डोंगर उभा करून ठेवणे ह्याशिवाय ह्या नरकासुर प्रतिमांतून काहीही साध्य होत नाही. नरकासुर प्रतिमा बनवण्याची एवढी अहमहमिका लागलेली असते की शहरामध्ये तर प्रत्येक वाड्यावस्तीत अगणित नरकासुर प्रतिमा उभ्या असलेल्या दिसतात. त्यानिमित्ताने कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात संगीत वाजवले जाते. शेजारीपाजारी कोणी रुग्ण असेल, कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, अशा कशाचीही पर्वा न करता हा धागडधिंगा घातला जातो. संगीत वाजवण्यासाठी कायद्याने वेळ निश्चित केलेली आहे. येथे मात्र कायदा धाब्यावर बसवून उत्तररात्रीपर्यंत संगीत वाजवले जाते आणि त्यावर तरुणाई बेभान होऊन नाचत असते. खरे तर नरकासुराचा वध ही महत्त्वाची घटना, परंतु कृष्णाची मूर्ती साकारणे हे कलाकुसरीचे काम असते. नरकासुर बनवायला काही विशेष डोके लागत नाही. त्यामुळे बिभत्स महाकाय नरकासुर प्रतिमा बनवण्यावरच भर असतो. आता आता छोट्या कृष्णाला जवळ उभे करण्याची प्रथा पडली आहे एवढेच. ह्या नरकासुर प्रतिमांविरोधात काही संघटना आवाज उठवत असतात, परंतु त्यामागे त्यांची भूमिका धार्मिक असते. सामाजिकदृष्ट्या विचार करता देखील नरकासुर प्रतिमांतून समाजाच्या भल्याचे काहीही साध्य होण्यासारखे नसते. ह्या प्रतिमांच्या सोबतीने रात्रभर जो काही धांगडधिंगा घातला जातो. कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात डीजे लावला जातो, त्यावर नियंत्रण आणणे हे खरे पोलिसांचे काम. ध्वनिप्रदूषणासंदर्भातील कायदे कडक आहेत, परंतु त्यांच्या अंमलबजावणीकडे जेवढ्या गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे, तेवढे दिले जाताना दिसत नाही. अनेक नरकासुरांच्या प्रतिमांजवळ त्या आकर्षक दिसाव्यात यासाठी डोळ्यांना अत्यंत हानीकारक असे लेजर किरणांचे झोत मारले जातात. पोलिसांनी खरे तर अशा लेजरचा वापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली पाहिजे, परंतु तीही राजकीय दबावापोटी केली जात नाही. रात्रभर धांगडधिंगा घातल्यानंतर पहाटे ह्या नरकासुर प्रतिमा भररस्त्यात जाळल्या जातात. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे अग्निशामक दलाच्या जवानांना आपली दिवाळी विसरून ही सगळी रस्त्यारस्त्यांतली घाण उपसत फिरावे लागते. अर्धवट जळालेले हे सांगाडे मग रस्त्याकडेला वर्षभर फेकून दिले जातात. नरकासुरांचा हा जो काही सुळसुळाट गोव्यात झालेला आहे, त्याला थोपवून काही चांगले विधायक वळण देता येईल का ह्याचा समाजातील जाणत्या व्यक्तींनी आणि सामाजिक संस्थांनी विचार करायला हवा. कोणतीही अनिष्ट प्रथा रोखणे म्हणजे काही त्या धर्मावर घाला नव्हे. आरोग्याला हानीकारक असलेल्या फटाक्यांचा वापर असो किंवा चिनी आकाशकंदीलांचा वापर असो. नरकासुर प्रतिमा असोत किंवा त्यानिमित्ताने वाजवले जाणारे कर्णकर्कश संगीत असो. ह्या सगळ्या गैर गोष्टींविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. ती अनिष्ट प्रथा मग कोणत्या धर्माशी जोडली गेली आहे किंवा कोणत्या गटातटांचा त्यांना पाठिंबा आहे ह्याचा विचार न करता आणि मुलाहिजा न ठेवता त्यांच्यावर सरसकट कारवाई व्हावी. जे चुकीचे आहे ते चुकीचेच ठरवले जावे. त्यातून काही चांगले घडेल हे पाहावे. हे जे लाखो रुपये नरकासुरांसारख्या अनिष्ट प्रथांवर खर्चिले जातात, त्याच पैशांतून कित्येक गोरगरीबांच्या घरची दिवाळी साजरी करता येणार नाही का? पोलिसांपासून परिचारिकांपर्यंत जे दिवाळीतही सेवा देतात, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देता येणार नाही का?