गणराया, तुझ्या आगमनासरशी चार दिवस तरी हमखास ‘अच्छे दिन’ येणार आहेत. एरवी रोजच्या जगण्याचे तेच ते प्रश्न आणि तोच संघर्ष. तरीही त्यातून वाट काढत असताना तुझ्या उत्सवाच्या निमित्ताने दरवर्षी हे अच्छे दिन येतात, आबालवृद्धांच्या मनात नव्या उत्साहाची कोवळी किरणे पेरून जातात. बाप्पा, तुझ्यापुढे दरवर्षी काय ते रोजचे रडगाणे गायचे! जगण्याची आव्हाने काही केल्या बदलत नाहीत. तीच भडकती महागाई आणि तोच भोवतालचा भ्रष्टाचार. परंतु हे सगळे बदलण्याचे वायदे करून माणसे सत्तेत आलेली आहेत. त्यामुुळे सर्वसामान्यांना या परिवर्तनापासून काही अपेक्षा आणि काही चांगले घडण्याची आशा आहे. सत्ता हे सेवेचे साधन आहे हा विचार बर्याच वर्षांनंतर पुन्हा जनतेच्या कानी पडला आहे आणि आता खरोखरच दीनदुबळ्यांची सेवा घडते की पूर्वीप्रमाणेच सत्तेपासून मेवा लुटला जातो ते पाहण्यासाठी काही काळ जावा लागेल. पोशाखी नेत्यांची बडी बडी भाषणे तर खूप ऐकली. आता कृतीची वेळ आली आहे. देश बदलण्याची ऐतिहासिक वेळ आली आहे. त्यात कोण किती यशस्वी होते हे तर येणारा काळच सांगेल, पण परिवर्तनाच्या सुखद लहरीवर देश अजून तरंगतो आहे खरा. पण नुसती लहर काय कामाची म्हणा, समस्यांचा कहर तर सुरूच आहे. महागाईला आवर घालणे अजून जमलेच नाही कोणाला. उलट त्यात भरच टाकून गेले लोक. ‘यत्र नार्यस्तु पुज्यन्ते’ अशा या देशातल्या माता भगिनी आजही सुरक्षित नाहीत. दिवसाढवळ्या अमानुष अत्याचारांना बळी पडत आहेत. कायद्याचा धाक नाही, चोर्यामार्या, लुटालुटीला अंत नाही. दहशतवादाची टांगती तलवार लटकतेच आहे. सीमेपलीकडून शत्रू आपल्या जवानांच्या छाताडावर बेबंद गोळ्या झाडण्याएवढा निर्ढावला आहे आणि ठोशास ठोसा देऊ म्हणणारेही शांतिमंत्राचा जप करीत स्वस्थ बसले आहेत. आपण आपल्या भोवतीच्या राष्ट्रांशी मैत्रीचा हात पुढे करण्याचे भले प्रामाणिक प्रयत्न केले, परंतु सापाला दूध पाजले म्हणून तो दंश करणे सोडतो थोडाच! एकीकडे पाक आणि दुसरीकडे चीन या देशाचे लचके तोडायलाच टपले आहेत. जगभरात तर नुसता हलकल्लोळ आहे. आयएसआयएस नावाचा नवा सैतान इराकमध्ये थैमान घालतो आहे आणि अवघ्या जगभरामध्ये उत्पात माजवण्याची स्वप्ने पाहतो आहे. जीव वाचवण्यासाठी पहाडावर धावलेल्या दुर्दैवी जीवांना वाचवायला नोहाची नौका काही आलीच नाही शेवटी. गाझामध्ये कोवळी मुुले क्षेपणास्र हल्ल्यांत किड्या – मुंग्यांप्रमाणे मारली जात आहेत. जग कुठल्या दिशेने चालले आहे बाप्पा? जगात जे घडते आहे ते भयावह आहे. येणार्या काळातल्या संकटांच्या सावल्या आपल्या सुंदर देशावरही पडू लागल्या आहेत. अशा वेळी जनतेचा त्राता तुझ्याशिवाय दुसरा कोण असेल? भडकत्या महागाईतही तुझ्या आगमनाप्रीत्यर्थ गोडाधोडाचे करून तुला खाऊ घालणार्या तुझ्या भक्तांवर सदैव कृपाछत्र असू दे. जगण्याचा भार पेलवत नाही म्हणत छोट्या छोट्या कारणांनी माणसे आत्महत्यांसारखे टोकाचे पाऊल उचलू लागली आहेत. या सुंदर दुनियेचा अकालीच निरोप घेऊ लागली आहेत. बुद्धिदात्या, अशा खचलेल्या पिचलेल्यांना जरा सुबुद्धी दे बाबा! हे जीवन सुंदर आहे, येथले जगणे सुंदर आहे याचा साक्षात्कार घडव त्यांना. प्रवाहाविरुद्ध पोहण्यातच तर खरा पुरूषार्थ आहे. प्रवाहपतीत होऊन विनाशाकडे जाण्याऐवजी हाती लागणार्या फळकुटाला धरून यशाचा किनारा गाठण्याचे धैर्य त्यांना मिळावे हीच तुझ्या चरणी प्रार्थना. अनाचाराला आळा घालणारा कोणी ‘बाजीराव सिंघम’ येणार नाही आणि अत्याचारांना आळा घालण्यास कोणी ‘मर्दानी’ही! आपले आपल्यालाच लढायचे आहे, झुंजायचे आहे. सत्याच्या मस्तकी सुखकर्त्याचा आशीर्वाद असणारच हा विश्वास अजूनही तुझ्यापुढच्या समयीसारखा सर्वांच्या मनात सतत तेवतो आहे. सत्प्रवृत्तीच्या पुण्याईवरच तर जग चालले आहे. रावण आणि कंस कधी नव्हते? पण शेवटी सत्याचा शर आरपार गेलाच ना त्यांच्या? या सत्प्रवृत्तीच्या पाठीशी विजयपताका घेऊन तू उभा राहा बाप्पा! तुझ्या चरणी मागणे एवढेच आहे. बाकी सोसणे हा सवयीने धर्म झाला आहे सगळ्यांचा. त्या सोसण्याला बळ दे, झुंजण्याचे बळ दे, लढण्याचे बळ दे आणि पाठीशी उभा राहा. मग बघ सगळे कसे मंगलमय बनते ते!