काही अपवाद वगळता ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या चौथ्या दिवशी मानांकित खेळाडूंनी आपली घोडदौड सुरूच ठेवताना पुढील फेरी गाठली. पुरुष एकेरीत स्पेनच्या अव्वल मानांकित राफेल नदाल याने अर्जेंटिनाच्या फेडरिको डेलबोनिस याला ६-३, ७-६, ६-१ असे अस्मान दाखवत दिमाखात तिसरी फेरी गाठली. महिला एकेरीत द्वितीय मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवाला तिसर्या फेरीत स्थान मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. तिने जर्मनीच्या लॉरा सिग्मंड हिचा ६-३, ६-३ असा धुव्वा उडविला.
बेलिसचा मुचोवाला शॉक!
अमेरिकेच्या किकी बेलिसने विसाव्या मानांकित कॅरोलिना मुचोवा हिचा ६-४, ६-४ असा पराभव करत सनसनाटी निकालाची नोंद केली. बेलिसने २०१४ साली वयाच्या १५व्या वर्षी इतिहास रचताना त्यावेळच्या ऑस्ट्रेलियन ओपन उपविजेत्या डॉमनिका सिबुलकोवा हिला युएस ओपन स्पर्धेत नमवून धक्कादायक निकालाची नोंद केली होती. यानंतर मात्र बेलिसवर खूप कमी कालावधीत चार शस्त्रक्रिया झाल्या. टेनिसपासून दूर राहण्याचा सल्लादेखील तिला अनेकांना दिला होता. परंतु, १५ वर्षीय कोको गॉफपासून प्रेरणा घेत तिने प्रतिकूल परिस्थितीतून डोके वर काढताना आपली क्षमता दाखवून दिली.
अन्य महत्त्वाचे निकाल
पुरुष एकेरी ः दुसरी फेरी ः आलेक्झांडर झ्वेरेव (७) वि. वि. इगोर गेरासिमोव ७-६, ६-४, ७-५, डॅनिल मेदवेदेव (४) वि. वि. पेद्रो मार्टिनेझ ७-५, ६-१, ६-३, गाईल मोनफिल्स (१०) वि. वि. इवो कार्लोविच ४-६, ७-६, ६-४, ७-५, स्टॅन वावरिंका (१५) वि. वि. आंद्रेयास सिप्पी ४-६, ७-५, ६-३, ३-६, ६-४, डेव्हिड गॉफिन (११) वि. वि. पियरे हर्बट ६-१, ६-४, ४-६, १-६, ६-३
महिला एकेरी ः दुसरी फेरी ः सिमोना हालेप (४) वि. वि. हॅरियट डार्ट ६-२, ६-४, बेलिंडा बेनसिच (६) वि. वि. येलेना ओस्टापेंको ७-५, ७-५, इलिना स्वितोलिना (५) वि. वि. लॉरेन डेव्हिस ६-२, ७-६, किकी बर्टेन्स (९) वि. वि. अरिना रोडियोनोवा ६-३, ७-५