म्हापशाच्या समाजकल्याण संचालनालयातील घटना
काल रविवारी म्हापसा समाज कल्याण संचालनालयाच्या नजरबंदी केंद्रातून तीन बांगलादेशी नागरिकांनी पलायन केले. केंद्राच्या छताचे पत्रे उचकटून मोहम्मद हावलेदर (19) मोहम्मद हिलाल (35) व मोहम्मद मरीदा (25) या बांगलादेशी नागरिकांनी पोबारा केला. रविवारी पहाटे 3 ते 5 वा.च्या दरम्यान छताचे पत्रे उचकटून तेथील स्वसंरक्षक भिंतीवरून उडी मारून ते पळून गेले. याप्रकरणी म्हापसा पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून म्हापसा पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
गेल्या 24 डिसेंबर 2023 रोजी समाजकल्याण संचालनालयाच्या नजरबंदी केंद्रात या तीन बांगलादेशी नागरिकांना ठेवण्यात आले होते.
या नागरिकांना पेडणे पोलिसांनी चोरीप्रकरणी अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने या तिघांना दोषी ठरवले होते. तसेच कोलवाळ कारागृहात आपली सहा महिन्यांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर या तिघांना डिसेंबर 2023 मध्ये म्हापसा येथील नजरबंदी केंद्रात आणून ठेवले होते. याविषयी गृहखात्याने बांगलादेशी प्रशासनाकडे संपर्क साधला होता. मात्र त्यांच्याकडूनही कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही.