- – हीरा नारायण गावकर
आपल्या संस्कृतीची उगवत्या पिढीला जाण व्हावी आणि त्यांच्यातील कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून गोवा मराठी अकादमी गोव्याच्या विविध भागांत समाजहिताचे उपक्रम राबवीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नगरगावात झालेला हा मराठी मेळा…
माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दर्याखोर्यातील शिळा
हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहुत आहे समतेची ग्वाही
कविवर्य कुसुमाग्रज यांनी मायमराठीचा हा जयघोष अगदी सार्थ शब्दांत केला आहे. ही मराठी भाषा हा या मातीतील संस्कारांचा, या भूमीच्या तेजस्वी इतिहासाचा आणि येथील कणाकणात तेजाळणार्या चैतन्याचा प्रवाह आहे. हा प्रवाह गोमंतकीय जनतेने अतोनात प्रेमाने वाहता, खळाळता ठेवला आहे. या आपल्या भारतभूने जगास अनेक थोर संत, युगप्रवर्तक दिले; ज्यांचे विचार आणि शिकवण ही आजही सर्वांस वंदनीय आहे. त्या महात्म्यांची तीच शिकवण या भाषेतून वाहते आहे आणि आजही येथील प्रत्येक पिढी रूजवते आहे, घडवते आहे आणि लढवतेसुद्धा आहे. येथील लोक, विशेषकरून गोव्याच्या ग्रामीण भागातील माणसे ही तेच बाळकडू घेऊन जन्मलेली, वाढलेली आहेत आणि म्हणून ती आपल्या मराठी भाषेचे अभिमानाने गुणगान करतात.
आपल्या या थोर संस्कृतीची प्रत्येकास, विशेषकरून उगवत्या पिढीला जाण व्हावी आणि त्यांच्यातील कलागुणांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून गोवा मराठी अकादमी गोमंतकाच्या विविध भागांत मराठी सांस्कृतिक केंद्रे स्थापन करून त्यांच्याकरवी अनेक समाजहिताचे उपक्रम यशस्वीरीत्या राबवीत आलेली आहे.
येथील समाजाची नाळ आजही आपली भाषा आणि संस्कृती यांशी जोडलेली आहे याची प्रचिती देत रविवार, २९ मे २०२२ रोजी मराठी सांस्कृतिक केंद्र नगरगाव, सत्तरीचा उदघाटन सोहळा श्री शांतादुर्गा देवस्थान नगरगाव येथे दिमाखात पार पडला. सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन हा सोहळा यशस्वीरीत्या घडवून आणला. सत्तरीच्या अनेक गावांतील मराठीप्रेमी या सोहळ्याला आत्मीयतेने, उत्साहाने उपस्थित राहिले होते, त्यामुळे तर हा सोहळा आणखीनच फुलून आला.
गोवा मराठी अकादमी, सत्तरी प्रभागाचे समन्वयक श्री. आनंद मयेकर म्हणाले की, आपली मराठी भाषा ही येथील प्रत्येकाच्या मनावर एका अनभिषिक्त राजाप्रमाणेच राज्य करत आलेली आहे. ती ऋषीमुनींच्या आशीर्वादाने भारलेली आहे, आणि म्हणूनच येथील भूमी आणि माणसे यांवर संस्कार आणि संस्कृती यांचा अखंड अभिषेक करत आलेली आहे.
येथील मंदिरे ही समाजाची शक्तिकेंद्रे आहेत आणि समाजाला संघटित ठेवण्याचे कार्य अविरतपणे करीत आलेली आहेत. आपले गृह, समाज आणि राष्ट्र हेही एक मंदिरच आहे आणि या मंदिरांचे पावित्र्य हे तेथे राहणार्या, येणार्या प्रत्येक व्यक्तीच्या आचार आणि विचार यांवर अवलंबून असते. आणि या सर्वांस एकत्र जोडून ठेवते ती भाषा. माणसाच्या भाषेची श्रीमंती ही त्याच्या बोलीभाषेवर अवलंबून असते, म्हणूनच मराठी अकादमीची स्थापना करण्यात आली आहे. येथील स्त्रीपुरुष हा वारसा टिकविण्यासाठी, या संस्कृतीची शिकवण पुढील पिढीला देत आहेत आणि हे व्यासपीठ अकादमीने अशाच लोकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. या केंद्रांच्या स्थापनेमागे हीच सरकारची अपेक्षा आहे. येथील भजन, कीर्तन, नृत्य या श्रेष्ठ परंपरा टिकविण्यासाठी, या कला जिवंत ठेवण्यासाठी हे व्यासपीठ आहे, असे कळकळीचे विचार त्यांनी आपल्या वक्तव्यात मांडले.
प्रमुख वक्ते श्री. चंद्रकांत गावस म्हणाले की, जीवनात पैसा महत्त्वाचा आहेच, पण आपले आयुष्य सुखी, समृद्धी, आनंदी आणि समाधानी बनविण्यासाठी साहित्य आणि संस्कृतीचा स्वीकार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हा पिढीजात वारसा आणखीन समृद्ध बनवून तो ज्ञानदिवा पुढे सुपूर्द करणे हे आपले कर्तव्यच आहे. आयुष्यात जी भूमिका आपल्या वाट्याला आली ती प्रामाणिकपणे बजावणे हे प्रत्येकाचे दायित्व आणि कर्तव्य आहे. वीर सावरकर यांच्या शब्दांत सांगावे तर माणसाचे जीवन ही कर्तव्याची भूमिका आहे, ती दक्षतेने व्यवस्थित पार पाडावी. तसेच आपण पुढे जाताना सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करावी.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. विवेक जोशी यांनी पं. महादेवशास्त्री जोशी यांनी आपणाला जी दिशा दाखविली, त्यावर वाटचाल करावी, तसेच तो वारसा आठवावा आणि पुढे न्यावा असे प्रतिपादन येथे केले. संस्कृती या शब्दाचा त्यांनी एक वेगळा समर्पक अर्थ सांगितला- सम्यक कृती, प्रत्येक कृती यथायोग्य करायला जी शिकवते ती संस्कृती. आणि ही कृती करण्यास साधन हे भाषा आहे. हीच भाषा समृद्ध व्हावी, आणि माणसाचा भौतिक आणि आध्यात्मिक विकास व्हावा त्यासाठीच आज अशी केंद्रे गावोगावी स्थापन व्हायला हवीत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तसेच लोकवेद, संतवाङ्मय असे आगळे उपक्रम राबविण्याची सूचना कार्यकारी मंडळास केली.
प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलेली अतोनात मेहनत, आणि साहित्य, संस्कार आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे ही प्रत्येकास असलेली जाणीव यामुळे हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.