छत्तीसगढच्या सुकमा जिल्ह्यातील जगरगुंडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या टेकुलागुडेम गावात नव्याने स्थापन केलेल्या पोलीस छावणीवर नक्षलवाद्यांनी काल हल्ला केला. या हल्ल्यात 3 जवान शहीद झाले, तर 14 जवान जखमी झाले. जखमींना प्रथम हेलिकॉप्टरने जगदलपूरला आणण्यात आले. येथून त्यांना रायपूरला नेण्यात आले.
संघर्षग्रस्त भागातील स्थानिक समुदायाला मदत करण्यासाठी टेकुलागुडेम गावात नवीन पोलीस छावणी सुरू करण्यात आली होती. मंगळवारी कोब्रा, एसटीएफ आणि डीआरजी पथक जोनागुडा-अलिगुडा परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेत होती. दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दलांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
या भीषण चकमकीत 14 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली, तीन जवानांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान दिले. जखमी जवानांना हेलिकॉप्टरने हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.