नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद

0
15

आयईडी स्फोटात उडवले पोलिसांचे वाहन

छत्तीसगढमधील दंतेवाड्यातील घटना

छत्तीसगढमधील दंतेवाडा येथे काल बुधवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात 10 जवान व त्यांचा चालक असे एकूण 11 जवान शहीद झाले. हे जवान जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) युनिटचे होते. याशिवाय त्यांच्या वाहनाच्या चालकाचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांची टीम पावसात अडकलेल्या सुरक्षा दलांना वाचवण्यासाठी जात होती.

दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पोलीस स्थानक हद्दीतील अरनपूर-समेलीदरम्यान हा हल्ला झाला. दरम्यान, यावेळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली असून यात माओवाद्यांनी वाहनांवर बॉम्ब फेकले.
दंतेवाडाच्या अरनपूर पोलीस ठाण्यांतर्गत माओवादी कॅडरची उपस्थिती असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. काल दंतेवाडा येथून नक्षलविरोधी अभियानासाठी डीआरजी दल पाठवण्यात आले होते. डीआरजी पथक परतत असताना अरनपूर रस्त्यावर आयईडी स्फोट घडवून आणला.

5 दिवसांपूर्वी तळ उद्ध्वस्त
पाच दिवसांपूर्वीच सुरक्षा दलांनी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला होता. नक्षलवाद्यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंसह मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला होता. जवान आल्याची माहिती मिळताच सर्व नक्षलवादी पळून गेले होते.

दोन रेल्वेगाड्या रद्द
बस्तरमध्ये किरंदुल-विशाखापट्टणम पॅसेंजर आणि नाइट एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या दोन्ही पॅसेंजर ट्रेन दंतेवाडाहून किरंदुलपर्यंत जाणार नाहीत. तथापि, किरंदुल ते विशाखापट्टणमला लोहखनिज घेऊन जाणाऱ्या मालगाड्यांची वाहतूक सुरू राहील.

गृहमंत्री अमित शहांची
मुख्यमंत्र्यांशी चर्चा

नक्षलवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याशी चर्चा केली आहे. शहा यांनी राज्य सरकारला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिले आहे. तर मुख्यमंत्री बघेल यांनी, शहीद जवानांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना. हा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. नक्षलवाद्यांना सोडणार नाही. त्यांना अजिबात दया दाखवली जाणार नाही असा इशारा दिला आहे.

काँग्रेस आमदारांवर हल्ला
गेल्या आठवड्यात काँग्रेस आमदार विक्रम मांडवी यांच्यावर माओवाद्यांनी हल्ला केला होता. सुदैवाने ते वाचले. आमदार मांडवी, जिल्हा पंचायत सदस्य यांच्यासह काँग्रेस नेते गांगलूरला गेले होते. येथील साप्ताहिक बाजारात मंगळवारी नुक्कड सभेचे आयोजन करण्यात आले होते. परतत असताना पडेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी धावत्या वाहनांवर गोळीबार केला
होता.

नक्षलवाद्यांची मोहीम

बस्तरमध्ये नक्षलवाद्यांची टीसीओसी (टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) सुरू आहे. या काळात अनेकदा नक्षलवादी अनेक मोठ्या घटना घडवून आणतात. बस्तरच्या सर्व जिल्ह्यांमध्ये शोधासाठी जवान पाठवले जात आहेत. घटनेची माहिती मिळताच फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. यासोबतच आरोग्य कर्मचारीही पोहोचले होते.

आयईडी स्फोट

या स्फोटात 10 नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनांवर आयईडी स्फोट केला. डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्डला एका ठिकाणी नक्षलवादी येणार असून त्याच नक्षल्यांचे कमांडरही असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी अतिरिक्त पोलीस दल रवाना करण्यात आले होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनांवर आयईडीने निशाणा साधला. या हल्ल्यात 11 जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, घटनेनंतर आलेल्या जवानांनी शहीद जवानांची शस्त्रे बाहेर काढून त्यांना सुरक्षित ठेवले. हल्ल्यात किमान 50 किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला असल्याचा अंदाज आहे.

पंतप्रधानांनी व्यक्त केले दु:ख
या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, दंतेवाडा येथे छत्तीसगड पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. हल्ल्यात शहीद झालेल्या शूर जवानांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे बलिदान सदैव स्मरणात राहील अशा भावना व्यक्त केल्या.