– मुलाखत : महेश गावकर
* आपला जन्म ग्रामीण भागात झाला. तिथे अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा नसताना चित्र, रंग यात जीवन घडविणे तसे फारच खडतर. आपल्या प्राथमिक शिक्षण तसेच चित्रशिक्षणाच्या प्रवासाविषयी थोडक्यात…
– माझा जन्म माशेल येथील जुवे – सांत इस्तेव या गावी झाला. तेथील सरकारी प्राथमिक शाळेत सुरूवातीचे शिक्षण आणि गावातीलच सेंट तेरेझा हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. चित्रकलेत शालेय जीवनापासूनच आवड होती. बालपणी जास्तीत जास्त वेळ चित्रे रेखाटून ती रंगविण्यात जाई. हायस्कूलस्तरावर विज्ञान विषयाचे जर्नल पूर्ण करतेवेळी चित्रे काढावी लागत. ती काढतेवेळी खूप आनंद होई. शालेय तसेच हायस्कूलमध्ये शिक्षकांचे प्राथमिक मार्गदर्शन लाभले. या सरावातूनच चित्रकला रंगत गेली. बहरत गेली. ङ्गुलत गेली. पुढे दहावीनंतर चित्रकलेत आवड असल्याने करिअर करण्यासाठी कला अकादमी संचालित मिरामार येथील गोवा कला महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. तेव्हा सदर महाविद्यालय गोवा विद्यापीठाशी संलग्न होते. सन १९८४-८५ मध्ये निर्धारपूर्वक पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला.
* मोठमोठी उदाहरणे पाहिल्यास कलेचा वारसा पूर्वजांकडून चालत आलेला असतो. आपल्या घरात तसे कोणी या कलेत पारंगत नसूनही आपली आजपर्यंतची मजल थक्क करणारी आहे. आपल्याला या कलेची गोडी कशी काय निर्माण झाली?
– कला ही उपजत असते. ती फुलण्यासाठी अथक परिश्रमाची कास धरावी लागते. भरारी घेण्यासाठी कुणीतरी पंखांना बळ द्यावे लागते. व्यक्त होण्याचे कलामाध्यम कुठलेही असो, त्यात कलावंताचं समाधिस्थ होणं याला जास्त महत्त्व असतं. येथे बालकलाकार-दिग्गज असा भेदाभेद नसतो. मला शाळेत शिकत असताना चित्रकलेची भारी आवड होती. शाळेत होणार्या चित्रकला स्पर्धांत मी उत्स्फूर्तपणे भाग घेत होतो. खरं सांगू, घरी या कलेत कोणीही पारंगत नव्हते. एकदा कुंडई येथील नागरिकांनी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती. माझे मामा गोविंद फडते सदर स्पर्धेला मला घेऊन गेले. तेथे बक्षीस काही मिळाले नाही. पण मामानी माझ्यातील सुप्त कला ओळखली आणि प्रोत्साहनाची थाप दिली. पुढे त्यांच्याच पुढाकाराने कला महाविद्यालयात प्रवेश मिळाला आणि मी घडत गेलो. त्यांच्याच प्रयत्नांमुळे यशोशिखर गाठण्यास पंखांना खरे बळ मिळाले.
* असं म्हणतात की, कलावंत मूर्तीला आकार द्यावा तद्वत मार्गदर्शनानुसार घडत जातो. याकामी शिक्षकांचे मार्गदर्शन अधिक मोलाचे असते. मित्रवर्गाचाही ओझरता का असेना जडणघडणीत खारीचा वाटा असतो. आपल्याला लाभलेल्या मार्गदर्शनाविषयी काही…
– मामा गोविंद फडते माझ्या जीवनाला कलाटणी देणारे पहिले गुरु. त्यानंतर कला महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर चित्रांच्या दुनियेत समृद्ध होण्यासाठी गुरुवर्य महेश वेंगुर्लेकर, राजीव शिंदे यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्तीचे धडे त्यांनी दिले. त्यांचे अनुभवसिद्ध शिक्षण कलाप्रवासात सदोदित लाभदायी ठरत आहे. त्यांचा सदैव ऋणी असेन. सांगण्यास अभिमान वाटतो, कला महाविद्यालयात शिकत असताना कधीही दडपण जाणवले नाही. सदैव कौंटुंबिक वातावरण होते. प्रसन्न वातावरणात आमची कला गुरुवर्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली बहरत गेली. मित्रपरिवारही मनमिळावू लाभला होता. नित्यानंद सिंगबाळ, प्रकाश नाईक व इतर अनेक मित्र… नावे घेतल्यास यादी संपणार नाही. सगळे नेहमीच एकमेकां साह्य करण्यात तत्पर असत. शाळेत जसं वातावरण होतं अगदी तसंच कॉलेजातही लाभले हे माझे भाग्य.
* मुंबई ही मायानगरी तशीच अनेकांची स्वप्ननगरी. या स्वप्नगरीत काम करणे नेहमीच आव्हानात्मक असते. आपण कला महाविद्यालयात पदवी मिळविल्यानंतर थेट या स्वप्ननगरीत भविष्य घडविण्यासाठी का बरे पाऊल ठेवले?
– कला महाविद्यालयातून व्यावसायिक कला या विभागात पदवी मिळवल्यानंतर मला मुंबई खुणावू लागली. माझा एक स्वभावगुण आहे – नेहमी आव्हानात्मक स्वीकारा. आणि म्हणूनच या क्षेत्रात उत्तुंग झेप घेण्यासाठी मुंबई गाठली. माझे मन मला सांगू लागले, या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर मुंबई महानगरीच योग्य आहे. तिथे भरपूर काही शिकायला मिळेल, आत्मविश्वास आत्मसात होऊन स्वयंसिद्ध कारकीर्द घडवण्यासाठी मुंबई गाठली आणि तेथे तन-मन-धन लावून अनुभव घेण्यास सुरूवात केली.
* आपण ध्येयाने प्रेरित होऊन मुंबई गाठली आणि काम करण्यास सुरूवात केली तेव्हा आपल्याला गोवा व मुंबई येथील कार्यपद्धतीत कोणता फरक जाणवला?
– मुंबई व गोव्यातील कामाच्या पद्धतीत फार मोठा फरक आहे. मुंबईत आपल्याला ठायीठायी व्यावसायिकपणा आढळेल. तेथे तहानभूक विसरून स्वत:ला कामात वाहून घेणारी माणसे सापडतील. प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या व्यक्ती पदोपदी भेटतील. तेथे सापडणारा आदरभाव, मान-सन्मान आपल्या जीवनात प्रगतीची पावले टाकण्यास मदत करील. मुंबईत प्रसिद्ध कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्या महान व्यक्तींचा स्वभाव अत्यंत साधा व सरळ होता. त्यांच्या व्यक्तीमत्वाचा जबरदस्त प्रभाव माझ्यावर पडला. ते नेहमी मार्गदर्शन करण्यास तत्पर असत. त्यांच्या मार्गदर्शनाच्या बळावर आजपर्यंतचा माझा कलाप्रवास यशदायी ठरला आहे.
* मुंबईत काम करणे मोठे आव्हानात्मक असते. तिथे नामांकित कंपन्यांमध्ये आपली कसोटी लागते. चांगले योगदान देण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. अशा स्थितीत आपण कोणकोणत्या कंपन्यांमध्ये सेवा दिली आहे?
– क्रियेटीव्ह कला हा माझा आवडता प्रांत. कलाविषयक स्वप्ने उराशी बाळगून मुंबईत दाखल झाल्यानंतर परसेप्ट, आर. के. स्वामी, बीबीडीओ, इंटरपब, क्ली ऍडस्, इमेज ऍडस् या भारतातील आघाडीच्या नामांकित जाहिरात संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. या कंपन्यांमध्ये क्रिएटीव्ह डिझायनिंग क्षेत्राशी निगडित भरपूर अत्याधुनिक ज्ञान शिकण्यास मिळाले. सुरूवातीला क्रिएटीव्ह डिझायनर म्हणून सुरूवात केली होती. कालांतराने प्रगतीच्या जोरावर परसेप्ट, आर. के. स्वामी. इमेज ऍडस्, इंटरपब या भारतात अग्रगण्य असलेल्या जाहिरात संस्थांमध्ये कला दिग्दर्शकाचे यशस्वीरित्या पद सांभाळण्याचा मान मिळाला. ‘परसेप्ट’ मध्ये काम करताना प्रख्यात चित्रकार तथा कला दिग्दर्शक ईश्वर जोगळेकर यांचे खूपच मोलाचे असे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या कलात्मकतेचा प्रभाव पडला. परसेप्ट ही ग्लॅमरस जाहिरात संस्था आहे. भारतातील पहिल्या १० जाहिरात संस्थामध्ये ही कंपनी गणली जाते. आर. के स्वामी या संस्थेचाही पहिल्या दहा जाहिरात संस्थांमध्ये क्रम लागतो. अशा नामांकित जाहिरात संस्थांमध्ये काम केल्याने अनुभवांची मोठी शिदोरी लाभली.
* अथक परिश्रम, जिद्दीच्या जोरावर आपण चांगला जम बसविला असतानाच मुंबईला अलविदा केला. उज्ज्वल भविष्य, आर्थिक लाभ हे सगळे सोडून गोव्यात परतण्याचे प्रयोजन काय?
– मुंबईत नामांकित कंपनीत चांगल्या पदावर असताना गलेलठ्ठ पगाराला पाणी सोडून गोव्यात परतल्याबद्दल अनेकजण मला प्रश्न करतात. पण खरं सांगू, मला माझ्या जन्मभूमीत या कलेचा प्रसार करायचा होता. येथे ही कला रुजवायची होती. आणि म्हणूनच १९९८ साली मोठ्या धैर्याने नव्या कल्पना आणि कल्पना उरी घेऊन ‘डिस्कव्हरी विनोती’ हे स्वत:चे डिझाईन आस्थापन सुरू केले. मुंबईतील अनुभवसिद्ध प्रगत जाहिरात क्षेत्रातील ज्ञान आणि अस्सल गोमंतकीय कल्पकता यांचा मेळ साधत क्रिएटीव्ह जाहिरात क्षेत्रात पाऊल टाकले. सुरूवातीला मानापमान सहन करावे लागले. लोक म्हणत – गोव्यात काय आहे? पण माझे प्रांजळ मत, स्वत:त कॅलिबर असल्यास कुठेही भविष्य घडवू शकता. सध्याचे युग तंत्रज्ञानाचे आहे. घरबसल्या तुम्ही जगभर सेवा देऊ शकतात. माझ्याकडे यूरोपियन ग्राहक आहे. त्याचे ‘सुशेगाद कॉफी’चे पॅकेजिंक डिझाईनचे काम आम्ही केले आहे. सुरूवातीला ‘झेन’ या शीतपेय उत्पादक कंपनीची जाहिरात करण्याची संधी मिळाली. पुढे ‘एन जल’ या शीतपेय कंपनीची तसेच जेम्स इलेक्ट्रीकल्स, सी पेबल या रेस्टॉंरंट यां कंपन्यांची जाहिरात केली आणि त्या गोवाभर चांगल्या गाजल्या. या यशाने मी जन्मभूमीत उचललेले धैर्याचे पाऊल योग्य असल्याचे सिद्ध झाल्याने आत्मिक समाधान लाभले. आमच्या प्रवेशाने या कलेची खरी ओळख गोमंतभूमीला झाल्याचा आनंद झाला.
* आपल्या ‘डिस्कव्हरी विनोती’ या आस्थापनाने केलेल्या क्रिएटीव्ह जाहिरातींविषयी थोडक्यात सांगाल का?
– हो, नक्की! आम्ही पाऊल ठेवले त्यावेळी ही कला गोव्यात तशी नवखीच होती. अजूनही ही कला गोव्यात नुकतीच कुठे रुजते आहे. आम्ही येथे या क्षेत्रात पाऊल ठेवले आणि हळूहळू व्यवसाय मिळत गेला. ‘झेन’ या शीतपेय बनवणार्या कंपनीने प्रथम संधी दिली. नंतर ‘एन जल’ कंपनीची जाहिरात गाजली. तिचे बोधवाक्य असे होते – एन जल – टेस्ट अबाव्ह द रेस्ट! ही जाहिरात गोव्याच्या कानाकोपर्यात गाजली. या जाहिरातीत मॉडल म्हणून फुटबॉलपटू ब्रुनो कुतिन्हो, सिनेतारका वर्षा उसगावकर व प्रख्यात मॉडल मिलिंद गुणाजी यांना घेतले होते. ‘सी पेबल’ या रेस्टॉंरंटची जाहिरातही फारच गाजली. तीचे घोषवाक्य होते – ‘मोसम खाना नदिका किनारा चंचल हवा.’ ‘जेम्स इलेक्ट्रीकल्स – इव्हन गॉड प्रिफर’ ही इलेक्ट्रीकल आस्थापनाची जाहिरातही गोव्यात सर्वदूर पोचली. अभिनेत्री साहिली ओकचा सहभाग असलेली ‘शुक्र ज्वेलर्स – बियॉंड ब्यूटी’ ही जाहिरातही गाजली. याशिवाय गोव्यातील नामांकित आस्थापनांसाठी आम्ही नेत्रदीपक बोधचिन्हे साकारलेली आहेत. पणजीतील काझा भोसले, फोंड्याचे शुक्र ज्वेलर्स, सी पेबल यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.
* आपले अनेक ग्राहक आहेत. ते आपण देत असलेल्या सेवेवर संतुष्ट आहेत का?
– माझ्या ग्राहकांचा दृढ विश्वास हीच माझी खरी संपत्ती. मन लावून काम करून सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न नेहमीच असतो. स्वत:च्या कामात वेगळी ओळख असल्याने त्यांच्यावर प्रभाव पडतो. ग्राहकांच्या अतुट विश्वासावर आजवरची वाटचाल सुरू आहे.
* गोवा ही उत्सवी भूमी. येथे संगीत संमेलने, नाट्यमहोत्सव दरवर्षी भरतात. आपण जाहिरात क्षेत्रापुरते मर्यादित न राहता नेपथ्य, मांडणी, सजावट या कलांमध्ये गोव्यात नव्या संधी निर्माण करून ही संमेलने संस्मरणीय केली. याविषयी थोडक्यात सांगाल का?
– कलात्मकतेचा वापर करून नवनव्या कल्पना रसिकांपर्यंत पोचविण्यासाठी मी जाहिरात क्षेत्राबरोबरच नेपथ्य, मांडणी, सजावट आदी क्षेत्रांत प्रवेश केला. आतापर्यंत अभिषेकी महोत्सव, स्वर मंगेश, सवाई गंधर्व संगीत संमेलन, सूरश्री केसरबाई संगीत संमेलन, काणकोण येथील लोकोत्सव, गोवा प्रोफेशनल लीगचे नेपथ्य अशा अनेक राज्यस्तरीय कार्यक्रमांचे यशस्वी नेपथ्य केले आहे. या कार्यक्रमांतील नाविन्यपूर्ण नेपथ्य कलेमुळे गोमंतकात विशेष नाव झाले आहे. आमच्या आस्थापनाच्या बॅनरखाली ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हा सांगीतिक कार्यक्रम सादर करण्यात आला होता. नाट्यसंगीतावर आधारित या कार्यक्रमाला फोंड्यातील राजीव गांधी कलामंदिरात चांगला प्रतिसाद लाभला होता. त्या कार्यक्रमाचे नेपथ्य, प्रमोशन पूर्ण आमचेच होते.
* मुंबई ते गोवा अशा आपल्या कलाप्रवासात अनेक आनंदाचे क्षण आले असतील. असाच एखादा आपल्या मनकप्प्यातील अविस्मरणीय क्षण सांगाल का?
– हो ना! गानकोकीळा लतादिदींनी थोपटलेली पाठ आजपर्यंतच्या कलाप्रवासातील चिरस्मरणीय असा क्षण आहे. ‘स्वरमंगेश’ या महोत्सवाचे नेपथ्य मी केले होते. ते लतादिदींना फारच आवडले. त्यांची कार्यक्रमावेळी भेट घेतली त्यावेळी त्या माझ्याशी सुमारे अर्धा तास भररून बोलल्या. नेपथ्य संकल्पना, मांडणी, सजावटीचे भरभरून कौतुक केले. त्यांनी माझ्या शर्टवर स्वाक्षरी करून आजपर्यंत कलाक्षेत्रात केलेल्या कार्याची पोचपावती दिली. त्यांनी स्वाक्षरी केलेला शर्ट मी सांभाळून ठेवला असून ती मला आयुष्यात मिळालेली अमूल्य भेट मानतो. तो क्षण, तिने दिलेली शाबासकी मला नाविन्याची कास धरण्यास चेतना देतात.
* आजची तरुण पिढी अंगी असलेली उपजत कला विसरून नोकरीच्या मागे धावताना दिसते. अशा युवकांना आपण कोणता संदेश द्याल?
– कोणत्याही क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी प्रदीर्घ अनुभव घ्या. मीपणाला जागा ठेवू नका. नामांकित कंपन्यांत काम केल्यानंतर आपोआप अहंकार गळून पडतो. खूप काही शिकायला मिळते. अनुभवाच्या शिदोरीवर यशस्वी वाटचाल करण्यास आत्मविश्वास गवसतो. म्हणून युवापिढीला एकच संदेश – कोणत्याही कलेत अनुभवसिद्ध होऊनच स्वयंसिद्ध होण्यास सज्ज व्हा. श्रमाची कास धरा, जिद्द सोडू नका.
* यापूर्वी आपली कलाप्रदर्शने कधी भरली होती? कालपासून कला अकादमीत भरलेल्या कला प्रदर्शनात काय काय असेल?
– यापूर्वी ‘ऍडफेस्त २००५’ आणि ‘ऍडफेस्त २००७’ अशी दोनवेळा प्रदर्शने भरली होती. १ ऑगस्टपासून भरलेले प्रदर्शन जरा हटके आहे. हे प्रदर्शन जाहिरात कला आणि कल्पना या विषयावर आधारित आहे. ‘द क्रिएटीव्ह जर्नी’ या नावे हे प्रदर्शन आहे. आमचे आस्थापन ‘डिस्कव्हरी विनोती’च्या माध्यमातून साकारलेल्या जाहिराती, नेपथ्य, ब्रोशर्स, होर्डिंग्ज, मेन्यूकार्डस्, मानपत्रे, मानचिन्हे, स्मरणिका आदी सुमारे दोनशे कलाकृती पाहण्याची सुवर्णसंधी कलारसिकांना या प्रदर्शनात लाभणार आहे. हे एक वेगळ्या धाटणीचे प्रदर्शन आहे. व्यावसायिक, आर्किटेक्ट, विद्यार्थी, चित्रभाषेचे अभ्यासक, रंग-रेषांचे महत्त्व जाणणारेच नव्हेत तर सामान्य रसिकांनीही या प्रदर्शनाच्या माध्यमातून खूप शिकण्यास संधी मिळणार आहे.
…………