ध्यासवेडा कलाकार ः गुरूदत्त वांतेकर

0
336
  • शब्दांकन ः नीला भोजराज

रांगोळीच्या रंगांचा वापर करून एक जिवंत कलाकृती साकार करण्याची किमया ज्या कलाकाराला साधली, तसेच पारंपरिक गणेशमूर्तिकला जोपासतानाच आधुनिक ‘स्पीड पेंटिंग’चे कार्यक्रम करणे ज्याला सहज साध्य झाले त्या गुरुदास वांतेकरांचा कलेचा प्रवास थोडक्यात जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात….

१) रांगोळीच्या रंगाचा उपयोग करून एवढी सुंदर जिवंत कलाकृती साकारण्याची कल्पना तुम्हाला कशी आणि केव्हा सुचली?

दरवर्षी मी चतुर्थीच्या निमित्ताने घरी वेगवेगळ्या कलाकारांची रांगोळी घालतो पण यावर्षी काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला. रांगोळी ही एक पावडर फॉर्म आहे आणि त्याच्या द्वारे पाणी बाळाच्या डोक्यावरून खाली येतं असे दाखवणे फारच अवघड होते आणि हे मी आव्हान स्वीकारलं. अंदाजे दिवसाचे दोन-तीन तास असे आठ दिवसांच्या मेहनतीने हे शक्य झाले.

२) तुम्ही या कलेच्या क्षेत्रात किती वर्षे कार्यरत आहात? त्यासाठी कोणते विशेष शिक्षण घेतले?

माझा मामा श्री. विष्णू मळीक मूर्तिकार आहे. त्यामुळे मी वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांच्याबरोबर गणेशमूर्ती रंगवायला बसायचो, म्हणून कलाक्षेत्रात माझी आवड निर्माण होत गेली आणि माझे शिक्षण बॅचलर ऑफ फाइन आर्ट्स- गोवा युनिव्हर्सिटी आणि ऍडव्हान्स डिप्लोमा इन कम्प्युटिंग आर्ट्स- मुंबई येथून झाले.

३) फाइन आर्ट्स कोर्समध्ये रांगोळी कलेचा अंतर्भाव आहे का? तुम्ही कधीपासून ती कला जोपासली?

रांगोळी ही आमची पारंपारिक कला आहे आणि ती विद्यापीठात शिकवली जात नाही. ती मी स्वतः सराव करून शिकलो. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मी वयाच्या दहाव्या वर्षापासून घरी रांगोळी घालायचो.

४) सध्या तुमचा व्यवसाय काय? समाजासाठी काही करताय?

मी फ्रीलान्सिंग पोर्ट्रेट आणि पेंटिंगच्या ऑर्डर्स घेतो, तसेच मी कसीनो आणि खाजगी कार्यक्रम (प्रायव्हेट इव्हेंट)मध्ये स्पीड पेंटिंगचे कार्यक्रम करतो. गझल गायक पंकज उदास आणि बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन यांच्या खाजगी कार्यक्रमात मी माझे कार्यक्रम केलेत. मी विशेष मुलांच्या शाळेत टेम्पररी कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहे.

५) तुमच्या कुटुंबात आणखी कुणी कलेचे पुजारी आहेत की तुम्ही एकटेच? तुमचे प्रेरणास्थान कोण?

माझे मामा जे एक गणेशमूर्तिकार आहे तेच माझा प्रेरणास्थान आहे.

६) आजपर्यंत किती ठिकाणी स्पर्धा गाजवल्या? किती पुरस्कार, मानसन्मान मिळाले?

विद्यापिठात असताना मी भरपूर स्पर्धांमध्ये भाग घ्यायचो आणि मला पहिले किंवा दुसरे बक्षीस नेहमीच मिळायचं ‘रियलिटी शो गोवाज गॉट टॅलंट’चा मी विजेता आहे आणि ‘अवर स्टेज युवर टॅलेंट’चा मी उपविजेता आहे.

७) गोवा ही कलाकारांची खाण म्हटली जाते, मग या क्षेत्रात यश मिळवताना काही अडचणी आल्या का? कोणत्या?

एवढच वाईट वाटते की खूप मेहनत करूनसुद्धा कधीकधी जेवढा प्रतिसाद कलेला मिळायला पाहिजे तेवढा मिळत नाही. याअगोदरसुद्धा याच क्षेत्रात मी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. त्यातलाच एक आहे ‘स्पीड पेंटिंग’ जे मी लाईव्ह स्टेजवरती पाच मिनिटाच्या आत ‘फेमस पर्सनालिटी’चा पोर्ट्रेट काढतो त्याचीसुद्धा कधी नोंद घेतली गेली नाही.

८) आता या कोविड-१९च्या काळात तुम्ही तुमच्या कलेला कसा वाव मिळवून दिला?

कोविड-१९च्या सुरुवातीच्या काळात एका विशेष कलाकृती संचावर काम सुरू केले आहे. आपल्या गोव्यातील जुन्या काळातील छायाचित्रांवर आधारित अशी ही संकल्पना असेल. ती संकल्पना पूर्ण होण्यासाठी अजून काही वेळ लागेल. त्यानंतर गणेश चतुर्थीची लगबग सुरू झाली. आम्ही आमच्या घरात गणपतीच्या मुर्त्या रंगवतो. त्यात रमून गेलो.

९) येणार्‍या काळातील नवीन पिढीला तुम्ही कोणत्या अनुभवाच्या दोन गोष्टी सांगाल?

येणार्‍या पिढीला एवढच सांगू इच्छितो की ज्या कला क्षेत्रात तुम्ही काम करणार किंवा करताहात त्याच्यामध्ये काही वेगळं करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामुळे तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. काम करत असताना तुम्हाला भरपूर अडथळे येतील पण तुम्ही तुमचे ध्येय सोडू नका. संयम ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते दुसर्‍यांना सांगा त्यामुळे तुमचेपण ज्ञान वाढत जाईल.

१०) कलेच्या दृष्टीने गोव्यात आणखी काही साधनसुविधांचा अभाव आहे, असे तुम्हाला वाटते का? त्यासाठी सरकारने काय करावे असे वाटते?

सध्याच्या डिजिटल युगात साधनसुविधांचा अभाव तेवढासा लक्षात येत नाही. वेगवेगळ्या माध्यमातून कलेचे वेगवेगळे पैलू आजची विशेषतः युवा पिढी चोखाळते आहे, वेगवेगळे जुगाड वापरूनही. तरीही, अगदी प्राथमिक स्तरापासून कलाक्षेत्रातल्या विविधतेची मुलांना ओळख करून दिल्यास त्यांना ती विविधता हाताळण्यास सोपे जाऊन कलेची सर्जनशीलता वाढेल, असे मला वाटते.