ध्यासपंथी

0
20
  • मीना समुद्र

सहजसुलभ असे फिरते साधन वापरून प्रवाही ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणारा तो तरुण, शेतकऱ्याचा पुत्र, ज्ञानाच्या बियांची पेरणी करत फिरतो आहे. त्यातून उगवलेल्या धान्याने शरीराचेच नव्हे तर मनाचे पोषण होणार आहे. ज्ञानपंथाच्या या वारकऱ्याला मनोमन धन्यवाद!

जुनी कागदपत्रे, कात्रणे, पत्रे चाळत असताना कागदांच्या चळतीतून घडी केलेला एक कागद सापडला. अतिशय पांढराशुभ्र असा तो कागद पाकिटात मावण्यासाठी घडी करावी तसा केलेला होता. म्हणजे हल्लीच आलेले कुणाचे तरी पत्र असावे असे वाटले. हल्ली पत्रं तरी कोण लिहितो आणि पोस्टाने पाठवतो? जो तो फोनवरून बोलतो किंवा व्हॉट्सॲपवर मॅसेज केला जातो. पूर्वी दिवाळी, संक्रांत, वाढदिवस अशी नैमित्तिक आणि आपल्या माणसांची ख्यालीखुशाली विचारणारी अधूनमधून पत्रे असायची. मग हे पत्रच असेल की आणखी काही? असे मनाशी म्हणत ती कागदाची घडी उलगडली. नाहीतरी अवगुंठित वस्तूविषयी माणसाला उत्सुकता असतेच!

कागद उलगडताच वरची मोठी छापील अक्षरे स्पष्ट दिसली. ‘माऊली सार्वजनिक ग्रंथालय’ असे ठळक अक्षरात छापलेले होते आणि खालच्या ओळीत सोलापूरचा पत्ता होता. डाव्या बाजूला ‘माऊली सार्वजनिक ग्रंथालय’ याच शब्दांच्या प्रभावळीत ज्ञानेश्वर माऊलींची हार घातलेली बैठी मूर्ती होती, ग्रंथातूनच प्रकटल्यासारखी आणि खाली वाक्य होते- ‘ग्रंथ हेच गुरू.’ माऊली ग्रंथालयाच्या नावाची सार्थकता आणि समर्पकता या दोन्ही गोष्टींवरून पटली. पत्त्याखाली ग्रंथालयाच्या संस्थापकांचे नाव होते- काशिनाथ खोबण्णा कोळी.
दि. 28 जाने. 2020 मध्ये त्यांच्याच सुपुत्राने (की नातवाने) पाठविलेले हे पत्र होते. पत्रातले वळणदार सुवाच्च अक्षर आणि खाली स्नेहांकित म्हणून केलेली ‘काशिनाथ कोळी’ अशी सही पाहिली तरी अगदी सुरुवातीला काहीच प्रकाश पडेना डोक्यात. साधारणतः अक्षर आणि सही पाहिली तरी पत्र कोणाचे हे लक्षात येते. पण मग पत्रातला मजकूर वाचायला सुरुवात केल्यावर ट्यूब पेटली. ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ या ओळी उद्धृत करून म्हणजेच ‘ज्ञानासारखे या जगात दुसरे काहीच पवित्र नाही’ असा अर्थही सांगितला होता.आणि वाचता वाचता लक्षात आले की ‘बैलगाडीतून फिरते वाचनालय’ चालवणारा हा तरुण आहे. त्याच्याबद्दल पाच-सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रात आलेली बातमी वाचून खूप नवलही वाटले होते. ही खूप वेगळी कल्पना आहे असे वाटून ती मनाला भावलीही होती. खेडोपाडी ज्ञानाची ज्योत पेटविण्यासाठी धडपडणारा हा एक ध्यासपंथी तरुण! मुलाबाळांसाठी आणि मोठ्यांसाठीही असे फिरते वाचनालय चालवतो आहे. ज्ञानगंगा खेडोपाड्यातील माणसांपर्यंत पोचून त्यांना त्याची गोडी लागावी म्हणून अतिशय नावीन्यपूर्ण मार्ग अवलंबतो आहे, हे वाचून अतिशय कौतुक वाटले होते.

त्याच्या त्या पवित्र कार्याला हातभार लागणार नसला तरी निदान कौतुक व्यक्त करण्यासाठी त्याला एक छोटेसे पत्र लिहिले होते आणि पसंतीची पावती म्हणून माझ्या तोपर्यंत प्रकाशित झालेल्या ‘प्रतिबिंब’ या कथासंग्रहाची एक आणि ‘काजवा’ या बालकवितासंग्रहाच्या तीन अशी चार पुस्तके आणि त्यासोबत प्रोत्साहनपर म्हणून एक अगदी छोटासा धनादेश पाठवला होता. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे त्याचे हे पत्र होते. पुस्तके त्याने वाचली असावीत, कारण ती उत्कृष्ट असल्याची भलामण त्याने केली होती.
ज्ञानप्रसाराचे पवित्र कार्य करत असताना माऊली ग्रंथालयाच्या बैलगाडीतून फिरते वाचनालय या उपक्रमाचा समाजातील सर्वच स्तरातून स्वीकार, कौतुक होत असल्याचे आणि समाजमाध्यमांतूनही हा कौतुकाचा विषय ठरून सर्वत्र प्रतिसाद मिळत असल्याचे समाधान लाभत असणार, हे त्याच्या पत्रावरून स्पष्ट होत होते. ‘पाठवलेल्या पुस्तकांमुळे काम करण्याचा उत्साह दुणावला आहे’ असे नमूद करून तसेच मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळत राहो असेही त्याने कळवले होते.

ज्ञानाविषयी जिज्ञासा, कुतूहल निर्माण करणे- तेही अशा अतिशय वेगळ्या मार्गाने. ही संकल्पना त्याला कशी सुचली असेल कोणास ठाऊक! पण त्याचे साध्य आणि साधन दोन्हीही अत्यंत शुद्ध, पवित्र भावनेने भारलेले वाटते आणि ही कल्पनाही अफलातूनच आहे. ग्रंथप्रसारासाठी ‘पुस्तक दिंडी’, ‘पुस्तकांचा पाऊस’, ‘पुस्तकजत्रा’, ‘पुस्तकहंडी’, ‘फिरती बस’ असे अनेक वेगळे मार्ग गोव्यातही अवलंबिले गेले होते, तसाच हाही एक नवा, कल्पक, प्रेरणादायक मार्ग. एरव्ही बैलगाडीतून धान्याची पोती, गवतांचे भारे, उसाचे भारे आणि माणसांची ने-आण करण्यासाठी ते अत्यंत साधे, उपलब्ध असे साधन पूर्वी होते. शहरी भागात नाही तरी खेडोपाडी अजूनही त्या साधनाचा उपयोग याच प्रकारे केला जातो. नांगरट, पेरणी, खळ्यात मळणी, धनधान्यवाहिनी आणि आडमार्गातूनही वाट काढून माणसांना इच्छित स्थळी पोचविण्याचे काम बैलगाडी करते. बैलांच्या गळ्यातील तालावर वाजणाऱ्या घंटा विशिष्ट प्रकारे फिरते ग्रंथालय असल्याची वर्दी देत असतील. आणि धनधान्याने भरलेल्या बैलगाडीची प्रतीक्षा शेतकऱ्याच्या घरी व्हावी, तशी ही परिचित वाहनातून आलेली पुस्तकांची प्रतीक्षा मुलेबाले आणि ज्ञानार्थी लोक मोठ्या उत्सुकतेने करत असतील. बैलांना कळलं असतं आपल्या पाठीवर कसला भार आहे तर त्यांनाही धन्यता वाटली असती. एरव्ही गाडीत मांडून ठेवलेली सचित्र मुखपृष्ठांची पुस्तकं घ्यायला मुलामाणसांची झुंबड उडाली की त्यांनाही तो आनंद, ती उत्सुकता पाहून सार्थक वाटत असेल. सहजसुलभ असे फिरते साधन वापरून प्रवाही ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणारा तो तरुण, शेतकऱ्याचा पुत्र, ज्ञानाच्या बियांची पेरणी करत फिरतो आहे. त्यातून उगवलेल्या धान्याने शरीराचेच नव्हे तर मनाचे पोषण होणार आहे. ज्ञानपंथाच्या या वारकऱ्याला मनोमन धन्यवाद!