मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो आग्वाद येथील खाडीत हलवण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचे बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी सोमवारी सांगितले होते. मात्र, दुसर्याच दिवशी काल लोबो यांनी कॅसिनोंसाठीचे धोरण तयार होईपर्यंत या कॅसिनोंना मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
पर्रीकर यांच्या तत्कालीन सरकारने गेल्या मार्च महिन्यात या कॅसिनोंना मांडवी नदीत ठेवण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली होती. ती मुदतवाढ ३० सप्टेंबर रोजी संपत असतानाच आता सरकारने कॅसिनो धोरण तयार झाले नसल्याने त्यांना आणखी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य मंत्रिमंडळाची आज बुधवारी बैठक होत असून या बैठकीत कॅसिनोंना मुदतवाढ देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. मंत्री मायकल लोबो यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.