भारताचा माजी द्रुतगती गोलंदाज व्यंकटेश प्रसाद याने अनुभवी क्रिकेटपटू तथा आपल्या कल्पक नेतृत्वाखाली दोन विश्वचषके जिंकून देणार्या महेंद्रसिंह धोनीला आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणे अत्यंत अवघड जाईल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
धोनी सध्या ३८ वर्षांचा झालेला आहे आणि त्याने २०१९च्या विश्वचषकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आहे. या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत त्याच्या सुमार कामगिरीमुळे बरीच टीका झाली होती. त्याने क्रिकेटमधून निवृत्त व्हावे असे मत बर्याच आजी-माजी खेळाडूंकडून व्यक्त झाले होते आणि होत आहे. सध्या कोरोना महामारीमुळे जगात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. परिणामी क्रिकेट सामने सध्या अनिश्चित काळासाठी स्थगित आहेत. त्यामुळे क्रिकेटचे सामने पुन्हा कधी सुरू होतील, हेच ठाऊक नसल्याने धोनीसाठी पुढील काळ अधिक खडतर असेल, असे प्रसाद यांना वाटते.
जवळपास गेल्या १० महिन्यांपासून धोनी क्रिकेट खेळलेला नाही. त्यातच करोनाचे संकट टळल्यावर संपूर्ण विश्वाचे टी-२० विश्वचषकावर लक्ष असेल. अशा परिस्थितीत धोनीने इतक्या कमी अवधीत संघात पुनरागमन करणे अशक्यच वाटते. किंबहुना त्याची आंतरराष्ट्रीय टी-२० प्रकाराची कारकीर्द जवळपास संपुष्टात आली आहे, असे म्हणायला हरकत नाही, असे प्रसाद म्हणाला.
धोनीच्या तंदुरुस्तीविषयी मला किंचितही शंका नाही. परंतु एखादा क्रीडापटू चाळीशीकडे मार्गक्रमण करताना आपसूकच त्याच्या शरीराच्या हालचाली मंदावल्या जातात. त्यामुळे धोनीला स्वत:ची तंदुरुस्ती जपण्यासोबतच संघ व्यवस्थापन आणि कर्णधार यांचा विश्वास पुन्हा जिंकावा लागेल, असेही प्रसाद यांनी सांगितले.
त्याशिवाय धोनीने संघात पुनरागमन केल्यास त्याला यष्टिरक्षकाची भूमिका न देता फलंदाजीतही पाचव्या क्रमांकावर पाठवावे. धोनीऐवजी अन्य युवा खेळाडूकडे यष्टिरक्षण तसेच हाणामारीच्या षटकात फटकेबाजी करण्याची सूत्रे सोपवावी, असेही प्रसाद यांनी सुचवले.