टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला आपल्या प्रारंभीच्या नेतृत्वकाळात (२००७) गोलंदाजांवर नियंत्रित ठेवणे आवडायचे. पण, २०१३ सालापर्यंत त्याने आपल्या शैलीत बदल करून गोलंदाजांवर विश्वास ठेवायला सुरुवात केली. त्याचे नेतृत्व परिपक्व बनले, असे भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज इरफान पठाण याने काल रविवारी सांगितले. स्टार स्पोर्टस्च्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ या कार्यक्रमात धोनीच्या नेतृत्वशैलीत झालेल्या बदलाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना तो बोलत होता.
३५ वर्षीय पठाण हा धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ सालचा टी-ट्वेंटी विश्वचषक जिंकलेल्या तसेच २०१३ साली चॅम्पियन्स करंडक जिंकलेल्या संघाचा अविभाज्य घटक होता.
‘तुम्हाला प्रथमच संघाचे नेतृत्व सोपवले जाते त्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी उत्सुक असता, असे पठाण पुढे म्हणाला. संघ बैठकीच्या वेळेत मात्र कधीच बदल झाला नाही. केवळ २००७ साली तो पाच मिनिटांत म्हणणे मांडायचा व २०१३ सालीसुद्धा ही परंपरा सुरूच होती, असे या वर्षीच्या सुरुवातीला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेल्या पठाणने सांगितले. धोनीच्या २००७ सालातील नेतृत्वाबद्दल सविस्तर बोलताना पठाण म्हणाला की, २००७ साली धोनी गोलंदाजाला समजवण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी उत्साहाच्या भरात यष्टिरक्षकाच्या जागेवरून धावत गोलंदाजापाशी यायचा. अनुभवावरून त्याने खूप बदल केले. धोनी महत्त्वाच्या क्षणी मध्यमगती गोलंदाजांना अधिक प्राधान्य द्यायचा. पण काळानुरुप त्याने संथगती, फिरकी गोलंदाजांना विश्वास देत त्यांना प्रतिस्पर्धी संघ ऐन भरात असताना त्यांच्याकडे चेंडू सोपवण्याचे सत्र आरंभल्याचे पठाण शेवटी म्हणाला.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ सालचा टी-ट्वेंटी विश्वचषक, २०१० व २०१६ सालचा आशिया चषक, २०११ सालचा वनडे विश्वचषक व २०१३ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी अशा महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या आहेत. पण, २०१९ साली विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून भारताचा पराभव झाल्यानंतर धोनीने बीसीसीआयला आपली अनुपलब्धता कळवली होती.