धोनीचे नव्हते निकालाशी भावनिक नाते ः लक्ष्मण

0
133

टीम इंडियाचा माजी शैलीदार फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण याने भारताचा नुकताच निवृत्त झालेला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. भावनिकदृष्ट्या सामन्याच्या निकालांशी कधीच नाते न जोडल्यामुळेच धोनी यशस्वी होऊ शकला, असे मत लक्ष्मण याने व्यक्त केले. त्याच्या या वृत्तीमुळेच त्याला लाखोंच्या संख्येने चाहते मिळाले व तो सर्वांचा लाडका बनला, असे लक्ष्मणला वाटते.

क्रिकेट चाहत्यांचे प्रेम हे तुमच्या मैदानावरील कामगिरीद्वारे मिळते. परंतु, आदर कमवायचा असेल तर तो तुम्ही तुमच्या वागणुकीने व कृतीनेच मिळवू शकता. धोनीने हा आदर कमावला आहे. कर्णधारपदाचा कोणताही पूर्वानुभव नसताना देशाचे नेतृत्व यशस्वी करण्याचा भीमपराक्रम धोनीने केला आहे.

कर्णधारपदाचे ओझे वाहताना स्वतःचा तोल कधीच त्याने ढळू दिला नाही. त्याची मैदानावरील व बाहेरील वागणूक आदर्शवत अशीच होती, असे लक्ष्मण म्हणाला. देशाचा दूत म्हणून देशाची प्रतिमा कशी राखावी, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे धोनी होय. आयसीसीच्या मानाच्या तिन्ही ट्रॉफी नावावर असलेला धोनी हा एकमेव कर्णधार.

परंतु, त्याला याचा गर्व कधीही झाला नाही. धोनीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटपटूंनीच नव्हे तर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावरूनच धोनी हे नाव किती मोठे आहे हे दिसून येते, असे लक्ष्मण शेवटी म्हणाला. ३९ वर्षीय धोनीने ३५० वनडे, ९० कसोटी व ९८ टी-ट्वेंटी सामने खेळले आहेत. यष्टीमागे त्याच्या नावावर ८२९ बळींची नोंद आहे.