धैर्याने करुया सामना कोरोनाचा योगसाधना – ४६० अंतरंग योग – ४६

0
141
  • डॉ. सीताकांत घाणेकर

रोग होऊ नये म्हणून आम्हाला सर्व दक्षता घ्यायलाच हव्यात. सरकार वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे. त्यात थोडादेखील शिथिलपणा उपयोगी नाही. तो घातक ठरतो याची दिवसेंदिवस उदाहरणे बघायला मिळतात. त्याशिवाय आपण आपली सर्व कर्मे कौशल्यपूर्ण करायला हवीत.

‘कोरोना’.. पाहुणा म्हणून आलेला. आता दोन महिने झाले. परत जाण्याची चिन्हे दिसतच नाहीत. चीनमध्ये तर ह्यापूर्वीच आलेला. कुणीच सांगू शकत नाही की तो जाणार की नाही? पण धुमाकूळ चालूच आहे. विश्‍वातील अनेक भाग जणु कुरूक्षेत्रच झाले आहेत – स्थलांतरित कामगार दगड काय मारतात… तेही पोलिसांवर (ज्यांना लढवय्ये म्हटले जाते). आगगाडीमधून एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाणारे प्रवासी. ‘क्वारंटाईन’मध्ये राहायला नकार काय देतात… अशा पुष्कळ घटना नकारात्मक, दुःख देणार्‍या. उजळणीची गरज नाही. सर्वांनाच माहीत आहे.

चांगल्या घटनाही पुष्कळ आहेत- हॉस्पिटलमध्ये सर्वांनी दिलेली उत्तम सेवा, पोलीस कर्मचार्‍यांनी केलेली सेवा, विविध सेवाभावी संस्थांनी दिलेली निःस्वार्थ सेवा. हल्लीच सरकारने विविध क्षेत्रात देऊ केलेली करोडो रुपयांची मदत.
एक गोष्ट खरी.. की कोरोनाने पुष्कळ चांगल्या गोष्टी शिकवल्या. फक्त शिकवण्याची पद्धत भूषणावह नाही. पण शेवटी निसर्ग म्हणून काय करणार? अहंकारी मानवाला शिकवण्यासाठी, योग्य दिशा दाखवण्यासाठी निसर्गाला एवढे निष्ठुर व्हावेच लागते. परत परत धोक्याची सूचना देऊन ‘तथाकथित आवडते बुद्धिमान मूल’ जेव्हा ऐकत नाही, उलट मौज-मस्ती करतच राहते, जेव्हा त्याची बुद्धी भ्रष्ट होते… तेव्हा असा कडक उपाय करावाच लागतो. निसर्गमाता योग्यच करते.
योगसाधनेच्या संदर्भात विचार करताना आम्हाला जरा वेगळ्या पद्धतीने ही समस्या सांभाळायला हवी. आणि आपण तेच करत आहोत.
– योगशास्त्राप्रमाणे मानवाचे पाच कोश (पंचकोश) आहेत.
* अन्नमय, * प्राणमय, * मनोमय, * विज्ञानमय, * आनंदमय.
तसेच जीवनाचे पाच पैलू आहेत –
* शारीरिक, * मानसिक, * भावनिक, *बौद्धिक व * आध्यात्मिक
यातील आनंदमय कोश म्हणजे आध्यात्मिक पैलू.
जागतिक आरोग्य संस्थेची आरोग्याची व्याख्या काय म्हणते?
– आरोग्य म्हणजे फक्त रोगमुक्ती नाही तर विविध पैलूंवर, स्तरांवर चांगल्या स्थितीत राहणे- शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक. या तिन्ही गोष्टींवर विचार केला तर लक्षात येईल की इतर विविध पैलूंवर पुष्कळ विचार, चर्चा, अभ्यास चालू आहे. असायलाच हवा पण अत्यंत दुर्लक्षित पैलू म्हणजे आध्यात्मिक.
बहुतेक वैज्ञानिक, डॉक्टर, बुद्धिमान व्यक्ती या पैलूपासून दूरच राहतात. आपल्या भारतात आध्यात्मिक पैलूला फार महत्त्व दिले आहे. कारण आपल्या ऋषी-महर्षींनी विश्‍वावर पुष्कळ गहन चिंतन केले आहे. मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान त्यांना संपूर्ण समजले होते. सृष्टीचे गूढ त्यांना उमगले होते. त्यामुळेच वेद, उपनिषद, योग यांसारखी शास्त्रे त्यांनी विकसित केली. गावोगावी लोकांना भेटून या तत्त्वज्ञानाचा प्रचार- प्रसार केला. त्यासाठी त्यांनी अत्यंत कष्ट सोसले. तपस्या केल्या. पण आपले झाले काय तर… ‘नळी फुंकिली सोनारे….’ त्यामुळे मग ‘ये रे माझ्या मागल्या…’ अशी परिस्थिती झाली.
तद्नंतर अवतार आले.. मानव रुपात.. सगळी सुखदुःखे भोगली. इच्छा हीच होती की स्व-कल्याण व विश्‍वकल्याण साधावे.
पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्णावतार घेऊन भगवान विष्णुनी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली. त्यानंतर सगळे योग आहेत आणि मुख्य ज्ञान आहे ते आध्यात्मिक आहे.

अर्जुनाला मोह झाला होता म्हणून भगवान त्याला त्याचे खरं स्वरूप काय आहे हे समजावतात. पहिल्या अध्यायात- अर्जुनविषादयोग – अर्जुन सर्व मोहमायेचे तत्त्वज्ञान सांगतो, अगदी विस्ताराने. श्रीकृष्ण फक्त ऐकतात. ज्ञानियांचे हेच लक्षण आहे. ज्ञानी व्यक्ती आधी सर्व ऐकतो. म्हणून आपण भारतीय संस्कृतीत जे बहुश्रुत असतात त्यांना जास्त महत्त्व देतो. आता अशा व्यक्ती दुर्मीळ. आज सगळेच बडबडणारे. तद्नंतर दुसर्‍या अध्यायात – सांख्ययोग – भगवान त्याच्या अनेक शंकांचे निराकरण करतात. त्याला जीवनाची सत्यासत्यता समजावतात.
* अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे |
गतासूनगतासूंश्चनानुशोचन्तिपण्डिताः ॥
– ज्यांचा शोक करू नये त्यांचा तू शोक करीत आहेस. पांडित्याच्या पोकळ गोष्टी सांगतोस. पंडित (खरे ज्ञानी) मेल्या-जित्यांचा शोक करीत नाहीत.
म्हणजे इथे भगवंत शरीर व त्याच्या देहसंबंधाविषयी ज्ञान देतात. पुढे श्रीकृष्ण जिवात्म्याबद्दल ज्ञान देतात.

देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा|
तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति ॥ गीता- २.१३

‘‘देही म्हणजे जीवात्मा त्याला या देहांत ज्याप्रमाणे बाळपण, तरुणपण व वृद्धत्व प्राप्त होते, त्या प्रमाणेच दुसरा देहही प्राप्त होत असतो. म्हणून याविषयी धीर पुरुष मोह पावत नाही’’.
– त्यापुढे जाऊन भगवंत शरीर व आत्मा यांच्या परस्पर संबंधावर सांगतात.
‘‘वासांसि जीर्णानि यथा विहाय|
नवानि गृह्नाति नरोऽपराणि|
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही॥ गीता-२.२२

‘‘ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण झालेली वस्त्रे टाकून नवी वस्त्रे परिधान करतो त्याप्रमाणे देही म्हणजे जीवात्मा जुनी शरीरे टाकून नवी धारण करतो’’.
एरवी अध्यात्म समजणे थोडे कठीणच. त्यासाठी विशिष्ट अभ्यास नियमित करावा लागतो. त्यावर मनन- चिंतन करून ते आचरणात आणावे लागते. सामान्यांना तर ही प्रक्रीया कठीणच वाटते. त्यासाठी चांगला गुरु हवा.
इथे तर जगद्गुरुच ज्ञान देतात. व वस्त्रांच्या साध्या, सोप्या, सरळ उदाहरणाने श्रीकृष्णांनी विषय सर्वांना समजेल अशा भाषेत सांगितले आहे. कारण आपणातील प्रत्येकजण जुनी वस्त्रे टाकून नवीन धारण करतो. चांगल्या गुरूचे हेच लक्षण आहे. सर्वांना समजेल असे सांगणे.
इथे हा मुद्दा समजल्यावर देव आत्म्याकडेच वळतात. त्याचे गुण सांगतात –

नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः|
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ गीता २.२३

‘‘आत्म्याला शस्रे तोडीत नाहीत, अग्नि याला जाळीत नाही, पाणी त्याला भिजवीत नाही. अगर वायु सुकवित नाही.’’
पुढील श्लोकांत श्रीकृष्ण या विषयावर अत्युच्च ज्ञान देतात. या विषयाच्या अभ्यासासाठी यातील सर्व श्लोक अभ्यासणे. योगसाधकाला पुष्कळ ज्ञान देईल.
पुढे एका श्लोकांत भगवंत अर्जुनाच्या क्षात्रधर्माबद्दल त्याची कानउघाडणी करतात.
स्वधर्ममपि चावेक्ष्य न विकम्पितुमर्हसि |
धर्म्याद्धि युद्धाच्छ्रेयोऽन्यत्क्षत्रियस्य न विद्यते ॥ गीता ः २.३१

– स्वधर्माच्या- क्षात्रधर्माच्या दृष्टीनेही, कचरणे हे तुला योग्य नाही. कारण क्षत्रियाना धर्मयुद्धाहून अधिक श्रेयस्कर असे दुसरे काही नाही’’
आज विश्‍वात शक्तिशाली कोरोनाचे युद्ध चालू आहे. त्याची अदृश्य सेना आहे. त्यात करोडो सैनिक आहेत. प्रत्येकजण अत्यंत पराक्रमी. सगळीकडे रोग व मृत्यू होतच आहेत. अशा क्षणी आध्यात्मिक ज्ञान प्रत्येक व्यक्तीला फार आवश्यक आहे.

रोग होऊ नये म्हणून आम्हाला सर्व दक्षता घ्यायलाच हव्यात. सरकार वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहे. त्यात थोडादेखील शिथिलपणा उपयोगी नाही. तो घातक ठरतो याची दिवसेंदिवस उदाहरणे बघायला मिळतात. त्याशिवाय आपण आपली सर्व कर्मे कौशल्यपूर्ण करायला हवीत. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवायला हवी.
आपल्या प्रारब्धाप्रमाणे मृत्यू आलाच तर आपण नाशिवंत शरीर व अमर, अजर, अविनाशी आत्म्याचे ज्ञान मिळवलेलेच आहे. म्हण्ाून चिंता करीत बसण्यापेक्षा आपण चिंतन करुया.

इथेच योगाचे महत्व जाणूया…
‘‘योगः कर्मसु कौशलम्’’ (गीता- २.५०)
– कर्मे करण्यामध्ये कौशल्य म्हणजेच योग.
कर्मे बंधनकारक न होता ती मोक्षसंपादन करण्याची युक्ती आहे.
वैज्ञानिक सर्व पैलूंवर लक्ष देताहेत – स्थूल व सूक्ष्म- औषधे, व्हॅक्सिन म्हणजे वैद्यकीय, सामाजिक दूरी राखणे, स्वच्छता राखणे, ‘मास्क’ वापरणे. आपण देखील इतर पैलूंबरोबर सूक्ष्म अश्या आध्यात्मिक पैलूवर ध्यान देऊया. तो अत्यंत महत्वाचा पैलू आहे.
जागतिक आरोग्य संस्था त्या पैलूवर विचार करताना दिसत नाही. फक्त काही डॉक्टर मध्ये-मध्ये योग, ध्यान करावे अशी सूचना करतात. पण त्यामध्ये सखोल मार्गदर्शन नाही.
असूद्या. आपण योगसाधक तरी आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा वापर करुन कोरानाचा सामना धैर्याने करुया. आपला विजय निश्चित होणार.