योगसाधना – ४७१
अंतरंग योग – ५६
- डॉ. सीताकांत घाणेकर
शास्त्रशुद्ध नियमित योगसाधना करणारे साधक स्वस्थ व शांत आहेत. कारण त्यांचा परमात्म्याशी हरक्षणी योग लागलेला असतो. इतरांनी या युद्धात भयभीत व निराश न होता या मार्गात वाटचाल करावी ही सदिच्छा व नम्र विनंती.
सर्व विश्वात एक विचित्र वातावरण आहे. कोरोनाच्या राज्यात त्याचा धुमाकूळ चालू आहे. कोरोनाच्या रुग्णांचा व मृत पावणार्यांचा पाऊस पडतो आहे. त्याचवेळी श्रावणातला पाऊसही चालू आहे. कुठे कुठे व्यवस्थित नियमित धारा कोसळतात तर अन्य ठिकाणी मुसळधार पावसामुळे शहरात, रस्त्यावर, घरात… पाणी येते. काही नद्यांना पूर येतो.
श्रावणमास म्हणजे उत्सवांचा मास- अशा उत्सवांचा पूरही चालू आहे. पण जनमानसात उत्साह, उमेद नाही. याचे मूळ कारण म्हणजे कोरोना. अनेकांना व्यवस्थित भेटता येत नाही. अनेकांना नोकर्या नाहीत. उत्पन्नाची साधने बंद झाली आहेत. उदरनिर्वाहाची अनेकांना चिंता लागून राहिली आहे. मुले व तरुण आपले शिक्षण कसे होणार, या चिंतेत आहे.
सारांश… का तर सगळीकडे अंधकार दिसतो आणि अशावेळी एक सण येतो…. श्रीकृष्ण जन्माष्टमी.
श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळी अशीच परिस्थिती होती. … मेघांचा गडगडाट चालू होता. वीज कडकडत होती. मुसळधार पाऊस कोसळत होता. मुख्य म्हणजे तेव्हा कंसाचे राज्य होते आणि आता कोरोनाचे राज्य आहे.
आपण योगसाधक नकारात्मक विचार करणारे नाही. उलट विधायक दृष्टिकोन ठेवणारे, म्हणून आम्हाला ज्ञान आहे की जेव्हा जीवनात अंधार वाटतो, सगळीकडे उदास वातावरण असते, निराशा पसरलेली असते, आपत्तीने थैमान मांडलेले असते, दुःखदैन्याचे काळे मेघ धमकावतात त्यावेळी भगवान श्रीकृष्ण जन्म घेतो.
कृष्णजन्माष्टमी सगळीकडे मर्यादित स्वरूपात साजरी केली. सण झाला तरी श्रीकृष्णाला आपण विसरता कामा नये. त्या पूर्णपुरुषोत्तमाचे अष्टपैलू जीवन समजून घेऊन त्याप्रमाणे वर्तन केले पाहिजे. तरच सर्व प्रकारची भीती निघून जाईल.
शास्त्रकार म्हणतात- ‘‘कर्षति आकर्षति इति कृष्णः – जो खेचतो, आकर्षून घेतो तो कृष्ण.’’ श्रीकृष्ण सर्वांचा लाडका होता. कारण त्याचे जीवनच सुंदर व सुगंधित होते. त्यामुळे गोकुळाष्टमी सर्वांनाच आनंद देते. श्रीकृष्णाच्या जीवनाकडे चौफेर नजर फिरवून त्याचे आपल्या जीवनातील स्थान, त्याचे तत्त्वज्ञान, जीवनाबद्दल दृष्टिकोन… अशा अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास… अशा काळात अत्यंत आवश्यक आहे. आपण थोडा थोडा विचार करूया.
- श्रीकृष्ण सामान्य अशा गोपाळामध्ये राहिला. त्यांच्याबरोबर वाढला, खेळला. त्यांच्या जीवनात समरस झाला. अशा गवळ्यांना त्याने धर्मयुद्धासाठी जागृत केले.
- श्रीकृष्णाच्या जीवनात अनेक असुर दिसतात, ज्यांनी लोकांना त्रास दिला. श्रीकृष्णाने त्यांचा नाश केला. उदा. अघासुर व बकासुर.
या शब्दांमागील गर्भितार्थ समजायला हवा. ‘‘अघ म्हणजे पाप व बक म्हणजे दंभ – म्हणजे श्रीकृष्णाने गोकुळातील पापी विचारांच्या व दांभिक वृत्तीच्या व्यक्तींचा नाश केला. - कालिया नागाची गोष्ट तर प्रख्यात आहे. याचा अर्थ म्हणजे कालिया हा मोठा नाग होता व तो यमुना नदीत वास करत होता. तो विषारी व विकारी विचारांचा प्रचार करत असे.
आपणही अशा विकारांपासून दूर राहायला हवे. तसेच अशा लोकांपासून सावधानी बाळगायला हवी. - गोवर्धनाची गोष्टसुद्धा बोधदायक आहे. आजच्यासारखी त्यावेळी लोक धनिक, सत्ताधीशांची पूजा करीत असत. इंद्रपूजन म्हणजे अशा व्यक्तींचे पूजन. श्रीकृष्णाने ‘गो’- म्हणजे उपनिषदांचे वर्णन करणार्यांचे, त्यांच्या विचारांचा प्रचार करणार्यांचे पूजन करायला समजावले. (सर्वोपनिषदो गावो).
- श्रीकृष्ण सत्यधर्माचे पालन करणारे होते. त्यामुळे काही राजे त्याचा विरोध करत होते. त्यात अग्रेसर म्हणजे कंस, जरासंध, नरकासुर, कालयवन, शिशुपाल, दुर्योधन – श्रीकृष्णाने त्या सर्वांचा नाश केला.
सूक्ष्म विचार केला तर यामागील तत्त्वज्ञान लक्षात घ्यायला हवे. हे सर्व (राजे) म्हणजेच आमचे षड्रिपू – काम, क्रोध, लोभ, मोह, मद मत्सर व अहंकार. - श्रीकृष्ण गोकुळात जन्मला. इथेसुद्धा आध्यात्मिक अर्थ आहे- ‘गो’ म्हणजे इंद्रिये. ‘कूळ’ म्हणजे ‘समुदाय’- इंद्रियांचा समुदाय आहे ते म्हणजे गोकूळ. याचा मथितार्थ बघणे आवश्यक आहे.
- आपली इंद्रिये घोड्यासारखी आहेत. ती विषयांमागे धावण्याचा प्रयत्न करतील- अगदी स्वैरपणे. त्यामुळे मानवाच्या जीवनात दुःख, रोग, अशांती आहे. म्हणून इथे श्रीकृष्णाची मुरली आवश्यक आहे. मुरली म्हणजे संगीत आणि संगीत म्हणजे शांतता- सूरबद्ध जीवन. गोकुळात मुरली ऐकून फक्त स्त्री-पुरुष-मुलेच नव्हे तर गायीसुद्धा आकर्षित होत असत. वातावरण सुखमय, आनंदमय होत असे.
सध्याच्या परिस्थितीत श्रीकृष्णजन्म होणे अत्यंत गरजेचे व योग्य आहे. पण तो फक्त कर्मकांडात्मक साजरा करणे पुरेसे नाही. तर त्यामागील भाव व तत्त्वज्ञान बघून मानवी जीवनात अनुसरणे आवश्यक आहे.
आज विश्वात कोरोनाचे युद्ध चालू आहे. संपूर्ण जगच जणुकाय रणांगण झाले आहे. प्रत्येक पैलूवर अभ्यास, उपाय, प्रयत्न चालूच आहेत. पण या भयभीत झालेल्या मानवतेला अंधकारात एक दीपगृह हवे आहे आणि तेही आध्यात्मिक दीपगृह. श्रीकृष्णाची श्रीमद्भगवद्गीता भवसागरातील एक उत्कृष्ट दीपगृह आहे.
प्रत्येक मानवाला आज योग्य मार्गदर्शन व आश्वासन हवे आहे. आम्ही भारतीय अत्यंत भाग्यवान आहोत. रणमैदानावर स्वतः विश्वनिर्माता सगुणसाकार मानवरूपात येऊन आश्वासन देत आहे. मानवजन्माचे गूढ समजावत आहे.
काही श्लोक बघू या.
- क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते |
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप ॥ (३)
भावार्थ : हे पार्था, असला नामर्दपणा पत्करू नकोस. तुला हा शोभत नाही. अंतःकरणाचा क्षुद्र दुबळेपणा टाकून युद्धाला उभा राहा.
- हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् |
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ (३७)
भावार्थ ः युद्धात मारला गेलास तर स्वर्गात जाशील अथवा युद्ध जिंकलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून हे अर्जुना, तू युद्धाचा निश्चय करून उभा राहा.
यासाठी असे तेजस्वी विचार पोषक आहेत. महाभारतात अर्जुन योद्धा होता. इथे जे विषाणूच्या युद्धात प्रत्यक्ष आहेत – डॉक्टर्स, परिचारिका, सफाई कर्मचारी, पोलीस, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते… हे सर्व खरे योद्धे आहेत. पण कोरोनाच्या जगावेगळ्या विचित्र वागण्यामुळे हे युद्ध आपल्याकडे केव्हा, कसे येऊन आपणही त्यात गोवले जाऊ शकतो. त्यावेळी प्रत्येक व्यक्तीने हृदयाचा दुबळेपणा दूर करून धैर्याने रोगाचा सामना करणे अपेक्षित आहे.
महायुद्धात अर्जुनाकडे अनेक दिव्य अस्त्रे-शस्त्रे होती. आपल्यासाठी अगदी थोडी आयुधे आहेत. व्हॅक्सीनसारखी प्रभावशाली शस्त्रे काही दिवसांनी उपलब्ध होतील. तोपर्यंत आपली शस्त्रे म्हणजे विविध दक्षतारूपी बंधने- मास्क, सामाजिक अंतर, सॅनिटायझर, स्वच्छता. त्याचबरोबर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध उपाय- जसे शाकाहार, योगसाधना (विविध पैलू व शास्त्रशुद्ध – आसने, कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम, ध्यान…)
इथे एक मुद्दा उपस्थित होऊ शकतो तो म्हणजे योगाभ्यासाबद्दल. अशावेळी अर्जुन आपल्या मदतीला येतो.
- अर्जुन श्रीकृष्णाला विचारतो- ‘‘जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे, परंतु संयमी नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलीत झाले, असा साधक योगसिद्धीला म्हणजे भगवत्साक्षात्काराला प्राप्त न होता कोणत्या गतीला जातो? (गीता ६- ३६)
त्यापुढे अर्जुन म्हणतो – ‘‘हे महाबाहो! भगवत्प्राप्तीच्या मार्गात मोहीत झालेला व संयमरहित असलेला पुरुष छिन्न-विच्छिन्न ठगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन नाश तर नाही ना पावत?
(गीता ६.३८ ः आत्मसंयम योग)
आपणातील बहुतेकांची अशीच स्थिती आहे. अनेकांची योगशास्त्रावर श्रद्धा अवश्य आहे पण मनावर संयम नाही कारण त्यांना बंधनांचा तिटकारा आहे.
अशांनी भयभीत होण्याचे कारण नाही कारण स्वतः जगत्पिता आश्वासन देतात-
‘‘हे पार्था! त्या पुरुषाचा इहलोकातही नाश नाही व परलोकातही नाही. कारण आत्मोद्धारासाठी अर्थात् भगवत्प्राप्तीसाठी शुभकर्म करणारा केव्हाही दुर्गतीला जात नाही.(गीता ६.४०)
शास्त्रशुद्ध नियमित योगसाधना करणारे साधक स्वस्थ व शांत आहेत. कारण त्यांचा परमात्म्याशी हरक्षणी योग लागलेला असतो. इतरांनी या युद्धात भयभीत व निराश न होता या मार्गात वाटचाल करावी ही सदिच्छा व नम्र विनंती. (संदर्भ ः पांडुरंगशास्त्री आठवले – गीता पाथेय, संस्कृती पूजन)