धेंपो स्पोर्ट्‌स क्लबला जेतेपद

0
130

>> जीएफए अंडर-१४ प्रथम विभाग लीग

धेंपो स्पोर्ट्‌स क्लबने चर्चिल ब्रदर्स स्पोर्ट्‌स क्लबचा ११-० असा धुव्वा उडवित गोवा फुटबॉल संघटना आयोजित १४ वर्षांखालील प्रथम विभाग लीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

फातोर्डा येथील ऍस्ट्रो टर्फ मैदानावर झालेल्या या सामन्यात धेंपो स्पोर्ट्‌स क्लबला मोठ्या विजयासह जेतेपदही मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलताना तोपोन मिर्ज, स्वॅवेल फुर्तादो आणि शाविर मोहम्मद यांनी हॅट्‌ट्रिक नोंदविल्या. तोपोन मिर्जने ९व्याच मिनिटाला धेंपोचे खाते खोलले. तोपोनने १५व्या मिनिटाला स्वतःचा दुसरा गोल नोंदवित संघाची आघाडी २-० अशी केली. लगेच पुढच्या मिनिटाला आशिष कुमारने संघाचा तिसरा गोल नोंदविला (३-०), स्वॅवेल फुर्तादोने संघाला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. तर ३५व्या मिनिटाला तोपोनने आपली हॅट्ट्रिक साधताना संघाला मध्यंतरापर्यंत ५-० अशा मजबूत आघाडीवर नेले होते.

दुसर्‍या सत्रात धेंपोच्या युवा खेळाडूंनी आपला धडाका कायम राखताना आणखी ६ गोलांची नोंद केली. स्वॅवेलने संघाचा सहावा गोल नोंदविला. ६४व्या मिनिटाला स्वॅवेलने आपली हॅट्‌ट्रिक पूर्ण केली. तर बदली खेळाडू शाविरने चार गोल नोंदवित धेंपो क्लबला ११-० अशा एकतर्फी विजयासह विजेतेपद मिळवून दिले.