कुजिरा येथील धेंपो कॉलेज व नावेलीतील रोझरी कॉलेज यांच्यात आज गोवा विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळविला जाणार आहे. ताळगाव पठार मैदानावर झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात धेंपोने झुआरीनगरच्या एमईएस कॉलेजचा ३-१ असा पराभव केला.
एमईएसने सामन्याची वेगवान सुरुवात करताना विसाव्या मिनिटाला आघाडी घेतली. राजकमल बिंद याने हा गोल झळकावला. पिछाडीवर पडल्यानंतर धेंपोने आपल्या खेळाची गती वाढवली. ४२व्या व ४५व्या मिनिटाला देवेंद्र मुरगावकरने गोल करत धेंपोला २-१ अशा आघाडीवर नेले. यानंतर धेंपोने सामन्याची सर्व सूत्रे आपल्याकडे राखली. ७१व्या मिनिटाला झाहिद मकानदार याने धेंपोचा तिसरा गोल केला.रोझरी कॉलेज नावेली व सरकारी कॉलेज साखळी यांच्यात दुसरा उपांत्य सामना झाला. अत्यंत वेगवान झालेल्या या सामन्यात क्लाईव्ह मिरांडा याने ५५व्या मिनिटाला हेडरद्वारे नावेलीचा पहिला गोल केला. ७४व्या मिनिटाला डॉसन कॉस्टाने दुसरा गोल करून विजय निश्चित केला.