धेंपोने जिंकला ‘अवेस चषक’

0
141

धेंपो स्पोटर्‌‌स क्लबने केरळच्या गोकुळम एफसीचा टायब्रेकरवर ५-२ असा पराभव करत ‘अवेस चषक’ स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचे विजेतेपद पटकावले. म्हापसा येथील धुळेर मैदानावर काल रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना खेळविण्यात आला. निर्धारित वेळेत उभय संघ १-१ असे बरोबरीत होते. नायजेरियाचा आघाडीपटू आदेलजा सोमिदे याने गोकुळमला ३१व्या मिनिटाला आघाडीवर नेले. यानंतर गोकुळमचा बचावपटू उगोचूकवो गॉड्‌सविल याच्या स्वयंगोलामुळे धेंपोला बरोबरी साधणे शक्य झाले. टायब्रेकरवर धेंपोकडून बीवन डिमेलो, नवीन मेंडीस, निक्सन कास्ताना व ज्योकिम अब्रांचिस यांनी गोल केले. आपल्या पहिल्या पेनल्टी किकवर आशिक उस्मान याने गोकुळमचा गोल नोंदविला. यानंतर अर्जुन जयराज याचा फटका धेंपोचा गोलरक्षक आग्नेलो गोम्स याने अडविला तर शिनू याचा फटका दिशाहीन ठरला. या विजेतेपदासह धेंपोने २ लाख रुपयांची कमाई केली. गोकुळणमला १ लाख रुपयांवर समाधान मानावे लागले. बक्षीस वितरण समारंभाला क्रीडामंत्री मनोहर आजगावकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गोव्याचे माजी फुटबॉलपटू कँडिडो ऍब्रू, अलिसाब सडेकर, सुकूर कुतिन्हो व फेलिक्स बार्रेटो यांनी हजेरी लावली होती. असोसिएशन फॉर द वेलबिईंग ऑफ एल्डर स्पोटर्‌‌सपर्सन्स (अवेस) यांनी धेंपो स्पोटर्‌‌स क्लब (ज्युनियर्स) व गोवा फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली होती.