धेंपोकडून बार्देश एफसीचा धुव्वा

0
133

मडगाव (क्री. प्र.)
धेंपो स्पोर्ट्‌स क्लबने गोवा फुटबॉल संघटना आयोजित गोवा प्रो-लीगमध्ये आपल्या अभियानाचा शुभारंभ आकर्षक विजयाने करताना काल धुळेर स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या सामन्यात बार्देश फुटबॉल क्लबचा ५-० असा धुव्वा उडविला.
धेंपो स्पोर्ट्‌स क्लबने सामन्यात पूर्णतः वर्चस्व राखताना आक्रमक खेळ करीत २६व्या मिनिटाला आपले खाते खोलले. लतेश मांद्रेकरकडून मिळालेल्या क्रॉसवर पृथ्वेश पेडणेकरने कोणतीही चूक न करता धेंपोला आघाडीवर नेणारा हा पहिला गोल नोंदविला. पहिल्या सत्रात धेंपोने आपली १-० अशी आघाडी राखली.
दुसर्‍या सत्रात धेंपोच्या खेळाडूंनी आपली आक्रमकता आणखी वाढविली आणि त्यांच्या आक्रमक खेळापुढे बार्देश एफसीचे खेळाडू हतबल ठरले. ४६व्या मिनिटाला सुरज हडकोणकरकडून मिळालेल्या पासवर पृथ्वेशने स्वतःचा व संघाचा दुसरा गोल नोेंदविला (२-०). तर लगेच ४७व्या मिनिटाला जेस्सेलकडून मिळालेल्या पासवर बीवन डिमेलोने धेंपोला ३-० अशा आघाडीवर नेले. ८४व्या मिनिटाला जेस्सेलच्याच क्रॉसवर बीवन डिमेलोने संघाचा चौथा गोल नोंदवित आघाडी ४-० अशी मजबूत केली. तर सामन्याच्या अंतिम क्षणात ८४व्या मिनिटाला गौरिश नाईकच्या पासवर जयसन वाझने धेंपोच्या ५-० अशा एकतर्फी विजयावर शिक्कामोर्तब केला.
आज या स्पर्धेत साळगावकर फुटबॉल क्लब आणि कोअर ऑफ सिग्नल्स यांच्या सायं. ४.०० वा. धुळेर स्टेडियमवर सामना होणार आहे.