धुल्लईतील डोंगर कापणी प्रकरणी जागामालकाविरोधात गुन्हा नोंद

0
5

धुल्लई-धारबांदोडा येथील सर्वे क्रमांक 157/1 जागेवर झाडांची कत्तल केल्या प्रकरणी जागेचे मालक मनोहर घन:श्याम गावकर (रा. दावकोण-धारबांदोडा) याच्या विरोधात वन खात्याने शुक्रवारी सकाळी गुन्हा नोंद केला. लवकरच नगरनियोजन खात्यातर्फे जागेच्या मालकावर पोलीस स्थानकात रितसर तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर प्लॉट विक्री प्रकरणात गुंतलेल्या व्यक्तींविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे नोंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

धारबांदोडा पंचायत क्षेत्रात तीन ठिकाणी डोंगर कापणी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिन्ही ठिकाणी डोंगर कापणी करून प्लॉट विक्री करण्यासाठी एजेंटगिरी सुरू आहे. त्यात धुल्लई येथील प्रकरण ताजे असल्याने सध्या जागेचा मालक अधिक अडचणीत आला आहे. प्लॉट विक्री करण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केल्याचे उघड झाले होते. दोन-तीन दिवसांपूर्वी वन खात्याच्या अधिकाऱ्यानी घटनास्थळी जावून पंचनामा केल्यानंतर शुक्रवारी जागेच्या मालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

प्रतापनगर येथील डोंगर कापणीप्रकरणी समीर आनंद वाचासुंदर, तर धुल्लई येथील डोंगर कापणीप्रकरणी मनोहर घनश्याम गावकर यांना दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बाजावून 48 तासांत नगरनियोजन खात्याकडे आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचा आदेश दिला होता.

प्रतापनगरात 40 हून अधिक लोकांकडून प्लॉट खरेदी
दरम्यान, प्रतापनगर येथील डोंगर कापणी प्रकरणात तालुक्याच्या मामलेदार कार्यलयाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत 40 पेक्षा अधिक लोकांनी प्लॉट खरेदी केल्याचे उघड झाले आहे. प्लॉट खरेदी केलेल्या अनेक जणांकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यामुळे प्लॉट खरेदी केलेले अनेकजण अडचणीत येण्याची शक्यता आहे.