धुमशान!

0
111

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या उद्या होणार्‍या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा कस लागणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढायला उभा ठाकला आहे आणि असे असूनही दोन्ही राज्यांत तो सर्वांत मोठा पक्ष ठरेल असे अंदाज विविध निवडणूकपूर्व पाहण्यांत व्यक्त झालेले आहेत. हरियाणासारख्या राज्यात जेथे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला फक्त चार जागा मिळाल्या होत्या, तेथेही या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार झालेला भाजप एकाकी झुंज घेऊनही सर्वांत मोठा पक्ष ठरेल असा अंदाज या पाहण्यांनी व्यक्त केला असल्याने हे अंदाज किती खरे आणि किती खोटे ठरतात त्याबाबत साहजिकच उत्सुकता आहे. या दोन्ही राज्यांमध्ये यावेळी युत्या तुटल्या, आघाड्या फुटल्या. प्रत्येक पक्षाला त्यामुळे स्वतःची ताकद आजमावण्यावाचून पर्याय उरला नाही. बहुतेक मतदारसंघात पंचरंगी लढती होणार असल्याने निकाल कोठल्या कोठे लागू शकतात. महाराष्ट्रात महायुती फुटली इतकेच नव्हे, तर गेली पंचवीस वर्षे एकमेकांचे घनिष्ठ मित्र राहिलेले भाजपा आणि शिवसेना एकमेकांच्या उरावर चढण्यास आतुर आहेत. महाराष्ट्रात या निवडणुकीत स्वबळावर बहुमताचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पाहणार्‍या भाजपाला शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या चारही पक्षांनी आपल्या टीकेचे लक्ष्य केलेले नुकत्याच झालेल्या प्रचारावेळी दिसून आले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भाजपावर झोड उठवताना उद्धव यांचे कौतुक केले. म्हणजे उद्या निकालानंतर शिवसेना – मनसे आणि राष्ट्रवादी महाराष्ट्राच्या हिताचे कारण पुढे करून एकत्र येऊ शकतात. अर्थात, भारतीय जनता पक्षाने २८८ जागांपैकी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १४५ + जागा मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपाला यावेळी शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये मुसंडी मारायची आहे. मुंबई, कोकणामध्ये सेनेवर मात करण्यासाठी तो पक्ष आक्रमक झाला आहे. सर्व पक्ष यावेळी स्वतंत्रपणे रिंगणात असले, तरीही पूर्ण बहुमताचे सरकार घडवण्याची ग्वाही देत भाजपा लढतीत उतरलेला आहे. पंतप्रधान मोदींचा झंझावाती दौराही त्यासाठी आखला गेला. या सार्‍या प्रयत्नांचे फळ किती मिळणार हे पाहावे लागेल. हरियाणामध्ये परिस्थिती वेगळी आहे. गेल्या निवडणुकीत भाजप तेथे पाचव्या स्थानावर होता. परंतु यावेळी केवळ मोदी लाटेवर भाजपचा तेथे भर आहे आणि सत्ताधारी कॉंग्रेस, ओमप्रकाश चौटालांचा आयएनएलडी आणि इतर पक्षांशी लढत घेण्यास तो स्वबळावर पुढे सरसावला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग हुडांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेसला अँटी इन्कम्बन्सीचा धोका तर आहेच, शिवाय रॉबर्ट वडरा जमीन रूपांतरण घोटाळ्याविरुद्ध भाजपने तेथे रान पेटवले आहे. मात्र, हरियाणाचे राजकीय भवितव्य तेथील २४ टक्के जाट लोकसंख्येवर आणि ९२ खाप पंचायतींवर अवलंबून असते. आयएनएलडीचे नेते ओमप्रकाश चौटाला सध्या शिक्षक भरती घोटाळ्यात तुरुंगात आहेत. स्वतःच्या कारावासाचीही राजकीय सहानुभूती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे हरियाणवी लोक कोणाच्या बाजूने राहणार याचा कौल उद्या मिळणार आहे. भाजपाचा विश्वासू मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाने तेथे ओमप्रकाश चौटालांच्या आयएनएलडीशी हातमिळवणी केली आहे आणि त्यांचा प्रचार चालवला आहे हीही एक उल्लेखनीय बाब आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल स्वत चौटालांच्या प्रचारात येऊन गेले. गेल्या निवडणुकीत कॉंग्रेसने हरियाणातील चाळीस जागा जिंकल्या होत्या, तेव्हा चौटालांचा पक्ष ३१ जागा मिळवून दुसर्‍या स्थानी होता. यावेळी मोदी लाट हूडा – चौटालांना अस्मान दाखवण्याचा चमत्कार करणार का हा खरा प्रश्न आहे. कॉंग्रेस गेल्या लोकसभा निवडणुकीतील पानिपतातून किती सावरला ते महाराष्ट्र व हरियाणात दिसून येणार आहे. राहुल गांधी यांचे तथाकथित वलय केव्हाच निकाली निघाले आहे. महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण यांच्या स्वच्छ छबीवर पक्षाची भिस्त आहे. राष्ट्रवादीने साथ सोडली असली, तरी त्यामुळे सिंचन घोटाळ्याचे ओझेही कॉंग्रेसच्या डोक्यावरून हटले आहे, पण मोदींच्या झंझावातापुढे महाराष्ट्रात पृथ्वीराज आणि हरियाणात हूडा कितपत टिकणार हे पाहावे लागेल. ही दोन्ही राज्ये भाजपाला हिसकावून घेता आली, तर कॉंग्रेसला राहुल यांच्या नेतृत्वाबाबत फेरविचार करावा लागेल हे मात्र खरे!