- – डॉ. मनाली महेश पवार
‘धुंधुरमास’ हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. किमान गारठा असेपर्यंत आणि सकाळी भूक लागेपर्यंत तरी हे व्रत आचरावे. आरोग्यशास्त्र व धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंधुरमासात दिसतो. या मासात पहाटे उठून व्यायाम करावा आणि सकाळी लवकर भरपेट जेवावे. वर्षभर खाण्यातून मिळणारी ऊर्जा आपल्याला याच महिन्यात मिळते.
वर्षाचे बारा महिने म्हणजे मास- मग ते इंग्रजी असो वा मराठी- सगळ्यांनाच माहीत आहेत. मग ‘धुंधुरमास’ असा महिना कोणी ऐकला आहे का? आयुर्वेदशास्त्राच्या दृष्टीने या मासाला विशेष महत्त्व आहे. आज जाणून घेऊया या विशेष अशा ‘धुंधुरमासा’बद्दल. या मासाला ‘झुंझुरमास’ अथवा ‘शून्यमास’ असेही म्हणतात.
या मासाला धनुर्मास म्हणतात, कारण डिसेंबर महिन्याच्या मध्यावर सूर्य वृश्चिक राशीतून धनू राशीत प्रवेश करतो, म्हणून सूर्याचे हे भ्रमण धनुर्मास म्हणून ओळखले जाते. सामान्यपणे वर्षभरात सूर्य सर्व राशींमध्ये विराजमान होतो. मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारी ‘भोगी’ हा या महिन्याचा शेवटचा दिवस असतो. या महिन्याला ‘शून्यमास’ असेही म्हणतात, कारण या महिन्यात कोणत्याही प्रकारची शुभकार्ये केली जात नाहीत. आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा या महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दक्षिणायनाचे सहा महिने देवतांची रात्र असते व उत्तरायणाचे सहा महिने देवतांचा दिवस असतो; आणि हा ‘धुंधुरमास’ देवतांचा ब्रह्ममुहूर्त म्हणजेच देवतांची पहाट असते असे म्हटले जाते. हा महिना हेमंत व शिशिर ऋतूमध्ये येतो. हा ‘धुंधुरमास’ देवतांना समर्पित असल्याचे सांगितले जाते.
सूर्योदयापूर्वी भल्या पहाटे ब्रह्ममुहूर्तावर देवांची पूजाअर्चा, उपासना, नामस्मरण करणे लाभदायक ठरते असे वर्णन शास्त्रात आढळते. या मासात विशेषत्वाने श्रीविष्णू, श्रीकृष्ण व सूर्याची उपासना करावी. आध्यात्मिक प्रगतीसाठी हा काळ उत्तम आहे. या काळात ध्यान, योग, प्राणायाम करावे. या संपूर्ण मासात सकाळी सर्वप्रथम सूर्याला अर्ध्य देऊन नैवेद्य अर्पण करावा. कारण सूर्य म्हणजे ऊर्जा. विविध अडचणी, समस्या यांचे निराकरण सूर्योपासनेमुळे होऊ शकते, असे सांगितले जाते.
आध्यात्मिक प्रगतीबरोबरच हा मास आरोग्याच्या दृष्टीनेही विशेष आहे. या मासात बाह्य वातावरणात शैत्य वाढते. त्यामुळे वाढलेला जठराग्नी, उत्तम शारीरिक व मानसिक बल यामुळे उत्तम आरोग्यसंपदा लाभलेली असते. या महिन्यात थंडीचे प्रमाण वाढत जाते. गार बोचरा वारा वाहत असतो. या थंडगार हवेमुळेच कफदोषाच्या संचयाला शरीरात सुरुवात होते. हा थोडाफार असणारा कफसंचय सोडला तर बाकी इतर दोष हे साम्यावस्थेतच असतात व म्हणूनच शरीरबळ चांगले टिकून राहते.
सर्वप्रकारचे बल्य, स्निग्ध व प्रमाणतः गुरू- अधिक प्रमाणातील आहार- या मासात म्हणूनच आवश्यक ठरतो. वाढलेल्या थंडीचा, शैत्याचा विचार मात्र याच्या जोडीला अवश्य केला पाहिजे. आहारद्रव्ये शीतवीर्यात्मक वापरू नयेत. बर्याचवेळा बल्यद्रव्ये ही शीतवीर्यात्मक असतात म्हणून आहार घेताना हा विचार करावा.
या धुंधुरमासात काय खावे?
- या मासात सर्वच उष्ण पदार्थ हे उपयुक्त ठरतात.
- गुळाची पोळी या दिवसांत भरपूर खावी. गूळ मधुररसाचा असला तरी तो उष्णवीर्य आहे.
- त्याबरोबर दूध, तूप यांसारखे स्निग्ध पदार्थही जरूर खावेत.
- आहारात मुगाची खिचडी, गुळाची पोळी, वांग्याचे भरीत अशा प्रकारचे पदार्थ खावेत.
- या मासात गहू-तांदळापेक्षाही बाजरी अधिक प्रमाणात खाणे योग्य ठरते. बाजरी ही उष्ण असल्यानेच या मासात श्रेयस्कर ठरते. बाजरी ही जशी उष्ण आहे तशीच ती फार रुक्षही आहे. बाजरीमुळे रुक्षता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊनच बाजरीच्या भाकरीबरोबर भरपूर लोणी घेणे आवश्यक असते. तसेच बाजरीमुळे रुक्षता येऊ नये म्हणून बाजरीची भाकरी करताना त्यात तीळ मिसळले जातात. तीळ हे उष्ण व स्निग्धही आहेत व म्हणून यांचाही अधिक प्रमाणात वापर या मासात केला जातो.
- तेल, तूप आदी स्नेहद्रव्यांचे प्रमाणही आहारात भरपूर हवे.
- गहू, उडीद, साखर, दूध, तूर, मूग, मटकी, वाटाणा, हरभरा, चवळी यांचा वापरही आहारात हवा.
- भुईकोहळा, बटाटा, रताळी, कांदा यांसारखी कंदमुळे, तसेच नवलकोल, दोडका, पडवळ, वांगी, मुळा इत्यादी भाज्या खाव्यात.
- तेल-तुपाचा वापर करून तळलेले, चमचमीत पदार्थही खाणे याच ऋतूत इष्ट ठरते.
- मसाल्याचे सर्व पदार्थ या मासात हितकर ठरतात.
- धारोष्ण दूध, दही, लोणी, तूप, मलई इत्यादींचा यथेच्छ उपयोग करावा.
- बासुंदी, खवा, पेढे, बर्फी हे दुधापासून बनविलेले पदार्थही भरपूर खावेत.
- द्राक्षे, मनुका, सफरचंद, केळी, चिकू, नारळ, पेरू, डाळिंब, जर्दाळू, खारीक, पिस्ता, काजू, बदाम या प्रकारची अनेक फळे व सुकामेवा अवश्य खावा.
या संपूर्ण मासात बल्यवर्धक असा आहार सेवन करावा. या मासात रात्र मोठी व दिवस लहान असतात. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर भूक लागते. आरोग्याच्या नियमाप्रमाणे भूक लागल्यावर खाण्यास विलंब करू नये. भूक लागल्यावरही जर अन्न पोटात गेले नाही तर त्याचा परिणाम असा होतो की, अग्नीला इंधन न मिळाल्याने अग्नी विझून जातो किंवा अग्नी प्रदिप्त झाल्यावर जर अन्न मिळाले नाही तर तो अग्निरस, रक्त इत्यादी धातूंचा नाश करतो. थकवा जाणवू लागतो. वजन कमी होते. हे सर्व टाळण्यासाठी अग्नीला त्या वेळेला इंधन पुरविले पाहिजे. म्हणून धुंधुरमासात प्रातःकाळीच सूर्योदय झाल्यावर लगेच आहार घेणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे.
पौष महिन्यात धुंधुरमास पाळण्याची पद्धत आहे. धुंधुरमास म्हणजे सकाळी अगदी लवकर उठून, स्नानादी आटोपून, सकाळच्या उन्हात बसून आहार घेणे होय. या आहारात मुगाची खिचडी, गुळाची पोळी, वांग्याचे भरीत अशा प्रकारचे पदार्थ असतात. हे सर्व पदार्थ उष्ण व म्हणूनच शैत्य दूर करणारे व कफघ्न आहेत.
धुंधुरमास हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. किमान गारठा असेपर्यंत आणि सकाळी भूक लागेपर्यंत हे व्रत असेच आचरावे. आरोग्यशास्त्र व धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंधुरमासात दिसतो.
या मासात पहाटे उठून व्यायाम करावा आणि सकाळी लवकर भरपेट जेवावे. या फास्टफूडच्या जमान्यात लोण्याचा गोळा घातलेली, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांगे, उसावरची पापडी, मटार यांची लेकुरवाळी भाजी असा भोगीच्या दिवसांपुरता आपण कसातरी हा मेनू जेवणात घेतो. मग परत फास्टफूड आहेच. हे कुठंतरी आता बदलायला हवे. त्यामुळे या महिन्यात पहाटे उठून सध्या मिळणार्या भाज्या, बाजरीसारखी धान्ये खाण्याला खूप महत्त्व आहे. वर्षभर खाण्यातून मिळणारी ऊर्जा आपल्याला याच महिन्यात मिळते. त्यामुळे धुंधुरमास माहीत असणे आवश्यक आहे.